नगरकर  बोलू लागले… दूषित पाण्याचा प्रश्‍न गंभीर 

धोकादायक इमारतींकडे लक्ष देण्याची गरज 

मंगल गेट परिसरात तसेच शहराच्या इतर भागामध्ये जून्या काळातील इमारती आहेत. महापालिकेने या इमारती धोकादायक असूनदेखील या इमारतींमध्ये नागरिक राहतात, पावसाळ्यात अशा जून्या इमारती कोसळण्याची दाट शक्‍यता असते, यामध्ये अनेकांना आपले प्राणदेखील गमवावे लागतात, अशा घटना होण्यापूर्वीच त्या पाडल्या जाणे अपेक्षित आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहाणी होणार नाही. महापालिकेमार्फत यावर कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
– सोनल कोथंबिरे, मंगल गेट परिसर


 महापालिका शाळा डिजिटल करा 

आजमितीस महापालिकेच्या शाळांची अवस्था दिवसेंदिवस अतिशय बिकट होत आहे. सर्व जग डिजीटल युगाकडे वाटचाल करत आहे, मात्र महापालिकेच्या शाळा मात्र आज फलकावरच धडे गिरवले जातात, ना विद्यार्थ्यांसाठी बसण्यासाठी बेंच, ना इतर सुविधा, गरिब कुटूंबांना खासगी शाळांचा खर्च उचलणे शक्‍य होत नाही, त्यामुळे आपल्या पाल्यांना ते महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण देतात, आज महापालिका अधिकार क्षेत्रातील शाळा जर डिजीटल झाल्या नाही, तर खासगी शाळेतील विद्यार्थी आणि महापालिकेतील विद्यार्थी यांचा मेळ बसणे शक्‍य होणार नाही. याकडे महापालिकेने कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे.
– निकिता रायकर, पटवर्धन चौक 


सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे 

केडगाव परिसराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. केडगाव भागाचा विकास हा नातेसंबंधाच्या चक्रव्युहामध्ये कायमच अडकलेला दिसून येतो. या चक्रव्युहातून आतातरी जे निवडून येणारे नगरसेवक असतील, ते तरी यातून बाहेर काढतील का असा प्रश्‍न आम्हा केडगावकरांना पडला आहे.

– शुभम शिंदे, केडगाव 


महापालिकेमार्फत वसतिगृहांची सुविधा करावी 

बालिकाश्रम परिसरात अनेक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी राहतात, हे विद्यार्थी केवळ नगर शहरातील नसून ते ग्रामीण भागातीलदेखील असतात, यामधील काहींना खोलीभाडे देणेदेखील शक्‍य नसते, अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी महापालिकेमार्फत वसतिगृहांची सुविधा करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे भावी अधिकाऱ्यांना घडविण्यात
आपला हातभार लागेल.

– छाया लांडगे, बालिकाश्रम रोड 


राघवेंद्रस्वामी मठ रस्त्याची दुरुस्ती व्हावी 

बोल्हेगाव फाटा ते राघवेंद्रस्वामी मठ रस्ता हा त्यंत खराब बनला आहे. तो अनेक ठिकाणी खोदून ठेवला आहे. मात्र त्याची दुरूस्ती केली गेली नाही. परिसरामध्ये त्याचबरोबर पाणी पुरवठ्यामध्ये अनियमितता आहे. परिसरामध्ये उद्यान व्हावे, त्याचबरोबर वाचनालय होणे अपेक्षित आहे. परिसरामध्ये पथदिवे काही प्रमाणात आहेत, मात्र काही बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

– सिद्धेश्‍वर मेटे, बोल्हेगाव फाटा 


रस्त्याच्या दुरवस्थेने अपघातांना निमंत्रण 

या प्रभागात रस्त्यावरील खड्डे चुकवताना अनेकदा अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील रस्ते दुरुस्त करणे आवश्‍यकत आहे. तसेच परिसरात रस्त्याच्या कडेला कचराकुंड्याचे व्यवस्थापन नसल्याने अनेकदा रस्त्यावर कचरा टाकला जातो. या परिसरात ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी गार्डन असावे.
– सुभाष सावंत, गुलमोहर रोड. 


चितळे रोडवर वाहतूक कोंडीचा प्रश्‍न 

चितळे रोड परिसरात वाहतुुकीची कोंडी हा तर दैनंदिन उपक्रमच बनलेला आहे. परिसरात भाजीविक्रेते रस्त्याच्या बाजूलाच बसलेले असतात, त्यामुळे वाहनचालक भाजी फळे खरेदी करण्यासाठी आपली वाहने उभी करून खरेदी करतात, त्यामुळे वाहनांची कोंडी अधिक प्रमाणात होते. त्या भाजी विक्रत्यांना महापालिकेने जागा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.
– नामदेव भोंदे, चितळे रोड. 


दूषित पाण्याचा प्रश्‍न गंभीर 

सावेडी उपनगरातील वैदूवाडीत मागील दहा वर्षांपासून मलमिश्रीत पाणीपुरवठा होत आहे. यामुळे पोटाचे आजार तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. त्याचा वाईट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. मात्र आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल नगरसेवकांकडून घेतली नाही, त्यामुळे परिसरात रोगराई मोठ्या प्रमाणात होत आहे. गावठाण भाग असल्याचे असे दिवस काढावे लागत आहेत.

– अशोक शिंदे, वैदुवाडी 


अतिक्रमणाने रस्त्यांची दुरवस्था 

वाणीनगर ते तागडवाडी रस्ता हा अनेक वर्षांपासून रस्ता नादुरूस्त आहे. मध्यंतरीच्या काळात रस्ता दुरूस्त करण्यात आला, मात्र तो काही कालावधीतरच खड्डेयुक्‍त झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मनका, तसेच सांध्याचे आजारांना सामोरे जावे लागत आहे, तसेच या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने येण्याजाण्यासाठी कमी रस्ता राहिला आहे. परिसरामध्ये एक सांडपाण्याचा नाला जात आहे, तो उघडाच असल्याने दुर्गंधीबरोबरच डासांचे प्रमाण वाढत आहे. परिसरात साथीचे आजार पसरत आहेत.

– अनिकेत थोरात, तागडवाडी 


पथदिव्यांची दुरुस्ती गरजेची 

सिव्हील हडको परिसरातील रस्त्यांचा प्रश्‍न गंभीर आहे. त्याचबरोबर या भागात अनेकदा अशुद्ध पाणी येते, त्यामुळे पोटाचे आजारांचे प्रमाण वाढले आहे. तसेच या प्रभागामध्ये पथदिव्यांचा मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे रात्री उपरात्री परिसरात काळोख पसरलेला असतो. तसेच मोकाट कुत्र्यांचा उपद्रव आजही जैसे थेच आहे. काही ठिकाणी कचराकुंड्या गरजेच्या आहेत. चेंबरलाईन जून्या झाल्यामुळे सदोष आढळून येतात, अनेकदा त्यातून सांडपाणी बाहेर येऊन परिसरात दुर्गंधी पसरते.
– धीरज शहा, सिव्हिल हडको 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)