मतदारांसमोर अनेक पर्याय : विविध पक्षांचे उमेदवार प्रमुख पक्षांसाठी डोकेदुखी
नगर: महापालिका निवडणुकीत नगर शहरातील प्रमुख राजकीय पक्षांसह लहान-मोठ्या पक्षांनी आपले उमेदवार दिले आहेत. त्यामुळ मतदारांना आता मतदान करण्यासाठी अनेक पर्याय खुले झाले असून त्याचा परिणाम म्हणून विजयासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना चांगलेच झगडावे लागणार आहे. विशेषतः काही प्रभागात प्रमुख राजकीय पक्षांसाठी हे लहान पक्ष डोकेदुखीच ठरणार आहेत.
महापालिका निवडणुकीत 68 जागांसाठी 348 उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात सर्वाधिक जागा 67 जागा भाजप लढत आहेत. त्या खालोखाल 60 जागांवर शिवसेना तर 44 जागांवर राष्ट्रवादीने उमेदवार दिले आहे. कॉंग्रेसला केवळ 20 जागा देता आल्या आहेत. या प्रमुख चार राजकीय पक्षांबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व भारिप बहुजन महासंघ या पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या लहान मोठ्या पक्षाचे उमेदवार राजकीय पक्षांसाठी डोकेदुखीच ठरत आहेत. मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने तीन उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. त्यापैकी आता एका उमेदवाराला आता भाजपने पाठिंबा दिला आहे. प्रभाग 12 मध्ये भाजपच्या उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने पक्षाला या प्रभागात उमेदवार राहिला नाही. त्यामुळे रासपच्या उमेदवाराला भाजपने पाठिंबा दिला आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तीन जागांवर उमेदवार दिले आहे. राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीबरोबर या पक्षाने युती केली आहे. त्यानुसार आघाडीने देखील या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही. परिणामी भाजप व शिवसेनेच्या विरोधात कम्युनिस्ट पक्षाला आघाडीची साथ मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 14 जागांवर उमेदवार दिले आहेत.
मनसेचे पदाधिकारी या 14 जागांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याने आपली सर्व ताकद या जागांवर खर्च करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. त्याचा परिणाम अन्य पक्षांवर होण्याची शक्यता आहे. बसपने 9 जागांवर उमेदवार दिले आहेत. समाजवादी पक्षाचे 4 आपचे 8 असे उमेदवार रिंगणात उभे आहेत. आपने 8 उमेदवार दिले आहे.
या लहान मोठ्या पक्षाच्या उमेदवारांमुळे मत विभागणी होण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षाचे उमेदवार धास्तवाले आहेत. नव्याने प्रभाग रचना झाल्याने प्रभागाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे सर्वच मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य नसले तरी ज्या मतदारापर्यंत पोहचले. त्याची विभागणी होवू नये अशी उमेदवारांची धारणा आहे. परंतू मत विभागणीचा फटका कोणाला बसणार हे आता निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.
अपक्ष 115 रिंगणात
राजकीय पक्षांबरोबरच यावेळी मोठ्या संख्येने अपक्ष आपले नशीब अजमावत आहेत. त्यामुळे देखील राजकीय पक्षांची धास्ती वाढली आहे. अपक्षही काही मते खाणार. त्यातून मतविभागणी होणार त्यामुळे आपल्या मतांचे प्रमाण कमी होणार अशी भिती व्यक्त होत आहे. असे असले तरी राजकीय पक्षांनी आपल्या परीने मतदारांना आकर्षित करण्याचे काम सुरू केले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा