नगरसेवक मानधनवाढीचा नवीन सभागृहाला लाभ

पिंपरी – महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवड महापालिका नगरसेवकांचे मानधन सात हजार रुपयांवरुन थेट पन्नास हजार रुपये करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहात मांडला होता. मात्र, यावर सभागृहात टीका झाल्याने हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला होता. मात्र, आता नगरविकास विभागानेच अध्यादेश काढत या मानधनात वाढ करुन ते पंधरा हजार रुपये केल्याने महापालिका नगरसेवकांना पन्नास हजारांऐवजी पंधरा हजारांवर समाधान मानावे लागले आहे.

गेल्या वर्षी विधानसभेच्या झालेल्या पावसाळी अधिवेशनात आमदारांचे वेतन वाढविण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले होते. यापासून प्रेरणा घेत, महापालिकेच्या विधी समितीच्या सभेत नगरसेवकांचे मानधन सात हजार रुपयांवरून थेट 50 हजार रुपये करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर 29 ऑगस्ट 2016 ला झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत या विषयावर टीका झाल्याने हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास अकरा महिन्यानंतर नगरविकास खात्याने स्वत:च पुढाकार घेत, नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा अध्यादेश काढला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ब वर्गावारीनुसार या महापालिका नगरसेवकांना आता सात हजारांऐवजी पंधरा हजार रुपये मानधन मिळणार आहे. त्यातही मानधन वाढविण्याचे मनसुबे असलेले अनेक नगरसेवक महापालिका निवडणुकीत पराभूत झाल्याने या वाढीच्या मानधनाचा सभागृहात नव्याने आलेल्या नगरसेवकांना मिळणार आहे, हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)