नगरकर बोलू लागले… मूलभूत प्रश्‍न “जैसे थे’च

मूलभूत प्रश्‍न “जैसे थे’च
डीएसपी चौक, फकीरवाडा ते थेट एकवीरा चौकापर्यंत विस्तारलेला प्रभाग 4 असून मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे. या प्रभागात अंतर्गत रस्ते, धनकचरा संकलन, त्याचप्रमाणे प्रभागात स्वच्छता हा मूलभूत प्रश्‍न आहे. या प्रश्‍नावर अनेक सामाजिक संगठनांनी आंदोलने केली, मात्र याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक कानडोळा केला. या प्रभागात महापालिकेला सर्वाधिक कर संकलन याच प्रभागातून होऊनदेखील मुलभूत सोयी मिळत नाहीत. या प्रभागातील मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत आहे. याच प्रभागात येत्या काळात जिल्हाची प्रशासकीय इमारत होत असुन, यापुढील काळात तरी प्रशासनाने पुढील काळात याकडे गाभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
याच प्रभागात गुलमोहर रोड असुन त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. या रस्त्यावर अनेकदा छोटे मोठे अपघात होत असतात. त्यामुळे या रस्ता दुरुस्तीचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. ठराविक ठिकाणी रस्ते आहेत, मात्र तोही खड्डेयुक्त. या प्रभागात सत्ताधारी व विरोधक यांनी आलटून-पालटून सत्ता उपभोगली आहे, मात्र मूलभूत सुविधांचा प्रश्‍न आहे तसाच आहे.
– लोकेश बर्वे, गुलमोहर रोड

कचऱ्याचे व्यवस्थापन होत नाही
लालटाकी परिसर प्रभागामध्ये कचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रश्‍न आहे. परिसरातील कचरा ज्या ठिकाणी गोळा केला जातो, तो तसाच अनेक दिवस तसाच पडलेला असतो. तो उचलण्यासाठी महापालिकेच्या घंटागाड्या येत नाहीत. त्याचबरोबर प्रभागामध्ये रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्याचबरोबर प्रभागांतर्गत रस्त्यांवर पथदिवे नाहित त्यामुळे रात्री-उपरात्री अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
    – विनय लखोटिया

कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्‍यक
आकाशवाणी परिसरात मुलभूत सुविधा उपलब्ध आहेत. मात्र या परिसरात कचऱ्याचे व्यवस्थापन होणे आवश्‍यक आहे. कचराकुंड्याची निगा राखणे आवश्‍यक आहे. कचऱ्याची गाडी दररोज येत असली तरीही रस्त्याच्या कडेला टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी येते. वळणावरील रस्ता खराब असल्यामुळे अपघात होतात.
– अशोक इंदापूकर, आकाशवाणी परिसर.

शहरांतर्गत बस सुविधा असावी
प्रोफेसर चौक परिसरात रस्ते, पथदिवे, पाण्याची व्यवस्था आहे. कचऱ्याची गाडी नियमित येते. पिण्याची पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र शहरांतर्गत बस सुविधा नसल्याने खासगी वाहनाने प्रवास करताना अधिक पैसे खर्च होतात. यासाठी महापालीकेने शहरांतर्गत बस सुविधा सुरु करावी.
– राजेश हर्दवाणी, प्रोफेसर चौक

नुसती चर्चा आणि आश्‍वासने नकोत
शहराची आज जी दैना आहे, त्याला प्रशासनापासून ते लोकप्रतिनिधीपर्यंत सर्वच बाजू कारणीभूत आहेत. या निवडणुकीतही राजकीय पक्ष आणि त्यांच्याकडून इच्छुक असलेले उमेदवार तेच आहेत. काही लोकप्रतिनिधी दल बदलले आहेत. ती पुन्हा तिच आश्‍वासने देणार. म्हणजेच शहराचा विकास पुन्हा बोंबलला. राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडूण आलेल्यांनी नगरसेवक झाल्यावर संपूर्ण शहराच्या विकासासाठी प्रयत्न करायचे असतात. तेच होताना दिसत नाही. शहराचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्यावरच पुन्हा मतदार म्हणून भाष्य करणे चुकीचे ठरेल. लोकप्रतिनिधींनी सेवक म्हणून त्यावर काम केल्यास आम्हाला बोलण्याची संधी मिळणार नाही, हे पहावे.
– भास्कर कसोटे, बिशप लॉईड कॉलनी

महापालिकेच्या बस सुरू व्हाव्या
एमआयडीसी, संभाजीनगर परिसरामधून ज्येष्ठ नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना शहरामध्ये येण्यासाठी रिक्षासाठी मोठा खर्च सहन करावा लागतो. कॉलेजसाठी येण्या-जाण्यासाठी अधिक खर्च सहन करावा लागत आहे. बससुविधा सुरू होऊन, बसेसची योग्य ती काळजी घेतली जावी.
– हृषिकेश तोरडमल, संभाजीनगर

पाण्याची अनियमितता टाळावी
केडगावमधील भूषणनगर परिसरातील रस्त्यांना खड्डे पडलेले दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते विविध कारणांसाठी खोदून ठेवले आहेत, मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची डागडूजी केली नाही. त्याचबरोबर पाणी पुरवठा वेळेवर होत नाही.
– सिद्धांत ससाणे, भूषणनगर

नागरिकांमध्ये जागरुकतेचा अभाव
ऐन दिवाळीत निवडणूक तोंडावर आल्यावर लोकप्रतिनिधींनी मिठाईचे बॉक्‍स वाटायला सुरुवात केली. लोक विचारतात की चार वर्षे भेट दिली नाही ती आता का देता, एवढे प्रेम कसे उतू आले? एकीकडे काही प्रभागांमध्ये रोडची कामे अपूर्ण आहेत. सरकारने एक नियम करायला पाहिजे “रिकॉल टू नगरसेवक’ म्हणजे जर जनतेच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर जनतेने आधीच्या नगरसेवकाच्या जागी दुसरा नगरसेवक आणून त्याला संधी द्यायला हवी. लोकप्रतिनिधी पैसे आणि निधी अभावी कामे रखडली आहेत असे म्हणतात. नागरिकांमध्ये जागृकतेचा अभाव असल्याने लोकप्रतिनिधींचे फावते आहे. आपण आयुक्‍तांना सुद्धा प्रश्‍न विचारू शकतो कारण रस्त्यांसाठी मिळणारा निधी आपणच आपल्या करांमधून भरत असतो मात्र हे नागरिकांना माहित नाही.
– प्रदीप पुरोहित

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)