नगर रस्त्यावरील मेट्रो मार्गात बदल नको

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची मागणी : बदलल्यास प्रकल्प खर्चात वाढ होणार

पुणे – नगर रस्त्यावर वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो मार्ग आवश्‍यक असून या मार्गात बदल करू नयेत, अशी मागणी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे. हा मार्ग बदलल्याने या प्रकल्पाचा खर्च वाढणार असून याशिवाय, सुमारे 300 झाडेही तोडावी लागणार आहेत. तसेच, या मार्गाचा फारसा वापरही होणार नाही ही बाब लक्षात घेऊन हा मार्ग बदलाचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वनाज ते रामवाडी हा मेट्रोमार्ग नगर रस्त्यावरून येरवडा ते रामवाडी असा सरळ आहे. मात्र, या मार्गात रस्त्याच्या कडेला असलेले आगाखान पॅलेस हे राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाला राष्ट्रीय संरक्षक स्मारक समितीने मान्यता नाकारली आहे. परिणामी महामेट्रोकडून हा मार्ग गुंजन चौकापासून कल्याणीनगरकडे शिवणे-खराडी रस्त्याने वळविण्यात आला आहे. हा नवीन आराखडा अंतिम करण्यात आला असून महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्यास तत्वत: मान्यता दिली आहे.

याबाबत डॉ. धेंडे म्हणाले, हा मार्ग महापालिकेने नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवून विकास आराखड्यात मंजूर करून घेतला आहे. त्यावेळी कोणतीही हरकत पुरात्त्व विभाग अथवा इतर कोणत्याही तत्सम विभागाने घेतलेली नाही. या आराखड्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. अशा स्थितीत हा मार्ग बदलणे योग्य नाही. त्यात आता मार्ग बदलण्यात आल्यास या रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढणार आहे. तर, 200 कोटींचा अतिरिक्त खर्च वाढणार असून सुमारे 300 झाडेही तोडावी लागणार आहेत. त्यास नागरिकांचा विरोधही आहे. तर, नगर रस्त्याच्या डाव्या बाजूच्या नागरिकांना याचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे मुळ मार्गच करावा, असेही ते म्हणाले.

विशेष बाब म्हणून मान्यता घ्यावी
महापालिकेने जंगली महाराज रस्त्यावर या पूर्वी स. गो. बर्वे चौकात ग्रेड सेपरेटर उभारलेला आहे. हे कामही पाताळेश्‍वर लेण्यांच्या प्रतिबंधीत क्षेत्रात येत होते. मात्र, महापालिकेने उच्च न्यायालयात जावून या कामासाठी मान्यता मिळविली. त्याच धर्तीवर हे कामही करणे शक्‍य आहे. त्यासाठी पुरात्त्व विभागाच्या विभागाचे सहकार्य घेऊन त्यांच्याशी सामोपचाराने चर्चा करून यावर तोडगा काढणे शक्‍य असल्याने त्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही डॉ. धेंडे यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)