नगर वाचनालयाच्या अध्यक्षपदी युवराज पवार , अमित कुलकर्णी उपाध्यक्ष

श्री.छ.प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगर वाचनालयाची 165 वी सर्वसाधारण सभा वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.वाचनालयाच्या कार्यपध्दती संदर्भात तसेच कामकाजाबाबत अनेक प्रश्‍न उपस्थीत केले.यात बदल करण्याची आग्रही मागणी सभासदांनी केली.त्याला अध्यक्ष युवराज पवार यांनी उत्तरे देत सर्वांच्या मदतीने कामकाजात सुधारणा करण्याचे आश्‍वासन दिले.दरम्यान सन2018-19 साला साठी युवराज पवार यांची अध्यक्ष पदी तर अमित कुलकर्णी यांची उपाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली.दिनकरराव शालगर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.

श्री.छ.प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगर वाचनालयाची आजची सभा वादळी ठरण्याची चर्चा होती.युवराज पवार अध्यक्ष पदावरून पाय उतार होणार का प्रश्‍नवर गेले काही दिवस चर्चा सुरु होती.सभासदांचे कमी होणारे प्रमाण,निधी संकलनाचा मंदावलेला वेग,सभागृहाचा प्रलंबित प्रस्ताव,जुन्या भाडेकरूंचा प्रश्‍न तसेच वाचनालय आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात आलेले अपयश हे मुद्दे सर्वसाधरण सभेत गाजणार अशी चिन्हे होती.त्या प्रमाणेच ज्येष्ठ सभासद वासुदेव कुलकर्णी यांनी संचालक मंडळावर प्रश्‍नांची सरबत्ती केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाचकांना दिवाळी अंक मिळत नाहीत,संदर्भ ग्रंथासाठी तीन मजले चढून जावे लागतात,वाचनासाठी तळमजल्यावर योग्य बैठक व्यवस्था करावी,उत्पन्ना पेक्षा खर्च जास्त असल्याने वाचनालय उत्पन्न वाढवण्यासाठी काय करणार असे प्रश्‍न उपस्थीत केले.तसेच ताळेबंदातील काही खर्चांबाबत मधुसूदन पतकी यांनी शंका उपस्थीत केले.तर श्रीनिवास वारूंजीकर यांनी जिल्ह्यातील साहित्यिकांची यादी वाचनालयाने तयार करावी,एक दिवसीय साहित्य संमेलन घ्यावे,सभासद वाढीसाठी उपाय योजना करावी ,विविध उपक्रम राबवावेत अशा सूचना केल्या.महाविद्यालयांमध्ये फिरून युवा वाचकांना सभासद करण्याचा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला.

यावर उत्तर देताना युवराज पवार यांनी सदर बाजार येथील वाचनालयासाठी जागा शोधणे शेवटच्या टप्प्यात आले आहे.जागा मिळताच वास्तू उभारली जाईल असे स्पष्ट केले.निधी संकलन हा मोठा प्रश्‍न आहे.संचालक त्या साठी प्रयत्नशील आहेत.शासन अनुदान देते ते अत्यंत तुटपूंजे असून जागा भाडे ,सभागृहाचे भाडे तसेच नवे प्रक्षागृह उभाण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे स्पष्ट केले.दिवाळी अंक तीन महिन्यांसाठी नियमित वाचकांना दिले जातील तसेच वाचकांना बसण्यासाठी अंतर्गत सजावट बदलली जाईल असे ही सांगीतले.

दरम्यान सभेचे दहाच्या दहा विषय एक मताने मंजूर झाले.एक वर्षाची मुदत पूर्ण झाल्यामुळे युवराज पवार आणि अमित कुलकर्णी यांच्या फेर निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला.त्याला सभेने मंजूरी दिल्याने अध्यक्ष पदाच्या बदलाचा विषय चहाच्या पेल्यातले वादळ ठरले.डॉ.संदीप श्रोत्री यांची स्विकृत सदस्य म्हणून यावेळी निवड करण्यात आली.श्रीमती अष्टेकर तसेच श्री.हेडे यांनी नगर वाचनालयात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.तसेच स्विकृत सदस्य म्हणून गेली तीन वर्षे अर्ज करून केवळ चौकटीतल्याच मंडळींना कामाची संधी कार्यकारिणी देत असल्याने आपल्याला संधी मिळत नसल्याचे सांगीतले.यावर अष्टेकर यांना वाचनालयाच्या कार्यक्रम समितीत घेण्याचे सांगण्यात आले.

प्रास्ताविक,अहवाल वाचन डॉ.शाम बडवे यांनी केले.आभार अमित कुलकर्णी यांनी मानले.या प्रसंगी संचालक,विविध समितीचे सदस्य, वाचनालयाच्या ग्रंथपाल रुपाली मुळे,सौ.कोडगुले उपस्थीत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)