नगर लोकसभेची जागा मिळण्यासाठी आग्रही

खा. चव्हाण यांचे आश्‍वासन; जनसंघर्ष यात्रेचा समारोप

पाथर्डी – बाळासाहेब विखे व शंकरराव चव्हाण यांचे नाते राम-लक्ष्मणासारखेच होते. राज्यामध्ये चव्हाण यांच्या नेतृत्वाला नेहमी साथ देणाऱ्या विखे यांची पिढी डॉ. सुजय विखे यांच्या रुपाने पुढे येत असेल, तर त्यांना माझा पाठिंबा आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा कॉंग्रेसला मिळावी यासाठी आपण आग्रह धरू, असे आश्वासन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खा. अशोक चव्हाण यांनी दिले.
कॉंग्रेसने काढलेल्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप पाथर्डीत संपन्न झाला. त्या वेळी चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, सचिन सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे, डॉ. सुजय विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी मंत्री शोभा बच्छाव, अल्पसंख्यांक अध्यक्ष हाजीज इब्राहीम भाई, आशिष दुवा, बी. एन. संदीप, विनायक देशमुख, राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, प्रवक्ते राजेंद्र वाघमारे, माजी आ. राणा दिलीप सालंदा, आ. जयकुमार गोरे, हेमलता पाटील, उत्कर्षा रुपवते, कांचन मांढरे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, उपनगराध्यक्ष बंडूशेठ बोरुडे, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतीक खेडकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहनराव पालवे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष नासीर शेख आदी उपस्थित होते.
खा. चव्हाण म्हणाले, की शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, व्यापारी, दीनदलित यांची अवस्था खूप वाईट झाली आहे. सर्वसामान्यांच्या अडचणी काय आहेत, हे शासनाला समजायला तयार नाही. या अडचणी समजावून प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी डॉ. विखे यांच्यासारखे नेतृत्त्व पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणातील चढ-उतारामुळे विखे व चव्हाण एकमेकांबरोबर राहिले. त्यांच्या मैत्रीतून जो मार्ग निघाला, त्यातून महाराष्ट्रातील अनेक सामाजिक प्रश्न मार्गी लागले. बाळासाहेबांनी सर्वसामान्य लोकांसाठी संघर्ष केला. महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा दिली. राजीव गांधींनी संधी दिल्यामुळे मी खासदार झालो. याच प्रक्रियेचा स्वीकार करत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची भूमिका राहुल गांधींनी घेतली आहे. सुजीत तुम्ही चिंता करू नका, तुमच्यासाठी आम्ही आग्रह धरल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे यांच्यासह आपण वरिष्ठ पातळीवर आग्रह धरून कॉंग्रेसला जागा सोडून घेऊ. ही जागा अनेक वेळा लढून राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होत असेल, तर एकदा कॉंग्रेसला संधी मिळाली पाहिजे, हे आपले म्हणणे बरोबर आहे.
भाजप सरकारवर टीका करताना ते म्हणाले, “”÷शेतकऱ्यांना बोंडअळीचे पैसे मिळाले नाहीत. कांदा, टोमॅटो, दूध रस्त्यावर फेकण्याची वेळ आली. शेतीमालाला भाव नाही. वीज नाही. पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांना चारा नाही. हातांना काम नाही. फळबागांची अवस्था वाईट आहे. नगरचा छिंदम व मुंबईचा कदम ही भाजपची प्रतिके आहेत.”
थोरात म्हणाले, जनसंघर्ष यात्रेमधून 1980 सालाप्रमाणे देश पुन्हा कॉंग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहतो आहे, हे प्रकर्षाने जाणवले. देशात व राज्यात कॉंग्रेसची लाट निर्माण झाली आहे. 2019 च्या निवडणुकीत जनता भाजप सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा कॉंग्रेसला सोडवून घ्या. जिथे निवडून येण्याची क्षमता आहे, तिथे आपण लढले पाहिजे अशी माझी भूमिका आहे.
डॉ. विखे म्हणाले, की पाथर्डी तालुक्‍याने बाळासाहेब विखे पाटील यांना नेहमीच साथ दिली आहे. त्यामुळे जनसंघर्ष यात्रेचा समारोप पाथर्डीत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. मोदी सरकारच्या मनमानी धोरणामुळे सर्वसामान्य व शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खूप मोठा प्रतिसाद कॉंग्रेस पक्षाला मिळत आहे. आपला आघाडीचा धर्म पाळून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिणची जागा कॉंग्रेसला मिळाली पाहिजे.
कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे यांनी प्रास्ताविक केले. अभय आव्हाड यांनी आभार मानले

निवडून येणारा उमेदवार द्या

गेल्या पंधरा वर्षांपासून या मतदारसंघांमध्ये आघाडीचा उमेदवार पराभूत होतो आहे. भाजपचा खासदार मतदारसंघातील लोकांना साधा पाहायलाही मिळत नाही. अडीअडचणी सोडवणे तर खूपच दूर राहिले. एका चांगल्या उमेदवाराच्या माध्यमातून आपण कॉंग्रेस पक्षाला ही जागा घेतली पाहिजे. कॉंग्रेससाठी जागा सोडली, तर कॉंग्रेसचा खासदार होईल. अकार्यक्षम नेतृत्व देऊन फक्त उमेदवार देण्याचे काम या ठिकाणी व्हायला नको. आघाडीतही सक्षम उमेदवार दिला पाहिजे, असे सांगताना अप्रत्यक्षपणे डॉ. विखे यांनी आपली उमेदवारीच जाहीर केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)