नगर-मनमाड रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

राहुरी, (शहर प्रतिनिधी) – मनमाड राज्य महामार्गावर पडलेले भयानक खड्डे, उखडलेल्या रस्त्यामुळे वाढत चाललेले अपघात राहुरी तालुक्‍यासाठी चिंतेची बाब झाली आहे. 24 ऑगस्ट रोजी ऋषिकेश खैरनार या 18 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा अपघातात जागीच मृत्यू झाला. खैरनार कुटुंबातील अखेरचा दीप दुर्दैवी घटनेत मालवला गेला. असे अनेकजण रस्ते अपघातात दगावले. काहींना कायमचे अपंगत्व आले. हा रस्ता तातडीने दुरूस्त करावा, या मागणीचे निवेदन कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आले.

पावसामुळे झालेले खड्डे आणि राज्य महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक समस्या यामुळे वाढत जाणारे अपघात राहुरीसाठी गंभीर समस्या बनत चालली आहे. वाढते नागरीकरण व रहदारी यामुळे उड्डाणपुलाची मागणी राहुरीवासियांसाठी गरज बनत आहे. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे विदारक चित्र आहे. शहरात मोठ्या उत्साहाने गाजावाजा करून लाखो रुपये खर्चून बसवण्यात आलेले वाहतूक नियमनासाठीचे सिग्नल बंद अवस्थेत आहेत. जिजाऊ चौक व पाण्याच्या टाकीजवळ बसविण्यात आलेले सिग्नल निव्वळ शोभेची वस्तू बनून राहिले आहेत.

शहरातील वाहतूक कोंडी, महामार्गावर अपघातांना कारणीभूत असलेले खड्डे बुजवावेत तसेच वाहतूक नियमनासाठीचे सिग्नल व्यवस्थित चालू करण्यात यावे, उड्डाणपुलाचा प्रश्न लवकर मार्गी लावावा या मागणीसाठी राहुरीतील युवा कार्यकर्त्यांनी नुकतेच प्रशासनाला निवेदन दिले. अपघातविरहीत खड्डेमुक्‍त रस्त्यांसाठी निवेदन देऊन नागरिकांच्या सुरक्षित प्रवास व जीवनासाठी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन राहुरीचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि राहुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना एन.एस.यु.आय. कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बिलालभाई शेख, धनंजय पुरोहित, एन.एस.यु.आय. कॉंग्रेसचे अध्यक्ष जिशान शेख, बबलू रणसिंग, शुभम धाडगे, अय्युब पठाण, आफताब शेख, सचिन शेटे, रेहान शेख, मनोज चौधरी, नीलेश शिरसाठ, जुनेद शेख, साजीद शेख, दीपक गुलदगड, आकीब शेख, सत्यम ताकटे, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)