नगरसेवक बालाजी कांबळे खून प्रकरणी दोघे अटकेत

  • पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचे उघड

पिंपरी – आळंदी नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे हत्येप्रकरणी दोन आरोपींना दिघी पोलिसांनी अटक केली आहे. संतोष माने आणि प्रफुल्ल गबाले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याने, त्यांचादेखील शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी कांबळे यांचा मावस भाऊ कृष्णा घोलप याने दिघी ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी देहूफाटा येथील काळेवाडी झोपडपट्टीमध्ये आकाश जाधव आणि शुभम कांबळे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी बालाजी कांबळे गेले होते. त्या कार्यक्रमात कांबळे आणि या खून प्रकरणातील संशयित असलेल्या अजय नावाच्या व्यक्‍तीशी वाद व झटापट होऊन, शिवीगाळ करत मारहाणीची घटना घडली होती. भांडणानंतर अजय याने बालाजी कांबळे यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यामुळे त्यानेच कांबळे यांचा खून केल्याची फिर्याद कृष्णा राजकुमार घोलप यांनी दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार या गुन्ह्यातील सहभागी माने व गबाले यांना दिघी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा देखील शोध सुरु आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, बुधवारी सकाळी कांबळे यांचा मृतदेह दिघी पोलीस ठाण्यामध्ये दोन तास ठेवून, आरोपींना ताब्यात देण्याची मागणी कांबळे यांच्या नातेवाईकासह जमावाने केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही हयगय होणार नसल्याचे आश्‍वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. त्यानंतर दुपारी पावणे बाराच्या सुमारास आळंदी स्मशानभूमीत बालाजी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका व मोठा जनसमुदाय उपस्थित होता. आळंदीतील पीएमपीएमएल बसथांब्याजवळच स्माशानभूमी असल्याने, अत्यसंस्काराला होणारी गर्दी लक्षात घेत, हा बसथांबा अर्धा किलोमीटर अंतरावर स्थलांतरित करण्यात आला होता.

खुनामुळे देहूफाटा परिसरात तणावाचे वातावरण
बालाजी कांबळे यांच्या खुनाची वार्ता समजताच देहूफाटा परिसरात तणावाचे वातावर निर्माण झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिसांनी बालाजी कांबळे यांनी देहूफाटा झोपडपट्टी परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांन तत्काळ देहूफाट्यावरील चहाच्या टपऱ्यांवरुन पळ काढला. वातावरणातील भयाण शांततेची तीव्रता धीरगंभीर वातावरणात आणखी जाणवत होती. बालाजी यांच्यावरील अंत्यसंस्कारानंतर या परिसरातील व्यवहार सुरळीत सुरु झाले.

वटपौर्णिमेच्या दिवशी पुसले सौभाग्याचं लेणं
दरम्यान, बुधवारी दुपारी आळंदी स्मशानभूमीत बालाजी कांबळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बालाजी यांची आई व पत्नीने केलेल्या शोकाने उपस्थितांची मने हेलावली. सात जन्मासाठी हाच पती मिळावा, अशी मागणी करण्याच्या वटपौर्णिमेच्या दिवशीच बालाजी यांची पत्नी रुक्‍मिणी यांच्यावर सौभाग्य गामावण्याची दुर्दैवी वेळ आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)