नगरकर बोलू लागले… 

शहरातील प्रभागात तक्रारपेटी असावी 

प्रत्येक प्रभागातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येकजण लोकप्रतिनिधींना भेटून आपली तक्रार सागू शकत नाही. प्रत्येक प्रभागामध्ये तक्रारपेटी असणे, त्यामध्ये प्रभागातील ज्या नागरिकांना काही सार्वजनिक व्यक्‍तिगत अडचणी असतील त्यांनी आपल्या अडचणी त्या तक्रारपेटीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी पर्यंत पोहचविणे शक्‍य होईल. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनीही आलेल्या तक्रारींचाही विचार करणे गरजेचे आहे.
– हेमंत रेड्डी, डिएसपी चौक


शहरातील मोठ्या नाल्यांची स्वच्छता व्हावी 

शहरातील सर्वच नाल्यांमध्ये प्लॅस्टिक आणि जलपर्णींचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाण्याची पातळी वाढून हे मैलामिश्रीत पाणी शहरामध्ये घुसण्याची शक्‍यता असते, त्यातच पूरपरिस्थिती निर्माण होण्याचीदेखील शक्‍यता असते. या नाल्यांची साफसफाई पालिकेमार्फत होणे आवश्‍यक आहे.
– परमेश्‍वर सुपेकर, बालिकाश्रम रोड 


रस्ता दुभाजकांवर वृक्षारोपण व्हावे 

शहरामध्ये रस्त्यांच्या बाजूने किंवा रस्ता दुभाजकावर वृक्षारोपन करून महापालिका होणाऱ्या प्रदुषणाला काहीसा आळा घालू शकते. महापालिकेबरोबर आपणही आपल्या परिसरात मोकळ्या ठिकाणी वृक्षारोपन करून त्यावर तोडगा काढू शकतो. त्या रोपट्यांची योग्य काळजी, पाणी दिल्यास तसेच मोकाट जनावरांपासून त्यांचे संरक्षण केल्यास शहरामध्ये होणाऱ्या प्रदुषणाला काहीसा आळा बसू शकतो.
                            – हर्षल बोडके, निलक्रांती चौक


निवडणूक काळात आश्‍वासनांचा पाऊस 

महापालिका किंवा नगरसेवकांकडे तक्रारी केल्यास त्या तर्क्‍रारींकडे कोणीही लक्ष देत नाही, किंवा त्या तक्रारींवर काही उपाययोजनाही केल्या जात नाहीत, मग आम्ही तक्रार करावी तरी कोणाकडे? निवडणुकीच्या काळामध्ये आश्‍वासनांचा अक्षरशः उमेदवार पाऊस पाडतात, मात्र त्यानंतर काहीच कामे केली जात नाहित. अशी परिस्थिती आम्ही आजतागायत अनुभवत आलो आहोत.
– हृषीकेश भोसले, बुरूडगाव रोड


शहरात पायाभूत सुविधांचा अभाव 

नगर शहरामध्ये पायाभूत सुविधांचाच मोठ्या प्रमाणात अभाव आहे. ज्यावेळी नगरपालिका होती, त्यावेळी नगर शहरामध्ये होणाऱ्या विकासकामांचा वेग अधिक होता, मात्र जेंव्हापासून महापालिका झाली, तेंव्हापासून महापालिकेच्या विकासाचा वेग मंदावलेला दिसून येत आहे. अजूनही हे समजून येत नाही, की मी नगर शहरात राहतो, की खेड्यात राहतो?
– शुभम खवळे, सारसनगर


शहराचा औद्योगिक विकास होणे गरजेजे 

नगर शहरात रस्ता वाहतुकीचे नियम, पाण्याचे व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन या मुलभूत सुविधांचा विकास होण्याची गरज आहे. तसेच शहरामध्ये औद्योगिक दृष्टीने विकास होणे गरजेजे आहे. यामुळे शहरात उद्योगधंद्यात वाढ होऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.
– प्रा. कौस्तुभ यादव, नगर.


वृक्षलागवड करणे आवश्‍यक 

या भागात पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. तसेच नगरमध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण जास्त आहे. त्यादृष्टीने उड्डाणपुल असणे आवश्‍यक आहे. नगर शहर स्मार्ट सिटी होणे अपेक्षित आहे.
– बाबासाहेब मुर्तडक, न्यू आर्टस कॉलेज.


पिण्याच्या पाण्याची समस्या आहे 

या परिसरात रस्ते व पथदिव्यांची व्यवस्था आहे. परंतू पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. या समस्येमुळे कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या नागरिकांची धावपळ उडते. या परिसरात सरकारी रुग्णालयाची आवश्‍यकता आहे.
– अमोल झावरे, शिवाजीनगर.


महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक असावा 

महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक असणे आवश्‍यक आहे. निवडणूकीच्या काळात उमेदवारांनी दिलेल्या आश्‍वासनांची पुर्तता करावी. शहरातील नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, बस या मुलभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे.
– भारत सोळसे, बालिकाश्रम रोड.


मूलभूत सुविधांचा अभाव 

या परिसरात गटारी तुंबतात. तसेच सामान्य नागरिकांना ज्या मुलभूत सुविधा सुविधा असणे अपेक्षित आहे, त्याची पुर्तता होणे आवश्‍यक आहे. मुलभूत सुविधाच उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक समस्येचा सामना करावा लागत आहे.
– प्रा. राजेश पाटणी, प्रोफेसर चौक 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)