नगरकर बोलू लागले…’मतदार अजूनही अस्थिरच!’

मतदार अजूनही अस्थिरच!
बेरोजगारी दूर करण्यासाठी लघुउद्योगांना चालकांना देणे गरजेचे आहे. महापालिका लोकप्रशासन आणि प्रशासन या दोन्हींकडून ते होताना दिसतच नाही. गेल्या दहा ते 15 वर्षात नगर शहरात एकही उद्योजकाची निर्मिती झालेली नाही. हे कोणाचे अपयश आहे, हे या निवडणुकीच्या निमित्ताने उहापोह होईल का? मतदान लोकशाहीच्या विकासासाठी करावेच लागते. हेच मतदान करून विकास होत नसेल, तर दाद कोणाकडे मागायची. लोकप्रतिनिधी मोठे होत चाललेत, त्यातुलनेत लोकशाहाची महत्त्वपूर्ण गाभा असलेले मतदार अजूनही अस्थिर आहेत.
– प्रमोद जाधव, एमआयडीसी

चांगल्या शिक्षणाचा अजेंडा हवा
युवक-युवतींना चांगले शिक्षण हवे. त्यासाठी शासकीय कॉलेज नगरमध्ये हवे. शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाकडे अजेंडा नाही. तो असायला हवा. राजकीय पक्षांचे राजकारण अंतर्गत असू द्यावे. त्याचा शहर विकासावर परिणाम होता कामा नये. प्रत्येक क्षेत्रात राजकारण आणल्याने नगरचा विकास खुंटला आहे. परिणामी नगरचा युवक स्थलांतरीत होऊ लागला आहे. नगरच्या विकासाच्या दृष्टिने ही धोक्‍याची घंटा आहे. लोकप्रतिनिधींनी त्याचा अभ्यास करून, या निवडणुकीत विकासाचा अजेंडा ठेवावा.
– योगेश मोटे, माळीवाडा

तेच निरंतर प्रश्‍न, तेच मुद्दे
रस्ते, पाणी, आरोग्य, नागरी सुविधा, पथदिवे या मूलभूत प्रश्‍नांवर निरंतर काम सुरू आहे. तरी देखील ती सुटलेली नाहीत. तेच-तेच प्रश्‍न घेऊन लोकप्रतिनिधी निवडणुका लढवित आहेत. मतदार देखील त्याच-त्याच मुद्यावर मतदान करत आहेत. युवक-युवतींचा आता कल बदलला आहे. शहराच्या विकासाचा जो गती देईल, त्याचा मतदान होणार आहे.
– तेजस थापा, पटवर्धन चौक

सिग्नल दुरुस्त करून दाखवा
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेला अजून सिग्नल व्यवस्थित करता आलेले नाहीत. ते अगोदर दुरुस्त करण्याचे शिवधनुष्य इच्छुक उमेदवारांनी पेलावे. शहरातून जाणाऱ्या महामार्गावर झालेल्या अपघातात शेकडो जणांचा बळी घेतलेला आहे. आजही बळी जात आहेत. तेवढेत कायमचे जायबंदी झालेले आहेत. तरी देखील हा प्रश्‍न लोकप्रतिनिधींना गंभीर वाटत नाही, हे दुर्दैवी आहे.
– सनी मघाडे, झेंडीगेट

पथदिव्यांचा प्रश्‍न गंभीर
केडगावमधील शिवाजीनगर परिसरातील पाणी पुरवठ्यामध्ये अनियमितता आहे. तसेच प्रभागातील काही भागामध्ये पथदिवे नाहीत. महापालिकेच्या कर्मचारी स्वच्छता केली जाते, मात्र कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या वेळेवर येत नाहीत. त्यामुळे कचरा इतरत्र पसरतो. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
– योगेश पालवे, शिवाजीनगर

रस्ता दुुभाजकावर रिफलेक्‍टर बसवावेत
प्रभागात भूमिगत गटारे व रस्त्यांची कामे केली आहेत. मात्र रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने रात्री रस्त्यावरुन पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या भागातील रस्त्यावरील रस्ता दुभाजकांची दुरावस्था झाली असून यामुळे येथे अनेक अपघात झाले आहेत. या भागात रस्ता दुुभाजकावर रिफलेक्‍टर बसवणे आवश्‍यक आहे.
– रमेश व्यकंटेश चिप्पा, गुलमोहर रोड

चोऱ्यांना आळा घालणे आवश्‍यक
प्रभागात कचरा गाडी वेळेवर येते, रस्ते सुस्थितीत आहेत. परिसर स्वच्छ आहे. मुलभूत सुविधा उपलब्ध आहेत. परंतू या भागातील पथदिवे बंद असल्याने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. घरासमोरुन अनेक दुचाकींच्या चोऱ्या होत आहेत. या भागातील चोऱ्यांना आळा घालणे आवश्‍यक आहे.
– लखन कुकरेजा, सावेडी रोड

परिसरात साफसफाई होणे गरजेचे
या प्रभागात अंतर्गत रस्ते, पाण्याची व्यवस्था आहे. पथदिवे सुस्थितीत आहेत. येथील मुख्य रस्ता दुरुस्त करणे आवश्‍यक आहे. परिसरात साफसफाई होणे गरजेचे आहे. दुचाकी वाहनांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने, त्याचा बंदोबस्त करणे आवश्‍यक
आहे.
– भारत चोभे, निर्मलनगर

रस्त्यांची डागडुजी आवश्‍यक

शिवनगर परिसरात पिण्याचे पाणी दररोज येत नसल्याने, नोकरीसीठी बाहेर जाणाऱ्यांची तारांबळ होते. पथदिव्यांची व्यवस्था आहे. रस्त्यांची डागडूजी करणे आवश्‍यक आहे. परिसरात स्वच्छता करणे गरजेचे आहे. कचरा गाडी दररोज आल्यास परिसर स्वच्छ राहील.
– ईश्‍वर परभणे, शिवनगर.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)