नदीचोरी…

– हिमांशू 

प्लॅस्टीकबंदीच्या गदारोळात माणसं पेट्रोलची भाववाढ विसरून गेली आणि एसटीला टोलमाफी का नाही, हा प्रश्‍नही अडगळीत पडला. एसटीच्या पाठोपाठ खासगी वाहतूकदारांनीही दरवाढ केली आणि सोशल मीडियावर मात्र प्लॅस्टीकबंदीचेच जोक धबधब्यासारखे कोसळत राहिले. सामान्यतः नागरिकांनी प्लॅस्टीकबंदी मनापासून स्वीकारली. कारण, पुढच्या पिढीला प्लॅस्टिक किती तापदायक ठरेल, याचा अंदाज त्यांना आला आहे. तेवढ्यात बातमी आली की, किराणा मालाच्या दुकानात प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरायला परवानगी मिळालीसुद्धा! वेफर्स वगैरे विकणाऱ्या महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पिशव्यांना सूट दिलीच होती; मग किराणा दुकानदार तीच सवलत का मागणार नाहीत? खरं तर अनेक ठिकाणी प्लॅस्टिकला पर्याय शोधताना माणसं 25-30 वर्षे मागं गेली. मटण-मासे आणायला डबे घेऊन जाऊ लागली. पण किराणा दुकानदार पिशवीवर हटून बसले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खरं तर वर्तमानपत्राच्या पुड्या बांधण्याची पारंपरिक कला शिकून ते प्लॅस्टिकबंदीला हातभार लावू शकले असते. खरोखर, काळाच्या ओघात लोप पावलेली ती एक अप्रतिम कलाच आहे! पण हल्ली ग्राहकांकडे वेळ नसतो, पॅकिंग तयार ठेवावं लागतं अशा सबबी पुढे आल्या. खरं तर कागदाचे तयार पुडे दुकानदार यापूर्वीही तयार करून ठेवत होतेच की. राजकीय वर्तुळात मात्र राज ठाकरे वगळता कुणी प्लॅस्टिकबंदीला थेट विरोध केला नाही. “प्लॅस्टिकला बंदी घालता; मग नद्यांचं काय’ असा प्रश्‍न त्यांनी विचारायचा अवकाश… इकडे पश्‍चिम महाराष्ट्रातली एक महत्त्वाची नदी चोरीला गेली!

शे-दीडशे माणसं भल्या सकाळी चक्क हलगी वाजवत हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि पंचगंगा नदी चोरीला गेल्याची फिर्याद नोंदवली. पोलिसांना जिथं चोरीला गेलेली मंगळसूत्रं सापडण्याची मारामार; तिथं चोरीला गेलेली नदी कशी शोधणार? शिवाय, तक्रार द्यायला माणसं हलगी वाजवत का आले, हेही पोलिसांना कळेना. सामान्यतः जानेवारीत जेव्हा गवत कापणीसाठी सौंदा करतात, तेव्हाच हलगी वाजवली जाते. नदी चोरीला गेल्याची तक्रार द्यायला लोकांनी आपल्याकडे का यावं, याचंही उत्तर पोलिसांना सापडेना. पोलिसांच्या स्मरणशक्‍तीनुसार, या राज्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे. तरीही माणसं पोलीस ठाण्यात आली म्हटल्यावर कदाचित चोरीचा वहीम या मंडळावरच असावा, अशी शंका पोलिसांना आली; परंतु चौकशीसाठी मंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलवावं तर ते कोल्हापूर महापालिकेकडे बोट दाखवणार, हे उघड होतं. कारण, मंडळानं महापालिकेला याप्रकरणी नोटीस बजावली होती. असं असूनसुद्धा एवढी मोठ्ठी पंचगंगा नदी चोरीला गेलीच कशी, या प्रश्‍नानं पोलीस चांगलेच बुचकळ्यात पडले.

आजवर लोकांनी विहिरी चोरीला गेल्याचं ऐकलं होतं. कारण सरकारी कागदावर दिसणाऱ्या अनेक विहिरी प्रत्यक्षात दिसत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पण वर्षानुवर्षे वाहणारी नदी कोण चोरणार? खरं तर राज्यासह देशातल्या अशा अनेक नद्या चोरीला गेल्यात. आपण भीषण पाणीसंकटाच्या उंबरठ्यावर आहोत, असं सांगणारा नीती आयोगाचा अहवाल इतर मुद्द्यांपुढं इतका किरकोळ ठरलाय, की त्याचा उल्लेख ना सरकारकडून होतो, ना विरोधी पक्षांकडून! जलपर्णी आणि अन्य प्रदूषकांनी आज पंचगंगा नदी चोरली. कृष्णा, गोदावरीसह इतर नद्या त्याच वाटेवर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)