शहर काँग्रेसचे निर्णयाचे अधिकार घेतले काढून : ‘सोयरिकी’ च्या राजकारणात काँग्रेस तोंडघशी
नगर – भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महापालिका निवडणुकीतील “सोधा’ राजकारणामुळे शहरात कॉंग्रेस उद्ध्वस्त होऊ घातली आहे. या सोधा राजकारणाची कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी चांगलीच दखल घेतली आहे. यात कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांचा बळी जाण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसचे प्रभारी शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्याकडून पक्षश्रेष्ठींनी राजीनामा लिहून घेतल्याची खात्रीलायक माहिती पुढे येत आहे. या राजीनाम्यावर निवडणूक होताच निर्णय होणार असल्याचे कॉंग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीने महापालिका निवडणुकीत “सोयरिकीचे’ राजकारण सुरू केले आहे. कॉंग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या केडगाव उपनगरात हा “पॅटर्न’ राबविण्यात आला आहे. आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप व कॉंग्रेसचे माजी शहरजिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांच्यातील सोयरीक संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. भानुदास कोतकर याच्यावर विविध गुन्हे दाखल आहे. त्यामुळे त्याला जिल्हाबंदी आहे.
तरी देखील केडगावमधील राजकारणावर त्याचा प्रभाव अद्यापही आहे. कर्डिले-जगताप यांच्या केडगावमधील “सोयरिकी’च्या खेळीत तेही पडद्यामागे असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीने कॉंग्रेसने केडगावच्या दोन्ही प्रभागात उमेदवार न देण्याचा निर्णय घेऊन हे “सोयरिकी’च्या राजकारणावर शिक्तामोर्तब केले आहे. या सोयरिकीच्या राजकारणामुळे कॉंग्रेस पुरती घायाळ झाली आहे. उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आहेत.
“पक्षश्रेष्ठींनी माझ्याकडून कोणत्याही पदाचा राजीनामा घेतलेला नाही. “सोयरिकी’च्या राजकारणानंतर स्थानिक विरोधक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना नामोहरण करण्यासाठी दिशाभूल करणारी माहिती पसरवित आहेत. डॉ. सुजय विखे पाटील आघाडीच्या निर्णयप्रक्रियेत होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्यांनी निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले होते. पक्षश्रेष्ठींनी अगोदर त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा.
– दीप चव्हाण, प्रभारी शहरजिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस
कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या निर्णय प्रक्रियेत कॉंग्रेसची जबाबदारी डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप हे चर्चा करत होते. या निर्णयात कॉंग्रेसच्या पदरी निराशाच आली. कॉंग्रेसच्या वाट्याला 22 जागा आल्या. त्यात केडगाव उपनगराचा देखील समावेश होता. त्यातील काही जागा मित्रपक्षाला देण्याच्या होत्या.
राष्ट्रवादी प्रबळ असलेल्या प्रभागात कॉंग्रेसने उमेदवार दिले नाहीत. परंतु कॉंग्रेसच्या प्रबळ उमेदवारांविरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिले आहेत. त्यामुळे ही आघाडी कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली आहे. केडगावमधील सोयरिकीच्या राजकारणाच्या खेळीमुळे हे आरोप कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून उघड स्वरुपात होऊ लागले आहेत.
कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत हे आरोप गेले आहेत. या निवडणुकीपासून आमदार बाळासाहेब थोरात आणि सत्यजीत तांबे यांचा अलिप्त आहे. या सोयरिकीच्या राजकारणाची कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी विचारणा करण्यास सुरूवात केली आहे. डॉ. सुजय विखे पाटील, प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण हे यावर चुप्पी साधून आहेत. डॉ. विखे पाटील तर सध्या बोलण्याच्या स्थितीतच नाही. या घडामोडीनंतर दीप चव्हाण यांचा पक्षश्रेष्ठींनी राजीनामा लिहून घेतल्याची माहिती समोर येत आहे.
कॉंग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील सूत्रांकडून या माहितीला दुजोरा मिळत आहे. दीप चव्हाण यांच्या राजीनाम्यावर पक्षश्रेष्ठी निवडणुकीनंतर निर्णय घेणार असल्याचे खात्रीलायक समजते. या राजीनाम्यावर आताच काही कार्यवाही केल्यास तिचा निवडणुकीवर परिणाम होईल, म्हणून “वेट आणि वॉचची’ भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे दिसते आहे. पक्षश्रेष्ठींनी दीप चव्हाण यांच्याकडून लिहून घेतलेला राजीनामा म्हणजे या सोयरिकीच्या राजकारणाचे पडसाद आहे. परंतु ही कार्यवाही म्हणजे “वड्याचे तेल वांग्यावर’, असा हा प्रकार असल्याचा सूर कॉंग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांनी आवळला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा