नगर पाठोपाठ आता श्रीगोंद्यात राजकीय भूकंप

बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष मनोहर पोटे यांचा भाजपला रामराम : माजी मंत्री पाचपुतेंना जोराचा धक्‍का

श्रीगोंदा: श्रीगोंदा नगरपालिकेची दि. 27 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर श्रीगोंदा तालुक्‍यात मोठा राजकीय भूकंप झाला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष मनोहर पोटे, नगरसेवक सतीश मखरे व नगरसेवक गणेश भोस यांनी भाजपला सोमवारी रामराम ठोकला. राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीत प्रवेश केला आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे कट्टर समर्थक असलेले भोस व पोटे यांनी अचानक कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पाचपुतेंना हा जोराचा धक्‍का मानला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर महापालिका निवडणुकीत ज्या पद्धतीने राजकीय भूकंप झाले. त्याच धर्तीवर आता श्रीगोंदा नगरपालिका राजकीय भूकंपांना सुरूवात झाली आहे. सोमवारी सकाळी आघाडीची पत्रकार परिषद येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी भोस व पोटे अचानकपणे समर्थकांसह महाविद्यालयात दाखल झाले. पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी भोस, पोटे व मखरे यांच्या प्रवेशाची घोषणा केली. या तिघांचा सत्कार करून नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व आ.राहुल जगताप यांनी स्वागत केले.
शेलार म्हणाले, बाबासाहेब भोस यांच्यासारखा ताकदीवान नेता आघाडीला यापुढे साथ देणार आहेत. भोस यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत राहू. निवडणुकीचे वातावरण नवीन वर्षांपासून बदलले असे आम्ही भाकीत केले होते ते खरे ठरले.आता कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात नगरपालिका आल्याशिवाय राहणार नाही.

भोस म्हणाले, भाजपने सर्वसामान्यांच्या हिताचे एकही काम केले नाही. सामान्य माणसात भाजप विषयी मोठा रोष आहे. या सरकारमुळे सामान्य माणूस भरडून जात असल्याने भाजपला कंटाळून हा निर्णय घेतला आहे. आ. जगताप म्हणाले, तात्यांची (कुंडलीकराव जगताप) आणि बापूंची (शिवाजीराव नागवडे) भूमिका बाबासाहेब आपण यापुढे बजावणार आहात. शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, या भावनेतून हा निर्णय घेण्यात आला. भगवानराव पाचपुते, विठ्ठलराव काकडे यांनी यासाठी महत्वाची भूमिका बजावली. पोटे म्हणाले, राजेंद्र नागवडे यांच्या सहकाऱ्यामुळे नगराध्यक्ष झालो. शहरात विकास कामे करत असताना विरोधी गटाच्या नरसेवकांनी मोठे सहकार्य केले. ही गोष्ट तेव्हा जाहीर करता येत नव्हती, ही कबुली देत 28 वर्षात जेवढी कामे झाली नाहीत. तेवढी गेल्या 28 महिन्यात झाल्याचे सांगितले. नागवडे, आ. जगताप, शेलार यासह ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते, विठ्ठलराव नागवडे, ऍड. सुभाष डांगे, नगरसेवक दादा औटी, अख्तर शेख, फक्‍कड मोटे, ऍड. सुनील भोस, प्रा. सुनील माने, समीर बोरा, राजेश डांगे, ऍड. ऋषिकेश गायकवाड, कुमार लोखंडे, विकास बोरुडे आद उपस्थित होते.


गटबाजीला कंटाळून हा निर्णय-पोटे

पोटे म्हणाले, मी नगराध्यक्ष झाल्यापासून भाजपमध्ये कुरघोडीच राजकारण सुरू झाले. मला बदनाम करण्यासाठी आप्तस्वकीयांनीच प्रयत्न सुरू केले. माझा बबनराव पाचपुतेंविषयी काही आरोप नाही. मात्र त्यांना ही गटबाजी रोखता आली नाही. प्रामाणिक राहून माझ्यावर कायम आरोपच झाले. भाजपमध्ये स्वाभिमान दुखावला जात होता. अंतर्गत गटबाजीला कंटाळूनच हा निर्णय घेतला.


नगराध्यक्षपदासाठी शुभांगी पोटेंची उमेदवारी
अण्णासाहेब शेलार यांनी नगराध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचे उमेदवार हे शुभांगी मनोहर पोटे हे असतील असे पत्रकार परिषदेत जाहीर केले. उपस्थित पोटे समर्थकांनी यावेळी जल्लोष केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)