कहे गये दास कबीर…
– अरुण गोखले
दोहा
मॉंगन मरण समान है, मति मॉंगो कोई भीख।
मॉंगन ते मरना भला, यह सदगुरू की सीख।।
मराठी भाषांतर
मागणे मृत्यू समान, भिक ती मागू नकारे।
मरण बरे ते मागण्याविण, गुरुची ही शिकवण रे ।।
भावार्थ
एखाद्याच्या पुढे हात पसरायचा ही लाचारीची खूण आहे. असे लाचारीचे आणि लाजिरवाणे जीवन जगू नका, कोणाकडे काही मागू नका, कोणाच्या उपकाराखाली दबू नका. कोणाचे मिंधे होऊ नका हेच कबीरांना या दोह्यातून सांगायचे, शिकवायचे आहे. कोणाकडे काही मागितले तर त्या मागणीमधून आपले अपुरेपण, कमतरता,आपली अक्षमता ही तर व्यक्त होते. तसेच देणाऱ्याच्या मनातही नकळत माझ्या समोर ही हात पसरून उभी राहिलेली व्यक्तीही घेणारी आणि मी देणारा म्हणजेच दाता आणि हा याचक अशी एक भावना त्या दात्याच्या मनात निर्माण होते. त्यामुळे त्याचा मनातला अहंकार, मोठेपणा, मीपणा वाढतो आणि आपली पत मात्र कमी होते. एखाद्याकडून काही मागून घेतले तर त्यामुळे आपला स्वाभिमान तर जातोच त्याबरोबर मिंधेपणाची भावना निर्माण होते.
आपण त्या समोरच्या व्यक्तीच्या दबावाखाली येतो. प्रसंगी त्या समोरच्या व्यक्तीची हुजरेगिरी करण्याची वेळ आपल्यावर येते आणि हे असं लाजिरवाण जगणं हे जगणं नाही त्यापेक्षा मरण बरं असं कबीर सांगतात. इथे कबीरांना हे सुद्धा सांगायचे, शिकवायचे आहे की जर मागायचेच असेल तर ते त्या एका रामरायाकडे काय ते मागा. तुम्ही त्याच्याकडे जे मागाल ते देण्यास तो एकटाच समर्थ आहे. एखादी गोष्ट जशी आपण हक्काने प्रेमाने आपल्या आईबापाकडे मागतो ना, तशीच मागणी करायचीच असेल तर, ती त्या ईश्वराकडे करा. कारण तो खरा दाता आहे. तो मायबाप आहे. कबीरांना इथे असंही आवर्जून सांगायचे आहे की कोणाही गुरूला आपल्या शिष्याने इतरांपुढे हात पसरलेले कधीच आवडत नाही. ते आपल्या शिष्यांना हेच सांगतात की एक तर कोणाला काही मागू नका, जर मागायचच असेल तर ते त्या एका खऱ्या दात्याकडे मागा. कारण त्याच्याकडून जे मिळेल ते कर्ज असणार नाही, तो त्याचा मायेचा, प्रेमाचा प्रसाद असेल.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा