नगर पंचायत समितीच्या कारभाराची पीआरसी लावणार चौकशी

अध्यक्ष आ. पारवे यांचे आश्‍वासन; भाजपचे जिल्हा परिषदेतील उपोषण मागे
प्रभात वृत्तसेवा
नगर  – नगर तालुका पंचायत समितीमध्ये सभापती व सत्ताधारी शिवसेना, कॉंग्रेस सदस्यांच्या सुरु असलेल्या बेकायदेशीर कारभाराची पंचायत राज समिती चौकशी करण्याची शिफारस करण्यात येईल. तसेच दोषींवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन पीआरसीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांनी दिल्यानंतर भाजप पंचायत समिती सदस्यांनी जिल्हा परिषदेसमोर सुरु केलेले उपोषण मागे घेतले.
नगर तालुका पंचायत समितीतील बेकायदेशीर कारभाराच्या विरोधात भाजप गटनेते रवींद्र कडूस, बाजार समिती संचालक संदीप कर्डिले, अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.4) सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारातच उपोषण करण्यात आले. यामध्ये पंचायत समिती सदस्या सुनिता भिंगारदिवे, बेबी पानसरे, सारोळा कासारच्या सरपंच आरती कडूस, उपसरपंच जयप्रकाश पाटील, डोंगरगणचे सरपंच कैलास पटारे, बाजार समिती सभापती विलास शिंदे, संचालक हरिभाऊ कर्डिले, रेवण चोभे, यांच्यासह अन्य संचालक, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी जि.प. सदस्य बाजीराव गवारे, बाबासाहेब खर्से, उद्धव अमृते, शीला कडूस, सुमन काळे, अरुण कडूस, विजय धामणे, शरद बोठे यांच्यासह वाळकी, नगरदेवळे, दरेवाडी, बुऱ्हाणनगर गणातील नागरिक सहभागी झाले होते.
पंचायत समितीमध्ये सत्ताधारी शिवसेना, कॉंग्रेसच्या सदस्यांचा सर्व कायदे, नियम पायदळी तुडवत बेकायदेशीर कारभार सुरु आहे. विरोधी भाजपच्या 4 सदस्यांचा निधी, सत्तेचा गैरवापर करत पळवला जात आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे सभापती व सत्ताधारी सदस्य हे संगनमताने मनमानी कारभार करत जनतेशी प्रतारणा करतानाच शासनाचीही फसवणूक करत आहेत. शासकीय कागदपत्रात फेरफार करण्याचे गंभीर प्रकारही उघडकीस आले आहेत. पंचायत समितीच्या दि. 19 मे 2018 रोजी झालेल्या मासिक सभेत विषय पत्रिकेवर नसलेले व सभागृहात कुठलीही चर्चा न झालेले आर्थिक बाबींशी निगडीत विषयाचे ठराव इतिवृत्तात बेकायदेशीरपणे घुसडण्यात आले आहेत. याबाबत तातडीने कार्यवाही करत, बेकायदेशीर ठराव रद्द करावेत. तसेच सत्तेचा गैरवापर करणाऱ्या सभापती व सत्ताधारी सदस्यांचे पद रद्द करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांची पीआरसी अध्यक्ष आ.सुधीर पारवे यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्‍वासन दिले.
धार्मिक फोटो काढण्याचे आदेश रद्द
शासकीय कार्यालयात धार्मिक फोटो लावण्यास शासनाने कुठलीही बंदी घातलेली नसताना आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषदेसह पंचायत समिती व इतर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विविध धार्मिक फोटो लावलेले असतानाही सारोळा कासार ग्रामपंचायत कार्यालयात लावलेल्या धार्मिक फोटोवरून महिला सरपंचास जिल्हा परिषदेसह पंचायत समितीचे अधिकारी त्रास देत आहेत. अशी तक्रार सारोळा कासारच्या सरपंच आरती कडूस व सदस्यांनी आ. पारवे यांच्याकडे केली. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांनी काढलेले आदेश त्वरित रद्द करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)