नगर वाचनालयात होणार ऑडियो लायब्ररी

-अंधांसाठी ब्रेल पुस्तकांची सोय करणारे राज्यातील पहिले वाचनालय
-ई लायब्ररीकडे वाटचाल
-अ वर्ग दर्जासाठी प्रस्ताव
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
-ग्रंथालय संचलनालय कडून गौरव

सुनिता शिंदे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कराड – संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक कालखंड असणाऱ्या 1857 च्या काळात कराड नगर वाचनालयाची स्थापना झाली. स्थापनेपासूनच वाचन चळवळ वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. सर्व स्तरातील लोकांना वाचनाची आवड लागावी, यासाठी स्वतंत्र विभाग करण्यात आले आहे. आता या वाचनालयाने अंधांसाठी ऑडियो लायब्ररी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अंधांनाही दुर्मिळ ग्रंथ व पुस्तकांची, साहित्याची माहिती व्हावी, या उद्देशाने ही संकल्पना साकारण्यात येत आहे. राज्यात प्रथमच ही सोय होत असल्याने नगरवाचनालयात येणाऱ्यांची संख्याही पर्यायाने वाढणार आहे. त्याच बरोबरच ई लायब्ररी करण्याकडेही वाचनालयाची वाटचाल सुरू आहे.

दिवंगत स्व. पी. डी. पाटील, श्री. म. कुलकर्णी व शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक शंकरराव करंबेळकर यांच्या पुढाकाराने कराड नगरवाचनालय सुरु झाले. त्यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सुरूवातीला मोजके ग्रंथ व अल्प वर्गणीदार होते. सद्यस्थितीला ग्रंथालयात 62 हजार ग्रंथ आहेत तर 287 नियतकालिके आहेत.

मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दु, कन्नड, गुजराती आदी भाषेतील पुस्तके उपलब्ध करण्यात आली. विविध प्रकारची दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिकांची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर 1903 पासूनचे अंक व 1860 पासूनचे ग्रंथ आहेत. 150 वर्षापूर्वीची जुनी पंचांगे, 1938 पासूनचे कल्याण मासिकांचे अंक जतन करुन ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर नगरवाचनालय पूर्णपणे संगणकीकृत करण्यात आले आहे. वाचनालयात स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी व महिलांकरिता स्वतंत्र अभ्यासिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. या अभ्यासिकेमार्फत 27 विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे.

या पुढचा टप्पा व सर्वसमावेशक लायब्ररी होण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहे. अंधासाठी त्यांना शिक्षीत करणाऱ्या विशेष अशा शाळा आज उपलब्ध आहेत. ब्रेल लिपीच्या माध्यमातून त्यांना शिक्षीत केले जात आहे. मात्र शिक्षीत होण्या इथेपर्यंतच त्यांना मर्यादित न ठेवता. स्पर्धा परीक्षेची तसेच आपल्या इतर साहित्याची माहिती व्हावी, त्यांना अधिकाधिक ज्ञान अवगत व्हावे, यादृष्टीने कोणी प्रयत्न केले नव्हते. कराड नगरवाचनालयाने त्यांच्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांना वाचता येत नसले तरी ऑडियोद्वारे विविध पुस्तकांची माहिती ते घेवू शकतात. आणि त्या माध्यमातून विविध स्पर्धांमध्येही ते चमकू शकतात.

या लायब्ररीमध्ये ब्रेलमध्येही पुस्तक संच उपलब्ध करण्यात येणार आहेत. पालिकेच्या जनरल सभेत अंधांसाठीच्या या ऑडियो लायब्ररीला मान्यता देण्यात आली असून लवकरच ही लायब्ररी खुली करण्यात येणार आहे. या लायब्ररीसाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च अपेक्षित असून सध्याच्या वाचनालयातच ही लायब्ररी सुरु राहणार आहे. नगरवाचनालया मार्फत शारदीय व्याख्यानमाला, स्व. यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला, ग्रंथालय अधिवेशन असे उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमामध्ये या नव्या ऑडियो लायब्ररीची भर पडणार असून त्याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकताही आहे.

ऑडियो लायब्ररीची वैशिष्ट्ये

पुस्तके 100
कॉम्प्युटर 2
हार्ड डिस्क 1
ऑडियो बुक कपाट 1
रेक्रॉर्ड मशिन संच 1
ब्रेल पुस्तकांसाठी रॅक 2

वर्गणीदारांची संख्या वाढणार

कराड नगरपालिकेच्या नगर वाचनालयात सद्यस्थितीत बाल विभागातील सभासदांची संख्या 87, अ वर्ग सभासदांची संख्या 192, ब वर्ग सभासदांची संख्या 3828 व मासिकांचे सभासद 284 असे एकूण 4680 वर्गणीदार आहेत. मात्र अंधांसाठी सुरू करण्यात येत असलेल्या या ऑडिओ लायब्ररीमुळे नगर वाचनालयाचे वर्गणीदार वाढणार आहेत. तसेच या उपक्रमाची राज्यभरात नोंद होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)