नगरमध्ये 11 बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त ; कोतवाली पोलिसांची कारवाई

घुमरेगल्लीत सापडला पत्र्याच्या शेडमध्ये दीड लाखांचा मुद्देमाल

नगर: शहर पोलिसांनी घुमरेगल्लीत छापा घालत तेथून बनावट सौदर्यं प्रसाधने जप्त केली आहे. खालीद खान (रा. तख्ती दरवाजा) व नईम कासम शेख (रा. मुकुंदनगर) या दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दिंगबर गेंट्याल यांनी फिर्याद दिली आहे. नईम कासम शेख याला अटक झाली असून न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत (ता. 8) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिंगबर गेंट्याल यांचे सावेडीतील श्रमिकनगर येथे किराणा दुकान आहे. खालीद खान व त्याचा साथीदार नईम कासम शेख याच्याकडून गेंट्याल यांनी त्यांच्या दुकानातून विक्रीसाठी घाऊक स्वरुपात किराणामाल खरेदी केला होता. लक्‍स साबण, डव शॅम्पू, सुहाना मसाला, ऐव्हरेस्ट मसाला, सर्फ एक्‍सल पावडर, हेड ऍण्ड शोल्डर शॅम्पू, क्‍लिनिक प्लस शॅम्पू, अशी सुमारे 50 हजार रुपयांची सौदर्यं प्रसाधनांचा हा माल होता. या मालाची बिले त्यावेळी नईम शेख याने दिली नाहीत. दोन दिवसात आणून देतो, असे सांगून तो निघून गेला होता. दिंगबर गेंट्याल यांनी या मालाची त्यांच्या दुकानातून विक्री सुरू केली. त्यावेळी ही उत्पादने बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या उत्पादनांची खात्री करण्यासाठी गेंट्याल यांनी काही ठिकाणी चौकशी केली. त्यात ही उत्पादने बनावट आहेत, अशी खात्री पटली. यावर गेंट्याल यांनी कोतवाली पोलिसांकडे जाऊन माहिती दिली.

पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांना दिंगबर गेंट्याल यांनी ही उत्पादने दाखविली. गोकावे यांनी या उत्पादनाची खातरजमा केली. उपनिरीक्षक शिवाजी नागवे यांना बोलावून घेत उत्पादनांची खातरजमा करून घेतली. त्यातही या उत्पादनाबाबत शंकास्पद माहिती आली. गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली नागवे यांनी घुमरेगल्लीतील तख्ती दरवाजा येथे खलीद शेख याच्या राहते घराजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोदामात छापा घालण्यात आला. कोतवाली पोलिसांची ही कारवाई सुरू होताच, खलीद शेख याने तेथून पळ काढला. पोलिसांनी येथून बनावट सौदर्यं प्रसाधनांसह विविध प्रकारचा किराणा मालाचा सुमारे 1 लाख 53 हजार 712 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. खलीद शेख याचा सहकारी नईम कासम शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयासमोर नईम शेख याला हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत (ता. 8) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

अन्न व औषध प्रशासन गाफील…

अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांसह सौदर्यं प्रसाधनापर्यंत कारवाई केली जाते. नगरमधील अन्न व औषध प्रशासनाकडून अद्यापर्यंत अशी कारवाई झाली नाही. पोलिसांनी मात्र ही कारवाई करून, शहरात खाद्यपदार्थांसह सौदर्यं प्रसाधनांची बनावट उत्पादने येत असल्याच्या प्रकाराला दुजोरा मिळाला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून सौदर्यं प्रसाधनाच्या उत्पादनांवर कार्यवाही फक्त कागदोपत्री होताना दिसते आहे.


खाद्यमसाल्यासह विडीपर्यंतचा बनावट माल

एव्हरेस्ट मसाल्याचे नऊ बॉक्‍समधील 200 पाकिटे किंमत 9 हजार रुपये, लक्‍स साबणाचे दोन बॉक्‍समध्ये 360 नग किंमत 8 हजार 640 रुपये, नवरत्न आयुर्वेद तेलाचे तीन बॉक्‍समध्ये 9 हजार 216 पाकिटे किंमत 9 हजार 216 रुपये, बजाज अर्मन ड्रॉप तेलाचा एक बॉक्‍समध्ये 30 पाकिटे प्रत्येकी 100 पाऊच किंमत तीन हजार रुपये, फेअर ऍण्ड लव्हली क्रिमचे दोन बॉक्‍समध्ये 1 हजार 152 पाकिटे किंमत 10 हजार 816 रुपये, हेड ऍण्ड शोल्डर शॅम्पूचे तीन बॉक्‍समध्ये 1 हजार 440 नगर किंमत 2 हजार 880 रुपये, क्‍लिनीक प्लस शॅम्पूचे 16 बॉक्‍समध्ये 15 हजार 360 पुड्या किंमत 15 हजार 360 रुपये, डव शॅम्पूचे 15 बॉक्‍समध्ये 14 हजार 400 पाकिटे किंमत 28 हजार 800 रुपये, हेड ऍण्ड शोल्डर शॅम्पूचे 10 बॉक्‍समध्ये 6 हजार 400 नगर किंमत 19 हजार 200 रुपये, संभाजी विडीचे तीन बॉक्‍समध्ये 144 पाकिटे किंमत 28 हजार 800 रुपये, तीस गोण्यामध्ये एका गोणीत 60 पाकिटे किंमत 18 हजार रुपये, असा एकूण 1 लाख 53 हजार 712 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.


हा व्यापारी ही बनावट सौदर्यं प्रसाधने बाहेरून आणत होता. त्याची माहिती घेतली जात आहे. कारवाई दरम्यान मूळ व्यापारी पसार झाला आहे. तो सापडल्यावर मोठी साखळी उघडकीस येईल.
– नितीनकुमार गोकावे पोलीस निरीक्षक, कोतवाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)