ध्यास…

डॉ. दिलीप गरूड 
लातूर जिल्ह्यातील उदगीर या गावी लालबहादूर शास्त्री विद्यालयात रमाकांत बनशेळकीकर हे शिक्षक अध्यापन करीत होते. एके दिवशी ते पाचवीच्या वर्गावर गेले. तर मुले ओरडून म्हणाली, “सर, गोष्ट सांगा.’ बेनशेळकीकर सर त्या वर्गाला शिकवत नव्हते, पण जादा तास दिल्यामुळे ते त्या वर्गावर शिकवायला आले होते आणि मुलांना माहीत होते की बनशेळकीकर सर छान गोष्ट सांगतात. म्हणून मुलांनी गिल्ला केला. आग्रह करून गोष्ट सांगायला लावली. 

सरांनी मुलांना अब्राहम लिंकनची चरित्रकथा सांगितली. तसेच अब्राहम लिंकनने त्याच्या मुलाला शिकवणाऱ्या हेडमास्तरास पाठविलेले पत्रही उद्‌धृत केले. त्या पत्रातील सारांश सांगितला. ते पत्र प्रा. वसंत बापट यांनी मराठीत अनुवादित केले आहे. बनशेळकीकर सर पत्र वाचून दाखवत होते आणि मुले तन्मयतेने ऐकत होती.
“”प्रिय गुरुजी
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात
नसतात सगळीच सत्यनिष्ठ
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी
मात्र त्याला हे देखील शिकवा
जगात प्रत्येक बदमाषागणिक
असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही
स्वार्थी राजकारणी असतात जगात
तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही
असतात टपलेले वैरी
तसे जपणारे मित्रही…”

गोष्ट संपली. तास संपल्याचा टोल पडला. सर वर्गाबाहेर आले. तर पाठीमागून एक हाक कानावर आली. ती प्राजक्त कोंगे नावाच्या विद्यार्थ्याची हाक होती. तो सरांजवळ आला आणि म्हणाला, “”सर, गोष्ट छान होती. मला आवडली. पण सर, अब्राहम लिंकनच्या मुलाचे नाव तुम्ही सांगितले नाही. त्या मुलाचे नाव काय?”
सर नम्रपणे म्हणाले, “”आता मला नाव माहीत नाही. पण शोध घेऊन मी तुला दोन दिवसात सांगतो.”
मुलगा खूश होऊन वर्गात परतला. पण सरांच्या मनात विचारचक्र सुरू झालं. खरंच अब्राहम लिंकनच्या मुलाचे नाव काय असेल? त्या नावाचा शोध घेतल्याशिवाय गोष्ट पूर्ण होणार नाही.
मग सर तसेच ग्रंथालयात गेले. रमेश कुलकर्णी नावाच्या ग्रंथपालांना म्हणाले, “”मी सातवीच्या वर्गाचा तास घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही माझ्यासाठी अब्राहम लिंकन यांच्या जीवनावरील पुस्तके काढून ठेवा.”

सर सातवीच्या वर्गात आले. पण अब्राहम लिंकनचे पोर त्यांची पाठ सोडेना. तास संपताच ते ग्रंथालयात आले. तर ग्रंथपालांनी काढून ठेवलेली पुस्तके चाळली. तरी त्यात अब्राहम लिंकनच्या मुलाचे नाव सापडेना. शेवटी शाळा सुटली. ग्रंथपाल जायच्या तयारीला लागले. तेव्हा बनशेळकीकर सरांनी त्यांची अडचण सांगितली. त्यांच्या विनंतीवरून ग्रंथपाल थांबले. दोघांनीही रात्री सात वाजेपर्यंत अनेक पुस्तकांचा धांडोळा घेतला. पण अब्राहम लिंकनच्या मुलाचे नाव सापडेना. मग सर खिन्न मनाने घरी आले. तेवढ्यात त्यांच्या मनात एक कल्पना आली. ते गावातल्या कॉलेजच्या ग्रंथपालाकडे गेले. त्यांची अडचण सांगितली. योगायोगाने या ग्रंथपालांचा मुलगाही लालबहादूर शास्त्री विद्यालयात शिकत होता. शिवाय सरांची अभ्यासू वृत्ती, विद्यार्थ्यांची ज्ञानलालसा तृप्त करण्याची तळमळ पाहून त्यांनीही सहकार्य केले. मग सर आणि कॉलेजचे ग्रंथपाल निरणे रात्री ग्रंथालयात गेले. निरणे सर एकेक पुस्तक काढून देत होते आणि बनशेळकीकर सर अधाशासारखे त्या पुस्तकांवर तुटून पडत होते. बारकाईने वाचत होते. अखेर एका पुस्तकात अब्राहम लिंकनच्या मुलाचे नाव सापडले. त्यात लिहिले होते, “”अब्राहम लिंकन यांना एकूण चार मुले होती. पण त्यातील तीन मुले देवाघरी गेली. एकच मुलगा जगला. त्याचे नाव रॉबर्ट होते.”

अब्राहम लिंकनच्या मुलाचे नाव सापडले आणि सरांना अतिशय आनंद झाला. तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. सर तडक प्रश्‍न विचारणाऱ्या प्राजक्त कोंगेच्या घरी गेले. तर त्याची आई म्हणाली, “”आताच तो जेवण करून झोपलाय.”
सर म्हणाले, “”त्याला उठवा. माझे काम आहे त्याच्याकडे.”
त्याच्या आईने प्राजक्तला उठवले. सरांना पाहून त्याला आश्‍चर्य वाटले. तेव्हा सर म्हणाले, “”बाळा, शाळेत तू विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले. अब्राहम लिंकनच्या मुलाचे नाव रॉबर्ट होते. आता तू झोप. मीही झोपायला जातो. आज मला शांत झोप येईल.”

असं म्हणून सर घरी आले. घडलेली सर्व हकीगत घरच्यांना ऐकवली. जेवण करून ते तृप्त मनाने झोपले. पण ज्या प्राजक्त कोंगेने प्रश्‍न विचारला तो शांत बसला नाही. अब्राहम लिंकनचे चरित्र त्याच्या मनात पाझरले. रक्तात मुरले. पुढे हा मुलगा शिकून मोठा झाला. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. तेथे त्याला अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये सचिवपदाची नोकरी मिळाली. बनशेळकीकर सरांची धडपड आणि अब्राहम लिंकनचे चरित्र प्राजक्त कोंगेला अमेरिकेत घेऊन गेले आणि मराठी झेंडा अमेरिकेत फडकला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)