नगर तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करावा

ठोकळ यांची मागणी; ग्रामीण अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त

नगर – नगर तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा कांदा, भाजीपाला, फुलांना कवडीमोल भाव मिळत असल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवसस्था उद्‌ध्वस्त झाली आहे. त्याचबरोबर पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने नगर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी कामरगावचे माजी सरपंच वसंतराव ठोकळ यांनी केली आहे.
चालू वर्षी अल्प पावसामुळे नगर तालुक्‍यातील तलावांना पाणी नाही. मागील वर्षी ज्या तलावांना पाणी होते, त्या तलावातील पाणी पातळी खालावलेली आहे. विहिरींना, कूपनलिकांना, विंधन विहिरींना पाणी राहिलेले नाही. शेतकऱ्यांनी कांद्याची रोपे तयार केलेली होती, ती अल्प पावसामुळे जळून गेलेली आहेत. मागील वर्षांच्या कांद्याला निर्यातबंदीमुळे भाव नाही, असे निदर्शनास आणून ते म्हणाले, की कांद्याचा उत्पादन खर्च सरकारनेच नऊ रुपये काढला आहे. तो हिशेब लक्षात घेऊन तरी कांद्याला भाव मिळायला हवा; परंतु भाव नसल्यामुळे खर्चही निघत नाही. शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवश्‍यावर वाटाणा, झेंडू, शेवंतीची लागवड केलेली होती. पाऊस नसल्यामुळे खरीप तर वाया गेला; शिवाय रब्बीचीही आशा राहिलेली नाही. दुधाला योग्य बाजारभाव नाही.
तालुक्‍यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सरकार, लोकप्रतिनिधी, प्रशासन याबाबत कोणतीही उपाययोजना करीत नाही. शासनाने शेतकरी हिताचे कोणतेच निर्णय घेतलेले नाहीत. शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचे काम केले आहे. लोकांच्या हाताला काम नाही.जनावरांच्या चाऱ्यासाठी शासनाने अनुदान द्यावे, तालुक्‍यात टॅंकर सुरू करावेत, दूध उत्पादकांना अनुदान द्यावे, शेतकऱ्यांचे वीज बील माफ करावे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, कांदा निर्यातबंदी उठवावी, आदी मागण्या करून त्या मान्य झाल्या नाहीत, तर नगर तालुक्‍यातील जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ठोकळ यांनी दिला आहे.

-Ads-

झेंडुला 2रू भाव तर शेवंतीला 10 रू प्रति किलो भाव असल्याने शेतकऱ्यांनी फुले तोडल्याचे बंद केलेले आहे. मजूरी खर्च व वाहतूक खर्चही निघत नसल्यामूळे शेतकऱ्यांनी फूले तोडणेच बंद केलेले आहे. तालुक्‍यातील खरीप पिके पुर्ण पणे वाया गेलेली आहेत. खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांनी खर्च मोठ्या प्रमाणात केलेला होता तो खर्चही निघालेला नाही. दरम्यान नगर तालुक्‍यातील गेल्या महीन्यापासुन भोयरे पठार व भोयरे खुर्द या गावाना पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करण्यात आलेले आहेत तर उक्कडगाव व नारायणडोहो या गावातही टॅंकरची मागणी केलेली असून उक्कडगावला पाण्याचा टॅंकर मंजूर झालेला आहे.तर नारायणडोहो बाबतचा प्रस्ताव तहसिल कार्यालयाकडे पाठविलेला आहे. उर्वरित कोणत्याही गावाच्या बाबत पिण्याच्या पाण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे आल्यास त्वरीत वरिष्ठाकडे प्रस्ताव दाखल करण्यात येतील. कोणत्याही गावाला पाण्यासाठी अडचण येऊ दिली जाणार नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)