नगर महापालिका रणसंग्राम: प्रचारपत्रकातून कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी गायब 

कॉंग्रेसमध्ये जागा वाटपाचा हिशोब जुळेना : वरिष्ठ नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव 

नगर: कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाची आघाडी आहे. जागा वाटपात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने मित्र पक्षांना प्रत्येकी तीन जागा दिल्या आहेत. आघाडीचे मित्र आणि प्रमुख पक्ष यांच्या प्रचार पत्रकावर मात्र आघाडी गायब झाली आहे. आघाडीचे उमेदवार आपआपल्या पद्धतीने प्रचार पत्रक छापून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. मतदारांच्या नजरेतून हा आघाडीचा प्रचार सुटलेला नाही. एकसंघ दाखविण्यात आजही आघाडीला यश आलेले नाही.
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी-भारतीय रिपब्लिकन पक्ष-कम्युनिस्ट पक्षाची आघाडी आहे. हे तीन प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली आहे.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या प्रचार पत्रकावर प्रमुख नेत्यांसह स्थानिक नेत्यांची नियोजनपद्धतीने छायाचित्र दिसतात. त्या तुलनेत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या प्रचार पत्रकांवर विसंगती दिसत आहेत. कॉंग्रेसचे उमेदवार आपआपल्यापद्धतीने प्रचार पत्रक छापून मतदारापर्यंत पोहचत आहेत. राष्ट्रवादीने प्रचार पत्रकात त्यांच्याच नेत्यांना स्थान दिलेले आहे. आघाडीतील प्रमुख पक्षांच्या प्रचार पत्रकातील विसंगती अनेकांच्या भुवया उंच करू लागली आहे.
महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची चर्चा दीर्घकाळ सुरू होती. शेवटच्या टप्प्यात मित्र पक्षांना बरोबर घेऊन आघाडीच्या जागा वाटपाचे गुऱ्हाळ संपले.

जागा वाटपात कॉंग्रेसला 25 आणि राष्ट्रवादीला 42 जागा आल्या. कॉंग्रेसला आणि राष्ट्रवादीच्या मित्र पक्षांनी प्रत्येकी तीन जागा सोडल्या. त्यानुसार कॉंग्रेसकडे 22 आणि राष्ट्रवादीकडे 42 जागा राहिल्या. परंतु कॉंग्रेसला काही जागांवर उमेदवार मिळेना. त्यामुळे राष्ट्रवादीने त्या जागेवर उमेदवार दिले. राष्ट्रवादी-कॉंग्रेसची काही ठिकाणी मित्रपूर्ण लढत होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सध्या 45 जागा लढवित आहे. कॉंग्रेसचे निवडणुकीच्या रिंगणात 17 च्या आसपास उमेदवार दिले आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा प्रचाराचा नारळ अजून फुटलेला नाही. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपआपल्यापद्धतीने प्रचार सुरू केला आहे. प्रचार पत्रक घेऊन मतदारांपर्यंत पोहचण्यास सुरूवात केली आहे. परंतु या प्रचार पत्रकावर आघाडीबाबत विसंगती दिसत आहे.

कॉंग्रेस-कम्युनिस्ट आमने-सामने 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी-कम्युनिस्ट पक्षाची आघाडी आहे. कम्युनिस्टला प्रभाग 5 (ब), 5(क) आणि 6 (क) सोडले आहेत. परंतु प्रभाग 5 (क) मध्ये कम्युनिस्ट पक्षाविरोधात कॉंग्रेसने उमेदवार दिला आहे. एकप्रकारे या प्रभागात कॉंग्रेस-कम्युनिस्ट आमने-सामने आले आहेत.

कॉंग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव 

कॉंग्रेसमध्ये निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर समन्वयाचा अभाव दिसत आहे. कॉंग्रेसने किती उमेदवारांना “एबी’ फॉर्म दिला याचाच हिशोब जुळत नाही. कोणत्याच स्थानिक नेत्यांना आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांना हा हिशोब सांगता येईना. केडगावच्या राजकीय भूकंपानंतर कॉंग्रेसमधला समन्वयाचा अभाव अधिक पुढे येऊ लागला आहे.

जाधव-बीर यांची आघाडी 

राष्ट्रवादी-कॉंग्रेसची आघाडी असताना माजी नगरसेवक धनंजय जाधव यांची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीने नऊ (ड) मध्ये दिलदारसिंग बीर यांना उमेदवारी दिली होती. जाधव यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. पत्नी सुप्रिया जाधव यांची उमेदवारी कायम ठेवली. दरम्यान, राष्ट्रवादीचे बीर यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
14 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)