नगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा

शहर बससेवा सुरू करावी

शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा सुरू करण्याची गरज आहे. पूर्वी पेट्रोलचे दर 91 रूपयापर्यंत गेले, तेंव्हा रिक्षावाल्यांनी मनमानी भाडे वाढविले. पेट्रोलच्या दरात कपात होवूनही रिक्षाभाडे कमी झाले नाही. रिक्षामध्ये मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जातात, विद्यार्थी तसेच स्त्रीयांची यावेळी कुचंबना होते, अशावेळी वाहतूक पोलीस कुठे जातात, शहरातील रिक्षाचालकांना धडा शिकवून सर्वसामान्यांची गैरसोय दूर करण्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांनी एकत्र येवून शहर बससेवेचा प्रश्‍न मार्गी लावावा.

– रोहिदास कांबळे, अभियंता कॉलनी, नगर


रस्त्यावरील खड्डे बुजविणे गरजेचे

शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. रस्त्यावरील खड्डयांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. यामुळे शहरातील विद्यार्थी तसेच दररोज प्रवास करणाऱ्यांमध्ये मनक्‍याच्या आजारांचे बळी अधिक दिसून येतात, या रस्त्यांवरील खड्ड्यांची वेळोवेळी दुरूस्ती केल्यास अशा आजारांना बऱ्याचशा प्रमाणात आळा घातला जाईल.

– गणेश बाचकर, एकविरा चौक


तरुणांना रोजगाराच्या संधी द्याव्यात

तरूणांविषयी शिक्षणाची धोरणे, नोकरीची धोरणे अवलंबण्यासाठी महापालिका उदासिन आहे. आज तरूणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण त्यामध्ये सर्वाधिक असल्याचे समजून येते. या बेरोजगारीतून तरूणांना बाहेर काढण्यासाठी पालिकेने यावर उपाययोजना आखल्या पाहिजेत. जेणेकरून या समस्या दूर करण्यास हातभार लागेल.

– आशुतोष गुंड, सावेडी


शहरातील अतिक्रमणे काढावीत

शहरामध्ये अतिक्रमण करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. प्रत्येक प्रभागामध्ये अतिक्रमण केलेले आपण पाहतो, त्यामुळे रस्त्यांची रूंदी कमी होत असून, वाहतूकीची कोंडी वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या अतिक्रमण धारकांवर महापालिकेचा वचक नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.

– अक्षय कळमकर, बालिकाश्रम रोड


महापालिकेने रुग्णालयांची संख्या वाढवावी

महापालिकेने आपले रूग्णालय अद्ययावत करण्याची अत्यंत आवश्‍यकता आहे. नगर शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महापालिकेच्या रूग्णालयामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवांवर काही निर्बंध येतात, त्यामुळे महापालिकेच्या रूग्णालयाचा विस्तार करणे किंवा दुसरे एखादे पर्यायी रूग्णालय सुरू करण्याची गरज आहे.

– गणेश येवले, समर्थ कॉलनी


पैसे घेऊन मतदान करणे टाळा

निवडणूकांत पैसे घेवून जनता मतदान करते, आणि पाच वर्षे विकासाच्या दृष्टीने बोंब होते. पैसे घेऊन मतदान करणे मतदारांनी टाळायला हवे. पैसे न घेता मतदान केल्यास नगरसेवकांना आपल्या परिसराचा विकास करा असे, ठणकावून सांगू शकतो, मात्र तेच जर आपण पैसे घेवून मतदान केल्यास आपल्याला तो अधिकार राहत नाही.

– अक्षय भिसे, लालटाकी


पोकळ आश्‍वासनांचा पाऊस

नगरसेवकांकडून आता आपापल्या प्रभागात नूसत्या आश्‍वासनांचा पाऊस सुरू आहे. मात्र निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षे तोंड दाखविणार नाहीत. नगरसेवकांनी आश्‍वासने कमी आणि आपल्या प्रभागात कामे अधिक करण्याकडे लक्ष केंद्रीत करावेत.

– विष्णू कासार, दिल्लीगेट


उड्डाणपुलाचा प्रश्‍न सोडवावा

नगर शहरामध्ये उड्डाणपूल होणे अत्यंत गरजेचे आहे. नगर शहर हे व्यापारी दृष्टीकोनातून मध्यवर्ती शहर आहे. पुणे, नाशिक, विदर्भ या सर्व विभागांना जोडणारे मार्ग नगर शहरातून जातात, शहरात मात्र वाहतूक कोंडी हा नगरकरांच्या दिनचर्येचा विषय बनलेला आहे. यावर एकच उपाय म्हणजे महापालिकेने उड्डाणपूल बांधणे होय.

– धन्यकुमार हराळ, कायनेटीक चौक


महापालिकेने अनाथाश्रम सुरू करावेत

पालिकेने वृद्धाश्रम व अनाथाश्रम सुरू करण्याची गरज आहे. निराधारांना आधार देण्याचे काम करावे, त्यांना आपले कोणीतरी असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल. अशा निराधार मुलांना मायेचे एक छत मिळाल्यास ते समाजविघातक कृत्याकडे वळणार नाहित. ते एक सुज्ञ नागरिक होण्याचे स्वप्न आपल्या उराशी बाळगतील.

– गायत्री चव्हाण, सिद्धार्थनगर


नगरकरांना मूलभूत सुविधा द्या

नगर आजही सर्वात मोठे खेडे म्हणून पाहिले जाते. महापालिका झाली तरी अद्यापही नगरकरांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. रस्ते, पाणी, आरोग्य, पथदिवे या समस्या आजही जैसे थेच आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस व भाजप या चारही प्रमुख पक्षांची महापालिकेत सत्ता होती. परंतू एकाही पक्षाने मूलभूत प्रश्‍न सोडविण्याकडे लक्ष दिले नाही. शहरातील रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर या ठिकाणी वर्षानुवर्ष कामे होता की नाही असा प्रश्‍न पडतो. रस्त्यावर कचरा जागो-जागी साठलेला असतो. तो कधी-कधी उचलला जातो. साडंपाणी ही तर नगरची समस्या कधी सोडविता आली नाही. आजही महापालिका निवडणुकीत रस्त्यावर सांडपाणी वाहत आहे. त्यातून उमेदवार जात असून घरोघरी प्रचार करीत आहे. परंतू ही समस्या सोडू असे कोणीच म्हणत नाही. केवळ दुसऱ्याने काय केले हे आरोप करून आपली हुशारी दाखविण्यात धन्यता मानत आहे. नगर कधी होणार पुणे व नाशिक हे सर्व पक्षांनी प्रथम जाहीर करावे, मग निवडणूकीला समोरे जावे.

– सीमा कुलकर्णी, शिवाजीनगर


 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)