नगरसेवक पद रद्द अहवालावर आयुक्तांची स्वाक्षरी

अंतिम मंजुरीसाठी अहवाल नगरविकास खात्याकडे : भाजपचे पाच तर राष्ट्रवादीचे दोन

पुणे – महापालिकेच्या सात नगरसेवकांचे पद रद्द करण्याच्या अहवालावर आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी स्वाक्षरी केली. यासंबंधीचा अहवाल नगरविकास विभागाला पाठविण्यात आला असून, त्यावर नगरविकास विभाग अंतिम शिक्कामोर्तब करतील, असे राव यांनी स्पष्ट केले. पद रद्द झालेल्या सात नगरसेवकांमध्ये सत्ताधारी भाजपचे पाच तर राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनी हा अहवाल सादर केला आहे.

भाजपच्या नगरसेविका किरण जठार, कविता वैरागे, वर्षा साठे, आरती कोंढरे, फरजाना शेख तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रुक्‍साना इनामदार आणि किशोर उर्फ बाळा धनकवडे असे पद रद्द झालेल्या नगरसेवकांची नावे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षित प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. यासंबंधीच्या एका याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर महापालिकेच्या वीस नगरसेवकांची पदे रद्द ठरविली आहेत. न्यायालयाचा हा निकाल सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू झाला आहे.

नगरसेवकांना कामकाजात भाग घेता येणार नाही
नगरसेवकांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना गेल्या आठवड्यात दिले होते. त्यानुसार पुणे महापालिकेतील सात नगरसेवकांची पदे आयुक्त राव यांनी रद्द ठरविली असून, त्यासंबंधीचा अहवाल राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. आता नगरविकास खात्याकडून त्यावर अंतिम आदेश काढले जाणार आहेत. दरम्यान, आयुक्तांच्या आदेशानुसार आता या नगरसेवकांना महापालिकेच्या कामकाजात भाग घेता येणार नाही, त्याचबरोबर त्यांना निधीही खर्च करता येणार नाही. एवढेच नव्हे तर रद्द झालेल्या प्रभागात पुन्हा सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)