नऊ जणांचा खुनी बचावला!

पुणे – एसटी बसचालक संतोष मानेने 25 जानेवारी 2012 रोजी सकाळी स्वारगेट डेपोतील एसटी बस ताब्यात घेतली होती. भर रस्त्यात बेफाम बस चालवून त्याने 9 जणांना चिरडले होते. तर या घटनेत 37 जण जखमी झाले होते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 25 वाहनांचा चक्काचूर झाला होता. या प्रकरणी, शिवाजीनगर कोर्टात वर्षभर खटला चालला होता आणि 8 एप्रिल 2013 रोजी संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

ही दुर्मीळातील दुर्मीळ आणि अतिहिंसक घटना असल्याचे कोर्टाने नमूद केले होते. परंतु, खालच्या कोर्टाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर हायकोर्टात शिक्कामोर्तब होणे गरजेचे असते. त्यामुळे मानेने दाखल केलेले अपील आणि फाशीवरील शिक्कामोर्तब या दोन्हींची सुनावणी हायकोर्टात झाली होती. त्यात मानेला दिलासा मिळाला होता. संतोष मानेचे म्हणणे पुण्यातील सेशन्स कोर्टाने ऐकून घेतलेले नाही. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा त्याचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, असे आदेश देऊन हायकोर्टाने त्याची फाशीची शिक्षा रद्द केली होती. या पार्श्‍वभूमीवर नंतर सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा संतोष मानेचे सगळे म्हणणे ऐकून घेतले. त्यात कुठलाही नवा मुद्दा त्याला मांडता आला नाही, आपल्या कृतीचं समर्थन करता आले नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर मुंबई हायकोर्टात मानेने धाव घेतली असता, तेथेही त्याचा दावा फेटाळत हायकोर्टाने त्याची फाशी कायम ठेवली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

असा घडला थरार
स्वारगेट बस स्थानकावर 25 जानेवारी 2012 रोजी नेहमीप्रमाणे गर्दी होती. फलाटावर सकाळी साडेआठच्या सुमारास पुणे-सातारा-पुणे ही बस लागली होती. इतक्‍यात संतोष मारुती माने याने बसमध्ये चढून आपल्याकडील मास्टर कीने बस चालू केली. हडपसर रस्त्याच्या बाजूने असलेल्या गेटमधून बाहेर काढत गोळीबार मैदान रस्त्याच्या विरुद्ध दिशेने घेऊन गेला. त्याने बेदरकारपणे बस पळवत रस्त्यावरील 27 पेक्षा जास्त वाहनांना उडवत नऊ जणांचा बळी घेतला होता. 37 जण या घटनेत जखमी झाले होते. यापैकी अनेक जण कामाला, कॉलेजला जात होते. तसेच रस्त्यावरील पादचाऱ्यांचा जखमी व मृत्यूमध्ये समावेश होता. माने घेऊन जात असलेल्या बसला पोलिसांनी-नागरिकांनी अडविण्याचा प्रयत्न केला. लष्कर भागात बीट मार्शलनी बसच्या चाकावर गोळीबार केला. पण मानेला अडविण्यात यश आले नाही. माने पूलगेट येथून लष्कर भागात गेला तेथून आतमध्ये फिरून कासेवाडी मार्गाने सेव्हन लव्हज चौकातून सरळ जात मुकुंदनगर येथील रस्त्याने लक्ष्मीनारायण चौकात आला. या चौकात पोलिसांनी पीएमटी बस आडवी लावून त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मित्रमंडळ चौकातून सारसबाग चौकात सिंहगड रस्त्याला तो लागला. सिंहगड रस्त्यावर डिव्हायडर तोडून बस पुन्हा विरुद्ध दिशेला नेताना रिक्षाला मोटारीला उडविल्यामुळे बस थांबली. त्यावेळी एका तरुणाने मध्ये शिरून मानेला बाहेर खेचले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्ती
या घटनेत पूजा भाऊराव पाटील (19 , रा. ससाणेनगर), राम ललीत शुक्‍ला (25 , रा. शिवनेरीनगर, कोंढवा), शुभांगी सूर्यकांत मोरे (रा. शुक्रवार पेठ), पिंकेश खांडेलवार (28 , रा. महर्षीनगर), अंकुश तिकोणे (46 ), अक्षय प्रमोद पिसे (20 , रा. लॉ कॉलेज रोड), मिलिंद पुरुषोत्तम गायकवाड (46 , आनंदनगर, सिंहगड रस्ता), श्वेता धवल ओसवाल (28 , रा. टिंबर मार्केट) व चांगदेव भांडवलकर (55 ) यांना प्राण गमवावे लागले.

एसटी महामंडळासही मोठा धक्का 
ही घटना घडल्यानंतर काही मिनिटांतच ती शहरात वाऱ्यासारखी पसरली होती. यामुळे घटनास्थळी शेकडो नागरिकांनी धाव घेतली. एसटी महामंडळाला तर या घटनेमुळे मोठा धक्का बसला होता. यानंतर वाहन चालकांचे मानसिक व शारीरीक आरोग्य, त्यांच्या सुट्टयांचा प्रश्‍न, तसेच बस पार्क केल्यानंतर तीच्या सुरक्षेचा प्रश्‍न आदी अनेक प्रश्‍न उपस्थित राहिले होते. यामुळे महामंडळास चालक व वाहकांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याकडे गांभीर्याने बघावे लागले. यासाठी मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले.

सहकाऱ्यांनाही त्रास
संतोष माने याने बेफान बस चालवून 9 जणांना चिरडल्यानंतर महामंडळातील बस चालकांच्या बेदरकारपणावर सर्वच स्तरावरुन चर्चा सुरु झाली. सर्वसामान्य नागरिक एसटी चालक आणी कर्मचाऱ्यांवर तोंडसुख घेऊ लागले. एखादा बस चालक जोरात बस घेऊन शेजारुन गेला किंवा अपघात होता होता टळला तर सर्व सामान्य नागरिक त्याला संतोष मानेची उपमा देऊ लागले. यामुळे महामंडळातील बस चालकांच्या दुष्टीने संतोष माने ही एक प्रकारे शिवीच झाली आहे. संतोष मानेने केलेल्या कृत्याचा त्याच्या सहकाऱ्यांना अशा प्रकारे त्रास सहन करावा लागत आहे.

महामंडळालाही द्यावी लागली नुकसानभरपाई
या प्रकरणात एसटी महामंडळाने तातडीची मदत म्हणून मृतांच्या नातेवाईकांना 3 लाख व जखमींना 50 हजार असे एकूण 70 लाख रुपये दिले होते. तसेच जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च एसटी महामंडळाने केला होता. या घटनेनंतर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी मोटार अपघात न्याय प्राधिकरणात 11 नावे दाखल झाला. या दाव्यांतील 16 जानेवारी 2016 रोजी लागला. या सर्व निकालांमध्ये न्यायालयाने एसटीला 9 टक्के व्याजदाराने 98 लाख 68 हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. आधीचे 70 लाख व व्याजासह नुकसानभरपाईची सुमारे 1 कोटी 30 लाख रुपयाची रक्कम एकत्र केल्यास 1 कोटी 68 लाख रुपये द्यावे लागले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)