नगर दक्षिण राष्ट्रवादीकडेच राहणार : अजित पवार

कर्जत-जामखेड जिंकण्याचा पवारांचा विश्‍वास ः नोटबंदीमुळे शेतकऱ्यांकडे पैसे न राहिल्याचा कृषी मंत्रालयाचा अहवाल

नगर –
“नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा निर्णय झाला आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांच्या बाबतीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निर्णय घेतील. तुम्ही नगर लोकसभेच्या जागेबाबत चिंता करू नका,’ असा स्पष्ट खुलासा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नगरमध्ये केला. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार निवडून येणार, असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले आहे. नगरमध्ये राष्ट्रवादी भवन येथे पवार पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हा निरीक्षक दिलीपराव वळसे पाटील उपस्थित होते.

पवार म्हणाले, “लोकसभा निवडणुकीसाठी नगरची जागा राष्ट्रवादीला मिळाली असून 48 पैकी 44 जागांचा निर्णय झालेला आहे. 4 जागांबाबत चर्चा सुरू आहे.’ नगर लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे तयारी करत असल्याचे निदर्शनास आणून दिले असता, “चिंता करू नका, याबाबत कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निर्णय घेतील, असे सांगत या ठिकाणी योग्य उमदेवार देण्यात येईल,’ असे पवार यांनी स्पष्ट केले. पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पवार म्हणाले, “नोटा बंदीचा निर्णय चुकीचा असल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले होते. आजही राष्ट्रवादी त्या मतावर ठाम आहे. सव्वा दोन वर्षानंतर किती काळा पैसा जमा झाला, किती जुन्या नोट्यांचे संकलन झाले, याचा तपशील आरबीआय देवू शकलेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांकडे पैसे राहिलेले नाहीत. त्याचा परिणाम शेतीवर होत असल्याचा अहवाल भाजप सरकारच्या कृषी मंत्रालयाने दिला आहे.’ राष्ट्रीय सर्वेक्षणच्या अहवालानुसार 2017-18 मध्ये देशात सर्वाधिक बेरोजगारी निर्माण झालेली आहे. गंभीर दुष्काळाच्या काळातही, अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. बेरोजगारीची टक्केवारी 6.1 टक्‍क्‍यापर्यंत पोहचली आहे. यामुळेच सरकार बेरोजगारीचा अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करत असल्याचेही पवार यांनी म्हटले.

अण्णा हजारे यांची पवारांनी मागितली माफी

“अण्णा हजारे हे संघाचे एजंट आहेत’ असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज नगरमध्ये नवाब मलिक यांच्या या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत अण्णांची माफी मागितली आहे. अण्णांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे. परिवर्तन यात्रेसाठी अजित पवार आज नगरमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांचे मलिक यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले होते. ते म्हणाले, “अण्णा हजारे यांनी आमच्या सत्ताकाळातही आंदोलने केली. त्यावेळी आम्ही वेळोवेळी आंदोलनाची दखल घेतली. त्यामुळे आंदोलन ताणले नाही. परंतु हे सरकार अजूनही अण्णांच्या आंदोलनाकडे फिरकले नाही. भाजपचे मंत्री महाजन यांना आंदोलनस्थळी येण्यास अण्णांनी नकार दिला. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्रीच अण्णांना भेटायला येणार असल्याची माहिती आपल्या कानावर आली आहे.’

ठाकरेंसह त्यांची व्यंगचित्रे सरकारविरोधातच ः भुजबळ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका भाजप आणि मोदी सरकारविरोधातील भूमिका तीव्र होत चालली आहे. त्यांची सरकारवर टीका करणारी व्यंगचित्रे बरच काही सांगून जातात. महाआघाडीत ते येतील की नाही, ते माहित नाही. परंतु त्यांची भूमिका मोदीविरोधीच राहणार आहे, यात मात्र शंका नाही. राज ठाकरे यांनी महाआघाडीच्या भूमिकेला पुरक अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे ते महाआघाडी बाहेर राहून देखील मोदींना विरोध करत राहतील, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकारवर टिका करताना राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “शेतकरी, बेरोजगारी या मुद्यांवर सरकारने फसवणूकच केली आहे. केंद्राचे हे आर्थिक बजेट देखील घोषणांपुरतेच उरणार आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांची देखील दिशाभूल केली आहे. फसवणूक केली आहे. हे फक्त जुमलेबाज आहे, हे आता अण्णांच्या लक्षात आले आहे.’ राम मंदिराची आठवण निवडणुका आल्यावर होते. सरकार येण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जात आहे. लोकांना मुर्खात काढण्याचा प्रकार भाजपच्या अंगलट येऊ लागला आहे. राज्यातील कोणताही कानाकोपरा सुरक्षित नाही. खून, हत्या, दरोडे, चोरी हे प्रकार सुरूच आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर झाल्याचीही टीका छगन भुजबळ यांनी केली.

पवार यांनी जगताप समर्थकांना फटकारले

महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणारे आमदार संग्राम जगताप समर्थक आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पवार चांगलेच संतप्त झाले. माझे राजकारण करण्याची अशी पद्धत नाही. जगताप समर्थकांना आज रात्री भेटीची वेळ देण्यात आलेली आहे. त्यापूर्वी मी भेटीसाठी अजिबात वेळ देवू शकत नाही, या शब्दात यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. जेऊर येथील सभा संपल्यानंतर पवार यांनी आमदार जगताप समर्थकांना रात्री भेटीसाठी वेळ दिली आहे. या भेटी दरम्यान काय चर्चा होणार याकडे नगर शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

रोहितचा वावर कर्जत-जामखेड जिंकण्यासाठीच !

रोहित पवार हे देशातील साखर कारखान्यांच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. कर्जत-जामखेडमधून मोठ्या प्रमाणात उस आमच्या कारखान्यांना जात आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळत आहे. त्यामुळे रोहित पवार यांचा या मतदारसंघात वावर आहे. यंदा कर्जत-जामखेड मतदारसंघ कोणत्याही परिस्थिती जिंकणारच, असा विश्‍वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

दुष्काळात ऊस उत्पादकांकडे सरकारचे दुर्लक्ष
नगर आणि पुण्यातील धरणाच्या पाण्याचे नियोजन सरकारकडून झालेले नाही. यामुळे उजनी धरणात अवघा 22 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. दुष्काळात शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात सरकार अपयशी ठरले असून केंद्र सरकारकडे 8 हजार कोटींची मागणी केल्यानंतर अवघे 4 हजार कोटी रुपये राज्य सरकारला देण्यात आले आहेत. राज्यात अनेक साखर कारखान्यांचे एफआरपी थकित आहेत. यात भाजपचे प्रमुख नेते असणारे नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, सुभाष देसाई, हरिभाऊ बागडे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांचा समावेश आहे. असे असतांना सरकार साखरेचे भाव 2 हजार 900 वरून 3 हजार 400 करत नाही. यावरून सरकारचे ऊस उत्पादकांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप पवार यांनी केला. सरकारने वेळीच हस्तक्षेप करून एफआरपीचा तोडगा काढणे आवश्‍यक आहे. राज्यातील कारखाने एफआरपी पोटी 80 टक्के रक्कम आणि 20 टक्के साखर देण्याच्या मानसिकतेत आहेत. मात्र, सरकारने त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात कायदा आणि सुव्यस्थेचा बोजवारा उडाला असून विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात दहा दिवसात दहा खून पडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)