नक्‍कल केल्याच्या संशयावरून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

पिंपरी – नक्कल केल्याचा संशय घेऊन एका शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. तसेच त्याला घरी न सोडता शाळेतच डांबून ठेवले. ही घटना बुधवारी (दि. 2) सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बोऱ्हाडेवाडी शाळेत घडली.

बबिता महादेव खोचरे (वय-35, रा. चंद्रकांत महादेव फुगे चाळ, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शाळेतील हिंदी विषयाचे शिक्षक व्यंकटेश कळसाईत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेची नूतन महानगर प्रशाला ही शाळा आहे. या शाळेत फिर्यादी यांचा मुलगा शंकर महादेव खोचरे (वय-14) हा इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे. बुधवारी शेवटच्या हिंदी विषयाच्या तासाला शिक्षक कळसाईत हे वर्गात शिकवत होते. कळसाईत यांनी एका विद्यार्थिनीला आडनावाने हाक मारली, त्यानंतर पुन्हा तशीच हाक विद्यार्थ्यांमधून आली. यावर चिडलेले शिक्षक कळसाईत यांनी शंकरनेच आपली नक्कल केल्याचे समजून त्याला छडीने पाठीवर वळ उठेपर्यंत शिक्षा केली, यात शंकर गंभीर जखमी झाला आहे. तसेच शाळा सुटल्यानंतर त्याला घरी जाऊ दिले नाही, त्याला वर्गातच डांबून ठेवले, असे फिर्यादीत म्हटले आहे. घरी आल्यानंतर शंकरने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

दरम्यान, मारहाण करणारे शिक्षक व्यंकटेश कळसाईत यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, वर्गात विद्यार्थांचा गोंधळ सुरू होता. एका विद्यार्थिनीला मी आडनावावरून शांत बसण्यास सांगितले. त्यावेळी माझी बोबडी वळली तेच ऐकून वर्गातील विद्यार्थी संबंधित मुलीला चिडवत होते. ते पाहून त्याला हाताने मारले. त्यानंतर शंकर हा उद्धटपणा करीत दुसऱ्या विद्यार्थ्याचे नाव घेत एका मुलीला चिडवत होता. याविषयी मुख्याध्यापकांना माहिती दिली होती, असे सांगत त्यांनी शंकरला डांबून ठेवल्याच्या आरोपाचा इन्कार केला.

कडक शिक्षा करा- बबिता खोचरे
शंकर खोचरेला अतिशय बेदम मारहाण करण्यात आली असून, अशा प्रकारच्या वागणुकीमुळे मुलांना शाळेत जाण्याची भिती वाटेल. त्यामुळे या शिक्षकांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी शंकरची आई बबिता खोचरे यांनी केली आहे. तसेच कळसाईत यांची बदली तातडीने इतर शाळेत करावी अन्यथा तक्रार केली म्हणून ते आपल्या मुलाला वेगळी वागणूक देतील अशी भीतीही बबिता यांनी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)