नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सत्तेची भाकरी फिरविण्याची गरज (भाग एक)

नगर दक्षिण हा उत्तरेच्या मानाने बराच मागासलेला असून, या भागाला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी व हा भागही उत्तरेसारखा सुजलाम्‌ सुफलाम्‌ बनविण्यासाठी लोकसभा मतदारसंघात सत्तेची भाकरी फिरवण्याची गरज निर्माण झाली आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याबरोबरच रिकाम्या हातामुळे वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळ घालण्याचे खूप मोठे आव्हान येणाऱ्या काळात पेलावे लागणार आहे. सिंचन सुविधांच्या अभावामुळे वर्षातून जेमतेम एक पीक घेणाऱ्या व निसर्गाच्या कृपादृष्टीवर अवलंबून राहणाऱ्या या समाजाला मग 6 महिने बाहेर राहून ऊसतोडणी मजूर म्हणून काम करण्याशिवाय पर्याय उरत नाही.

हाताला काम नसल्यामुळे व्यसनाधीनता व आत्महत्यांसारख्या विघातक प्रवृत्तीकडे समाज हळूहळू ओढला जातो. हे थांबवण्यासाठी सिंचन व्यवस्थेबरोबरच शेतीला पूरक जोडधंद्याची व दुग्ध व्यवसायाला चालना देण्याची आवश्‍यकता आहे. नगर दक्षिण भागात ठिकाणी जाणे क्रमप्राप्त ठरते. हा खर्च न पेलल्यामुळे उच्च शिक्षणासाठी मुलांना पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी जाणे क्रमप्राप्त ठरते. हा खर्च न पेलल्यामुळे उच्च शिक्षणाची दारे आपोआपच बंद होतात. म्हणून या भागात महाविद्यालयांबरोबरच वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची संख्या वाढणे गरजेचे आहे.

नगर दक्षिणचा अनुशेष भरून निघण्यासाठी व या ठिकाणी भरीव स्वरूपाच्या पायाभूत कामाबरोबरच डाळिंब, मोसंबी, संत्रा फळांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची, तसेच कापसावर प्रक्रिया करणाऱ्या जिनिंग प्रेसची संख्या वाढणे महत्त्वाचे आहे. कोरडवाहू शेतीतून उत्पादित होणाऱ्या कडधान्यांपासून डाळी तयार करणाऱ्या डाळ मिल्स प्रत्येक तालुक्‍यात उभारल्या तर शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य मोबदला मिळू शकतो. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रत्येक खेड्यात महिला बचत गटाची चळवळ सक्षम होण्याची गरज आहे. कल्याण-विशाखापट्टणम्‌ राष्ट्रीय महामार्गाचे काम बऱ्याच दिवसांपासून रखडलेले असून हा महामार्ग मृत्युचा सापळा बनत चालला आहे.

या कामाला गती देण्याबरोबरच नगर शहरातील उड्डाणपूल तसेच बाह्यवळण रस्त्याचे रखडलेले काम मार्गी लावणे आवश्‍यक आहे. खेड्यापाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची झालेली दुरवस्था बदलावी लागणार आहे. तालुका ठिकाणच्या शहरांना आलेले खेड्यांचे स्वरूप बदलण्यासाठी या शहराचा नियोजनबद्ध विकास होणे गरजेचे आहे. स्वच्छता अभियान फक्त कागदावरच न राहता त्याला मूर्त स्वरूप येणे आवश्‍यक आहे. या सर्व गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येण्यासाठी कालबध्द कृतीआराखड्याबरोबरच सक्षम नेतृत्व गरजेचे आहे. सर्वसामान्य जनतेच्या लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा आहेत हा समज इतका सुबुध्द आहे. साऱ्या राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक आघाड्यावरील समस्या जादुची कांडी फिरवून कोणी सोडू शकेल अशा भाबड्या भ्रमातही तो नाही, पण कोठे तरी या समस्या सोडविण्यासाठी सुरुवात होणे आवश्‍यक आहे.

  अभय आव्हाड 
माजी नगराध्यक्ष, पाथर्डी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)