नगरकर बोलू लागले… ‘शहरात खड्ड्यांचे साम्राज्य’ 

सांडपाण्याची दुर्दशा 
कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरातील अंतर्गत रस्ते सुस्थितीत नाहीत. रस्त्यावर पथदिवे नसल्याने, महिला तसेच मुलींना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे शक्‍य होत नाही. ड्रेनेजची व्यवस्था होणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यामुळे परिसरात सांडपाणी उघड्यावरूनच वाहते. त्याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवणावर होतो. डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीचे  आजार अधिक प्रमाणात होत आहेत. पाण्याची समस्यादेखील परिसरात भेडसावत आहे.
– प्रसाद वल्लाळ, शिवाजीनगर 

अंधाराचे साम्राज्य 
                              केडगावमधील उदयनराजेनगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. यामुळे बऱ्याचदा दुचाकीस्वारांचा अपघात होतो. या भागात पथदिव्यांची समस्या आहे. कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेमार्फत कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या गाड्यांमध्ये सातत्य दिसून येत नाही. त्यामुळे अनेकदा कचराकुंडीतून कचरा बाहेर पडून रस्त्यावर येत असतो. गटारांचे व्यवस्थापन केले नाही. त्यामुळे सांडपाणी उघड्यावरूनच वाहत असते. परिणामी डासांची उत्पत्ती वाढून साथीच्या आजारांना बळी पडण्याचे प्रमाणदेखील वाढलेले दिसून येत आहे.
– प्रियंका पुंड, केडगाव 

पाण्याची व्यवस्था झाली 
                             अनिल बोरुडे, संजय शेंडगे यांच्या प्रयत्नातून ड्रेनेजलाईन, रस्ता कॉंक्रिटीकरण, पाण्याची पाइपलाइनची व्यवस्था करण्यात आली. प्रभागात एलईडी दिवेही लावण्यात आले. कचरा नेण्यासाठी पालिकेची घंटागाडी नियमित येते. तसेच समोरच कचराकुंडी असल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते.
– दत्तात्रय कोकणे, सुडकेमळा 

शहर विकासाची कामे रखडली 
प्रभागात रस्ते, लाईट, ड्रेनेजची कामे काही प्रमाणात पूर्ण झालेली आहेत. परंतु शहर विकासाच्या दृष्टीने महत्वाची कामे मात्र केली गेली नाही. डीपी रोडचे काम, बागवान मळा अथवा इतर भागातील पालिकेच्या आरक्षित जागेवर सर्वसामान्य जनतेसाठी रोजगार मिळण्याच्या दृष्टीने गाळे, मंगल कार्यालय अशाप्रकारची आवश्‍यक कामे दुर्लक्षितच राहिली. चालू वर्षी ओढे, नाले साफसफाई व दुरुस्ती न केल्याने तापसदृश्‍य आजारांची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. सीना नदी रुंदीकरणानंतर सुशोभिकरण, जॉगिंग पार्क अशी महत्वाची कामे अपेक्षित आहे.
– संतोष सुडके, सुडकेमळा 

जागो-जागी कचराच 
महापालिकेत सत्तेवर असूनही चेंबरची कामे केली नाही. कच्चा रस्ता असून डांबरीकरण व कॉंक्रिटीकरणाचे काम अपूर्ण आहे. प्रभागात पाण्याची लाइन केलेली नसून नागरिकांना बोअरिंग पाण्याचा वापर पिण्यासाठी व वापरण्यासाठी करावा लागत आहे. महापालिकेची कचरा गाडी आतपर्यंत येत नाही. मुकादम अरेरावीची भाषा करतात. सफाई कर्मचारी व्यवस्थित साफसफाई करत नसल्याने सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य आहे. त्यामुळे रोगराई तसेच डेंग्यूसदृश्‍य डासांच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ होऊन नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. तरी नूतन नगरसेवकाकडून वरील कामांचा निपटारा होणे महत्वाचे वाटते.
– शंकरराव सुडके, सुडकेमळा 

शहरात खड्ड्यांचे साम्राज्य 
बालिकाश्रम भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते हे कळत नाही. शहरातील पहिला सिमेंट क्रॉंक्रिटकरणाचा रस्ता करण्यात आला. परंतू या रस्त्यावर खड्डे पडले आहे. त्याचबरोबर रस्त्यावर अत्यंत कमी अंतरावर गतीरोधक टाकण्यात आले आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. महापालिका निवडणूक आल्याने आता सर्वजण आपण कसे चांगले काम करू हे दाखविण्यात व्यस्त आहेत.
– क्रांती गुंड, बालिकाश्रम 

पाण्याच्या समस्या जैसे थेच 
सावेडी भागातील नंदनवननगर परिसरात पाण्याची समस्या मोठी आहे. त्याचबरोबर या परिसरातील रस्त्यांवर पथदिवे नाहीत, ज्या भागात आहेत, तेथील ते बंद अवस्थेत आहेत. या परिसरामध्ये कचऱ्याची समस्या आहे. प्रत्येक रस्त्याच्या बाजूला कचरा पडलेला दिसून येतो. रस्त्यावरील कचरा कुंड्या भरल्यानंतरही महापालिकेमार्फत ते उचलून नेण्यासाठी कचरा गाड्या येत नाहीत. त्यामुळे शहर कधी सुंदर होणार हे कळत नाही.
– पूर्वा शिंदे, नंदनवननगर 

शिवाजीनगरला घाणीचे साम्राज्य 
कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरामध्ये पाणीप्रश्‍न बिकट आहे. त्याचबरोबर या प्रभागामध्ये सांडपाणी व्यवस्थापन करण्यात आले नाही. त्यामुळे प्रभागात डासांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो. त्यामुळेच यावर्षी नागरिकांना आपली दिवाळी गोड करता आली नाही. अनेकांना ही दिवाळी रूग्णालयात साजरी करावी लागली. या परिसरातून वाहणारी सीनानदी हे तर संपूर्ण शहराचे सांडपाणी यामध्ये असल्याने डासांची उत्पत्ती होण्यासाठी पूरक वातावरण अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जावी.
– विशाल बोरूडे, शिवाजीनगर 

ड्रेनेजची दयनीय अवस्था 
सर्जेपुरा परिसरामध्ये ड्रेनेजची अवस्था अत्यंत दयनीय आहे. यामुळे या परिसरात साथीच्या रोगांना सतत आमंत्रण मिळते. त्याचबरोबर याठिकाणी ड्रेनेज बहुतांशी फुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे यामधुन सातत्याने दूषित पाणी वाहत असते. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. परिसरात काही ठिकाणी वृक्षारोपन केले आहे. मात्र महापालिकेमार्फत त्या झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे ही रोपटी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.
– प्रणव भैलुमे, सर्जेपुरा 

कचरा संकलनाची समस्या दूर 
नगरसेवक अनिल बोरुडे आणि डॉ. योगेश चिपाडे यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामे झाली. तसेच आरोग्यविषयक व रस्ताविषयक समस्या सोडविल्या. पूर्वी धुळीने माखलेल्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण केले. कचरा संकलनाविषयी समस्या दूर केली.सुडके मळा भागातील प्रत्येक ठिकाणी पाणी वापरासाठी बोअर उपलब्ध करुन दिले. तसेच जुन्या पाइपलाइनद्वारे जवळ जवळ तीन तास पाणीपुरवठा होतो.
– गणेश सुडके, सुडकेमळा 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)