नगर महापालिका रणसंग्राम २०१८: राष्ट्रवादीच्या तालावर नाचतंय कॉंग्रेस 

स्थानिक पदाधिकारी बाजू ठेवून होतंय आघाडीची चर्चा 
समन्वयक नगरला फिरकेना; खर्च कोण करणार ही अडचण 

नगर: अस्तित्वासाठी झगडणाऱ्या कॉंग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न होण्याऐवजी आणखीच खोल खड्ड्यात टाकण्यात येत असल्याचे चित्र सध्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आढळून आले आहे. प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या आदेशाला तिलाजंली देवून आपलेच घोडे दामटविण्यात येत आहे. जागा वाटपाच्या प्रक्रियेत स्थानिक कॉंग्रेसच्या नेत्यांना डावलून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालावरच कॉंग्रेस नाचत असल्याचे दिसत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून आघाडीची चर्चा राष्ट्रवादीबरोबर होत असतांना पडकी बाजूच कॉंग्रेसला द्यावी लागत आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी पक्षाने समन्वयक म्हणुन युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची नियुक्‍त केली.परंतू हे अद्यापही नगरला फिरकले नाही. त्यामुळे अनेक नाराज कॉंग्रेसजन अन्य पक्षाचा मार्ग स्वीकारत आहेत.

महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. दि. 13 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आज चौथा दिवस आहे. येत्या 20 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटी मुदत असून रविवार वगळता केवळ तीन दिवसच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मागी आहेत. शिवसेनेचे 32 उमेदवारांची यादी जाहीर करून उर्वरित उमेदवारांना उमेदवारी निश्‍चित केली आहे. त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार भाजपने देखील 15 जणांची यादी जाहीर करून उर्वरित उमेदवारांना देखील अर्ज भरल्याचे सांगितले आहे. परंतू कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस अद्यापही आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. अर्थात पक्ष उमेदवारी देणार का हा विचार न करता राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरूवात केली आहे.

कॉंग्रेसकडून डॉ. सुजय विखे तर राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप आघाडीची चर्चा करीत आहे. परंतू अद्याप त्यांच्यात जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. कॉंग्रेसने 32 जागांची मागणी केली आहे. परंतू राष्ट्रवादीकडून केवळ 20 ते 22 जागा देण्याची तयारी आहे. राष्ट्रवादी आपल्या भूमिकवर ठाम आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसला नमते घेवून राष्ट्रवादी देत असलेल्या जागांवर समाधान मानावे लागणार आहे. राष्ट्रवादी शहरात कॉंग्रेसपेक्षा निश्‍चित प्रभावशाली आहे.त्यामुळे कॉंग्रेसला राष्ट्रवादीचे नेते जे देतील, त्यावर गप्प बसावे लागणार आहे. परंतू आघाडीत जागा वाटपाची चर्चा करतांना स्थानिक कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते बाजूलाच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहे. लोकसभेचा विचार करून डॉ. सुजय विखे हे राष्ट्रवादीशी आतापासून जुळवून घेत असून त्यात पक्षावर अन्याय होण्याची शक्‍यता आहे. पण हे बोलणार का असा प्रश्‍न पडला आहे. ज्यांच्यावर या निवडणुकीची समन्वयक म्हणून जबाबदारी टाकली हे सत्यजित तांबे नगरकडे फिरकण्यास तयार नाही.

महापालिका निवडणुकीसाठी पक्षाने कोअर कमिटी स्थापन केली होती. या समितीमध्ये विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे व शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण याचा समावेश होता. पण आज ही समिती कोठेच दिसत नाही. ज्यांचा या समितीमध्ये समावेश नाही ते डॉ. सुजय विखे जागा वाटपाची चर्चा करीत आहे. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये नेमके काय चालले आहे. हे कोणाला कळण्यास मार्ग नाही. सध्या जागा वाटपाची गेल्या दोन दिवसांपासून शहरात चर्चा होत आहे. परंतू या चर्चेचा तपशील देखील कोणाला सांगण्यात येत नाही. डॉ. सुजय विखे व आमदार संग्राम जगताप हे चर्चा करीत आहेत. तांबे यांनी या प्रक्रियेतून अंग काढून घेतल्याची चर्चा आहे. तर ना. विखे व आ. थोरात हे देखील या प्रक्रियेपासून दूर आहे. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी आता कॉंग्रेसला रामराम ठोकून अन्य पक्षात प्रवेश करण्यास सुरूवात केली आहे.

पक्षाकडे मागणी नसतांनाही उमेदवारी 

कॉंग्रेस पक्षाने इच्छुकांना उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार 110 जणांचे अर्ज दाखल झाले आहे. परंतू सध्या ज्या इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली नाही. त्यांना उमेदवारी देण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. माजी नगरसेवक धनजंय जाधव यांनी अद्यापही कॉंग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली नाही. तरी त्यांना पक्षाची उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. असे अनेक उमेदवार असल्याचे बोलले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
12 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)