नकट्या रावळ्याची विहीर अखेर टाळेमुक्त

प्रभातच्या वृत्तांमुळे पुरातत्व खात्याला जाग : संरक्षक जाळीच्या भगदाडाचीही डागडुजी

राजेंद्र मोहिते
कराड, दि. 29 (प्रतिनिधी) – नकट्या रावळ्याची विहीर ही कराडातील पंताचा कोट नावाच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचा एक भाग आहे. त्यामुळे याचे महत्त्व लक्षात घेवून भारतीय पुरातत्व खात्याने या विहिरीला संरक्षक यादीत समाविष्ट करुन तिची डागडुजी केली. त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने विहिरीला संरक्षित भिंत उभारून जाळीही मारण्यात आली. शिवाय प्रवेशद्वाराला गेट उभारण्यात आले. मात्र, काही दिवसांपूर्वी या गेटला पुरातत्व खात्याने टाळे ठोकल्यामुळे पर्यटकांची व स्थानिक नागरिकांची गैरसोय निर्माण झाली. शिवाय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विहिरीच्या संरक्षक जाळीलाही विघ्नसंतोषी मंडळींनी भलेमोठे भगदाड पाडले होते. याबाबत प्रभातने आपल्या सडेतोड वृत्तांकनाद्वारे पुरातत्त्व खात्याला जाग आणली आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याने विहीरीला टाळेमुक्त करुन तिच्या संरक्षक जाळीला पडलेल्या भगदाडाचीही डागडुजी केली आहे.
महाराष्ट्रासह देशातील गौरवशाली, वैभवशाली आणि तितक्‍याच दैदीप्यमान इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्यासाठी, त्याचा वसा आणि वारसा पुढच्या पिढीला दिशादर्शक व मार्गदर्शक ठरावा. शिवाय पर्यटनाद्वारे भारतीय इतिहास जगभरात पोहचावा. यासाठी भारतीय पुरातत्व खात्याने अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा संरक्षक यादीमध्ये समावेश केला. त्यामध्ये शहरातील नकट्या रावळ्याच्या विहिरीचाही समावेश करण्यात आला होता.
त्यानुसार पुरातत्व खात्याकडून नकट्या रावळ्या विहिरीच्या पडझड झालेल्या भागाचा ऐतिहासिक बाज न हरवता त्याची डागडुजी करण्यात आली. तसेच विहिरीच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंत उभारून त्याला संरक्षक जाळी देखील मारण्यात आली. मात्र, कालांतराने पुरातत्व खात्याचे व त्यांच्या निष्काळजी कर्मचाऱ्यांचे या वास्तूंच्या देखभालीकडे पुर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. याचाच गैरफायदा घेऊन मद्यपी, विघ्नसंतोषी, प्रेमीयुगुलांकडून आडोसा मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याचबरोबर महाविद्यालयांच्या युवक युवतींमध्ये विहिरीसोबत सेल्फी काढण्याचे फॅड वाढले असल्याचे प्रभातने निदर्शनास आणले होते. त्याची योग्य दखल घेत भारतीय पुरातत्व विभागाने नकट्या रावळ्याची विहीर टाळेमुक्त करून विहिरीच्या संरक्षक जाळीला पडलेल्या भगदाडाचीही डागडुजी करण्यात आली आहे.
प्रभातने वेळोवेळी आपल्या सडेतोड वृत्तांकनाद्वारे भारतीय पुरातत्त्व खात्याकडून शहरातील ऐतिहासिक नकट्या रावळ्याच्या विहिरीचा होत असलेला कोंडमारा आणि त्यामुळे पर्यटकांसह नागरिकांची होणारी मोठी गैरसोय दूर केली आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्याही गलथान कारभाराला आळा बसवला असून वास्तूच्या पावित्र्याला व तिच्या ऐतिहासिक बाजला धक्का लावून नासधूस करणाऱ्या विघ्नसंतोषी मंडळींना देखील चांगलीच चपराक दिली आहे. त्यामुळे दैनिक प्रभातने भारतीय पुरातत्व खात्याला जाग आणत आपल्या वृत्तांकनाद्वारे पुरातत्त्व खात्याच्या डोळ्यात अंजन घातल्यामुळे दैनिक प्रभातचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)