नको पक्षांची मगजमारी ; आता दोस्तांची “दुनियादारी’!

प्रभात लोकसंवाद

– अधिक दिवे
पिंपरी – पिंपरी-चिंचवडमधील राजकीय नेत्यांनी पक्षाच्या चौकटीबाहेर जावून आपआपल्या नेत्यांचे समर्थक करण्याचे चित्र नवे नाही. मात्र, त्याच धर्तीवर आता शहरातील राजकारणात “नको पक्षांची मगजमारी, चालणार आता दोस्तीची दुनियादारी’ अशी स्थिती पहायला मिळत आहे. उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या वाढदिवसाला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना नगरसेवकांनी जाहिरपणे फ्लेक्‍सबाजी केली. दोस्तीच्या नावाखाली आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नवोदितांनी स्वतंत्र आघाडी उघडण्याचे नियोजन केल्याचे स्पष्ट होत आहे.

-Ads-

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या काळात कॉंग्रेसचा दबदबा होता. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचा “ताबा’ घेतला. कॉंग्रेसमधील अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागले. काही नगरसेवकांनी कॉंग्रेसमध्ये राहून राष्ट्रवादीचे काम केले. दरम्यान, 2014 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भोसरीतील अपक्ष आमदार महेश लांडगे आणि चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा खुलेआम प्रचार केला, हे सर्वश्रुत आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराशी बंडखोरी करीत दुसऱ्या पक्षातील उमेदवाराशी “निष्ठा’ ठेवण्याचे समीकरण पूर्वीपासूनच सुरू आहे. त्याचाच धागा धरून शहराच्या राजकारणातील नवोदित पिढीही “व्यक्‍तीनिष्ठा’ सोडून “दोस्ती निष्ठा’ जोपासताना दिसत आहे.

परिणामी, पक्षनिष्ठा बाजूला ठेवली जात असून, आगामी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या आघाडीच्या पक्षातील अधिकृत उमेदवारांना त्याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
विशेष म्हणजे, नगरसेवकपदाच्या निवडणुकीत मिळेल त्या पक्षाचे तिकीट घेवून महापालिका सभागृहात जाण्याचे स्वप्न काही “दोस्तीच्या दुनिये’तील सवंगड्यांनी साकार केले. त्यानंतर आपआपल्या पक्षाचा “प्रोटोकॉल’ बासनात गुंडाळून ठेवला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इमाने-इतबारे पक्षाची भूमिका तळागाळात पोहचवली. मात्र, राष्ट्रवादी-शिवसेना आणि भाजपची वाढदिवसांच्या फ्लेक्‍सवर “आघाडी’ झाल्याचे दिसत आहे.

वाकड-कस्पटे वस्ती येथील बंदिस्त नाल्याच्या भूमिपूजनावरुन स्थानिक आणि बाहेरचे असा नवीन वाद निर्माण झाला आहे. भाजपचे स्थानिक नगरसेवक संदीप कस्पटे, आरती चोंधे, तुषार कामठे यांनी एकी केली. एकाच विकासकामाचे गाववाल्या नगरसेवकांनी भूमिपूजन केले. विशेष म्हणजे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवली. मात्र, त्याच प्रभागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांना कार्यक्रमातून डावलण्यात आले होते.

वास्तविक, भाजपच्याच स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांनीही त्याच विकास कामाचे भूमिपूजन एकदिवस अगोदर केले होते. त्यावेळी त्याच प्रभागातील अन्य तीन नगरसेवक कार्यक्रमाला उपस्थितीत राहिले नाहीत. नाल्याच्या कामाचे भूमिपूजन चिंचवडचे आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र, स्थानिक आणि बाहेरचा असा वाद निर्माण झाला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच, गेल्या महिन्यात जगताप डेअरी येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राला नाव देण्यावरुन स्थानिक आणि बाहेरचे नगरसेवक असा वाद निर्माण झाला होता. आमदार जगताप यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार होते. तरीही भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली नाही.

आमदार जगतापांविरोधात “आघाडी’?
वास्तविक, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत सत्ता हस्तगत केल्यानंतर स्थानिक नगरसेवकांना मानाची पदे देण्यावरुन त्या-त्या गटांतील नगरसेवकांमध्ये अंतर्गत धूसफूस वाढली आहे. भोसरीसह चिंचवड विधानसभा मतदार संघातील स्थानिक आणि ज्येष्ठ नगरसेवकांना मानाच्या पदापासून वंचित ठेवल्याचा सूर आहेत. त्याची तीव्रता चिंचवडमध्ये जास्त जाणवते. स्थायी समिती, महापौरपद किंवा पक्षनेतेपदावर चिंचवडमधील आमदार जगताप समर्थकांमधील काहीजण तीव्र इच्छुक होते. मात्र, मानाच्या पदांवर गाववाल्यांची वर्णी लागली नाही. परिणामी, आमदार जगताप यांच्या भूमिकेबाबत काहीजण नाराज आहेत. विशेष म्हणजे, कलाटे, कस्पटे, कामठे, काटे, वाघेरे, भोंडवे, जगताप, बारणे अशा स्थानिक नगरसेवकांनी आमदार जगताप यांच्याविरोधात रान उठवले असून, आगामी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांची डोकेदुखी वाढवण्याचे नियोजन सुरू आहे. या मोहिमेचे अप्रत्यक्ष नेतृत्त्व वाकडचे “कलाटे बंधू’ करीत आहेत. “दोस्ती’च्या नावाखाली राजकीय मोर्चेबांधणी सुरु असल्याचे दिसत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)