नगराध्यक्षांना अंधारात ठेवून स्थायीचा परस्पर अजेंडा

उपनगराध्यक्षांचा महिला कर्मचाऱ्यांवर शाब्दिक जाळ

सातारा, दि. 5 (प्रतिनिधी) – नगराध्यक्षांना अंधारात ठेवून स्थायी समितीच्या अजेंड्यावर आपले विषय परस्पर घुसडण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी पालिकेत घडला. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी हट्टाने स्थायी समितीचा प्रस्तावित अजेंडा व टिपण्यांचे कागदच उचलून नेल्याने प्रशासन हतबल झाले. उपाध्यक्षांनी याप्रकरणी कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याची चर्चा असून सातारा विकास आघाडीने मात्र असे काही घडलेच नसल्याचा कांगावा केला आहे. कर्मचाऱ्यांनी कारवाईच्या भीतीपोटी चुप्पी साधली.
संबंधित महिला कर्मचारी दोन तास धाय मोकलून रडल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणाच्या निमित्ताने सातारा विकास आघाडीमधील दुहीचे आणि दहशतीचे कुटील राजकारण समोर आले आहे. या प्रकरणाचा बोभाटा झाल्यानंतर उपाध्यक्षांनी नंतर नरमाईच्या सुरात कर्मचाऱ्यांची समजूत काढत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. स्थायी समितीचा अजेंडा निश्‍चित करून सभा जाहीर करण्याच्या प्रशासकीय हालचाली सध्या पालिकेत सुरू आहेत. डिसेंबर एन्डची गडबड आणि विषय समित्यांच्या सभापती पदांची संपत आलेली मुदत यासाठी स्टॅंडिंगला आपलेच जास्तीत जास्त विषय कसे येतील, यासाठी सातारा विकास आघाडीतल्या काही ज्येष्ठांचा प्रचंड आटापिटा सुरू आहे. विशेषतः वार्षिक दर मंजूरीच्या काही विषयांसाठी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के बुधवारी अचानक आक्रमक झाले. सभासचिवांना सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर चढ्या आवाजात जाळ काढून उपनगराध्यक्षांनी प्रस्तावित अजेंडयाची कागदेच आपल्या दालनात उचलून नेली आणि त्यांचे विषय अंतिम होईपर्यंत कोणीही केबिनमध्ये यायचे नाही, असे फर्मान त्यांनी सोडले. याप्रकाराने प्रशासन सुद्धा हतबल झाले. संबधित कर्मचाऱ्यांनी कानावर हात ठेवले तर काही जणांनी विश्वामित्री पवित्रा घेतला. मात्र, उपनगराध्यक्षांच्या रुद्रावतारामुळे एका महिला कर्मचाऱ्याने भीतीपोटी काम सोडून दोन तास टिपे गाळली. हे रूद्रनाटय दुपारी सुमारे तासभर सुरू होते. मनासारखे सर्व विषयांची तजवीज केल्यानंतर सूर नरमलेल्या उपनगराध्यक्षांनी त्या महिला कर्मचाऱ्याची समजूत घातली. मात्र, साविआच्या दबावतंत्रापुढे प्रशासन सुध्दा अवाक्‌ झाले.

साविआतील गटबाजीला ऊत
नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या स्वाक्षरीने स्थायी समितीचा अजेंडा अंतिम होत असतो. मात्र, अजेंडा अंतिम होताना साविआचे सर्व सभापती व सदस्य समन्वयाने चर्चा करण्याचा संकेत आहे. मात्र साविआतील गटबाजीला ऊत आल्याने काही नगरसेवकांचा नगराध्यक्षांवर अघोषित बहिष्कार आहे. अजेंडा उपनगराध्यक्षांकडे चर्चा करून ठरवायचा आणि सहीसाठी तो नगराध्यक्षांकडे पाठवण्याची तुघलकी पध्दत काही जणांनी शोधून काढली आहे. नगराध्यक्ष माधवी कदम यांची अवस्था तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार अशी झाली आहे. त्यांना अजिबातच सहकार्य होत नसल्याची खदखद पालिकेतलेच कर्मचारी व्यक्त करू लागले आहेत. नगराध्यक्ष हे पद घटनात्मक आहे. त्यांच्या अधिकाराला पडद्याआडून राजकीय सुरुंग लावणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त खासदार उदयनराजे भोसले यांनी करणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)