नगर रस्त्यावरही दुमजली उड्डाणपूल?

महामेट्रोची पसंती : महापालिकेस पाठविला अहवाल


175 कोट रुपयांचा खर्च अपेक्षित

पुणे – नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नागपूर मेट्रोच्या धर्तीवर गुंजन चौक ते शास्त्रीनगरपर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारणे संयुक्तिक असल्याचे पत्र महामेट्रोने महापालिका प्रशासनास दिले आहे. या उड्डाणपूलासाठी सुमारे 175 कोटींचा खर्च अपेक्षित असून महापालिकेने हा खर्च उपलब्ध करून दिल्यास महामेट्रो हे काम करण्यास तयार असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

गुंजन चौक ते शास्त्रीनगर चौक असा सुमारे 1.75 किलोमीटरचा हा उड्डाणपूल असणार आहे. या उड्डाणपुलासह भुयारी मार्ग तसेच 2 स्वतंत्र उड्डाणपूल करणे शक्‍य असले, तरी या ठिकाणची वाहतूक कोंडी आणि भौगोलिक स्थिती पाहता हे दोन्ही पर्याय संयुक्तिक ठरणार नसल्याचे महामेट्रोने म्हटले आहे.

मागील महिन्यात पालिका आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नगरसेवकांसह येरवडा ते शास्त्रीनगरपर्यंतच्या मेट्रो मार्गाची पाहणी केली होती. हा मार्ग “बीआरटी’च्या जागेतून जाणार असला, तरी त्यामुळे भविष्यात होणारी वाहतूक कोंडी तसेच गुंजण चौक आणि शास्त्रीनगर चौकातील वाहतूक पाहता ही कोंडी फोडण्याबाबत तीन पर्यायांवर चर्चा झाली. तसेच यातील कोणता पर्याय संयुक्तिक असेल, याची माहिती महापालिकेस कळवावी, अशा सूचना महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यानुसार, महामेट्रोने नुकतेच पत्र पाठविले असून पालिकेने आपला निर्णय कळविण्याची विनंती केली आहे. या पत्रात महामेट्रोने गुंजन चौक ते शास्त्रीनगर चौकापर्यंत मेट्रोचा दुहेरी उड्डाणपूल उभारणे संयुक्त असल्याचे नमूद केले आहे.

दुहेरी उड्डाणपुलाला का प्राधान्य?
महामेट्रोने दिलेल्या पत्रानुसार, या चौकांमध्ये भुयारी मार्ग केल्यास जमिनीखाली खडक 4 ते 6 मीटरवर आहे. त्यावर मेट्रोचे खांब येतील. तर भुयारी मार्गासाठी 10 ते 12 मीटर जमिनीखाली जावे लागेल, हे संयुक्तिक होणार नाही. तसेच या कामात जमिनीखाली सेवा वाहिन्यांचीही समस्या येणार असून दोन्ही चौकांत दोन स्वतंत्र भुयारी मार्ग करावे लागतील. तसेच “बीआरटी’ स्थानके आणि मेट्रो स्टेशनला हे मार्ग जोडणे अडचणीचे ठरेल. तर या मार्गावर दोन स्वतंत्र उड्डाणपूल उभारल्यास गुंजन चौकाचा उड्डाणपूल 370 मीटरचा तर तर शास्त्रीनगर चौकाचा उड्डाणपूल 750 मीटरचा असेल. या दोन उड्डाणपुलांमध्ये सुमारे 350 मीटरचे अंतर असेल. त्यामुळे मेट्रो स्थानके तसेच “बीआरटी’ स्थानकांना जोडण्यासाठी या पुलांना स्वतंत्र रॅम्प करावे लागतील. त्यामुळे हे दोन्ही उपाय पुरेसे परिणामकारक नसल्याने दुहेरी उड्डाणपूल उभारणे संयुक्तिक होणार असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)