ध्यास वृक्षसंवर्धनाचा!

वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें, असे सांगत जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांनी वृक्षाचे महत्त्व विशद केले आहे. संत परंपरेपासून वृक्षारोपणासाठी आर्जव केले जात असताना ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आपल्यापर्यंत पोहोचूनही आपण वृक्ष जतनाबाबत फारसे गांभीर्याने घ्यायला तयार नाही. एकीकडे इस्रायलसारख्या देशाने वृक्षारोपणाने वाळवंटाचे नंदनवन केले असताना दुसरीकडे नैसर्गिक साधनसंपत्तीने मुबलक असलेल्या देशाचे आपण वाळवंट करत आहोत. अशा परिस्थितीत वृक्ष चळवळ फोफावण्यासाठी काही ध्येयवेडी माणसे समाजात कार्यरत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील या चळवळीतील एकमेव नाव म्हणजे सचिन बाबुराव पवार. संपूर्ण राज्यात सुमारे सात हजारांहून अधिक रोपटी आणि वृक्ष सचिन पवार यांची आठवण करून देतात. मूळचे पैलवान असलेल्या सचिन पवार यांनी वृक्ष संवर्धनाचा विडा उचलला आहे. एक वाढदिवस, एक झाड सारखा उपक्रम राबवत त्यांनी आजवर सुमारे सात हजार लोकांच्या वाढदिवसानिमित्त सात हजारांहून अधिक रोपटी लावली आहेत तसेच त्याची जबाबदारी ज्याचा वाढदिवस आहे त्याच्यावर सोपवली आहे. पै. सचिन यांच्याकडून वाढदिवसानिमित्त मिळालेली भेट म्हणून लोकही मोठ्या प्रेमाने त्यांनी दिलेली भेट जोपासत वृक्ष संवर्धनाच्या कार्यात हातभार लावत आहेत. पै. सचिन यांनी पर्यावरण आणि गरजूंना मदत करण्याचे जणू काही या पैलवानाने व्रतच घेतले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिक्षण, सामाजिक आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात त्यांची कामगिरी हेवा वाटावी इतकी भरीव आहे, कधीही प्रसिद्धीच्या मागे न धावता काम करत राहणाऱ्या सचिन पवार यांच्या कार्याने परिसरात अबालवृद्धांमध्ये प्रेम आणि आदर मिळवला आहे. ताथवडे गावचे तत्कालीन 70 च्या दशकातील गाजलेले पैलवान स्वर्गीय बाबुराव पवार यांच्यापासून पैलवानकी आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध स्तरातील घटकांना नेहमीच मदत करण्याचे बाळकडू सचिन यांना लहानपणीच मिळाले. लहानपणापासूनच तालमीची आवड कुस्ती क्षेत्रात मोठं नाव करण्याची जिद्द उराशी असल्याने सचिनचे शिक्षण 12 वी नंतर थांबले पैलवानकीच्या ऐन उमेदीच्या काळात सचिनने अनेक जणांना अस्मान दाखवले. महाराष्ट्र आणि राज्याबाहेर अनेक आखाडे गाजवले. ताथवडे गावाचे नाव कुस्तीक्षेत्रात पोहोचविणारे सचिन पवार हे एक.

असा लागला वृक्षांचा लळा
एकीकडे कुस्ती क्षेत्रात नावलौकिक वाढत असताना दुसरीकडे वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे सचिन यांना कुस्ती क्षेत्रापासून दूर राहावे लागले. कुटुंबाची जबाबदारी, परंपरागत शेती, दूध व्यवसाय तसेच वीटभट्टीचा व्यवसाय सांभाळायची जबाबदारी सचिन यांच्या खांद्यावर आली. शेतीमध्ये काम करताना विविध झाडे, रोपे याबद्दल सचिनला आकर्षण वाटू लागले आणि अनेक संकटांना धोबीपछाड टाकणाऱ्या पैलवानाने लोकांना वाढदिवशी गाठून एक झाड, एक वाढदिवस, असा अनोखा उपक्रम राबवायला सुरुवात केली. सुरुवातीला काहीसा अनोखा वाटणारा हा उपक्रम आता पंचक्रोशीतील तरुणांसाठी आदर्श बनला आहे. राज्यभरातून अनेक तरुणांनी या उपक्रमाचा आदर्श घेत आपापल्या भागात एक झाड, एक वाढदिवस ही संकल्पना रुजवायला सुरुवात केली आहे. गेली अनेक वर्षे सचिन यांचे अविरत काम चालू असून आता त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

कुटुंबातही वृक्षारोपणाने वाढदिवस
कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा न बाळगणाऱ्या, कोणत्याही राजकीय पक्षाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न न करणाऱ्या पै. सचिन पवार यांनी आजवर सात हजारांहून अधिक परिचित-अपरिचित लोकांचे वाढदिवस आपल्या एक झाड, एक वाढदिवस या संकल्पनेतून साजरा केले आहेत. सचिन पवार यांनी स्वतःपासून या उपक्रमाची सुरुवात केली. कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवसही ते वृक्षारोपणानेच साजरा करतात. आयुष्यातील जबाबदारी चोख पार पाडत सचिन दिवसातून वेळ काढत न चुकता आपल्या विश्‍वासू सहकाऱ्यांबरोबर मित्रमंडळींचे वाढदिवस साजरे करायला बाहेर पडतात. त्यांच्या या कार्याला त्यांच्या मातोश्री, पत्नी यांची मोलाची साथ लाभते.

वृक्षारोपणाची उभी केली चळवळ
खासगी अथवा सरकारी शाळा, दवाखाने विविध संस्था, आसपासची खेडी सरकारी कार्यालये ते थेट पोलीस ठाण्यापर्यंत सचिन पवार यांनी लावलेली रोपे आज झाडे बनून नागरिकांना प्राणवायू देत आहेत. वाकड पोलीस ठाण्याचा परिसर आज अत्यंत छान आणि निसर्गरम्य वाटतो तोदेखील पैलवान सचिन पवार यांच्या प्रयत्नांमुळेच. पै. पवार यांनी वाकड पोलीस ठाण्याच्या कम्पाऊंड वॉलजवळ शेकडो विविध झाडे लावली आहेत.

कीर्तनकार, प्रवचनकारांना उपक्रमाची भुरळ
सचिन पवार यांचे संपूर्ण कुटुंब अध्यात्मिक क्षेत्रातील असल्याने कीर्तन आणि प्रवचनकार यांचे नेहमीच येणे-जाणे असते. धर्मिक कार्यक्रमांमध्येही सचिन यांची उपस्थिती नेहमीच पाहावयास मिळते. अनेक कीर्तनकार, प्रवचनकारांना त्यांच्या वाढदिवशी सचिन त्यांच्या घरी पोहोचून त्यांना तुळशी, बेल, अनंता अशी धार्मिक महत्त्व प्राप्त असलेली रोपे भेट देतात. अनेक कीर्तन, प्रवचनांमध्ये सचिन यांच्या या आगळ्यावेगळ्या कार्याचा उल्लेख करून कीर्तनकार व प्रवचनकार लोकांना पर्यावरणाचे जतन करण्याचे आवाहन करत आहेत.

कित्येकांच्या गळ्यातील ताईत
ताथवडे व परिसरात जिल्हा परिषद व महापालिकेच्या काही शाळा आहेत. या शाळांमध्ये मुलांना शिक्षणासाठी आवश्‍यक असणाऱ्या पाटी-पेन्सिलपासून ते संगणकापर्यंत आणि पाण्याच्या फिल्टरपासून ते थेट वर्गाच्या खोल्यांवर पत्रे रूपी छत देणारे पैलवान सचिन पवार यांना ताथवडे परिसरात ताथवड्याचा राणादा असे प्रेमाने संबोधले जाते. गरजू खेळाडू विद्यार्थ्यांना स्पोर्टस किट देऊन स्पर्धेसाठी तयार करणाऱ्या सचिन यांच्या कार्याला मुलेदेखील घवघवीत यश मिळवून पोचपावती देतात. मुलांना अथवा परिसरातील शाळांना कशाचीही गरज भासल्यास ते इकडेतिकडे अर्ज करत बसण्यापेक्षा ते थेट हक्‍काने पै. सचिन यांच्याशी संपर्क करतात. यावर सचिन म्हणतात की, काहीही झाले तरी गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, अशी इच्छा आहे. आजची पिढी शिकली तर उद्याचा सक्षम समाज उभा राहील यासाठी आवश्‍यक ते सर्व प्रयत्न करू. परंतु, शिक्षण घेण्यात कसलाही अडसर येऊ देणार नाही. केवळ पर्यावरणाच्या आणि शिक्षणाच्या आणाभाका न घेता सचिन पवार यांनी स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने पर्यावरणाचा ध्यास घेतला आहे आणि एक दिवसही खंड न पडू देता कित्येक वर्षांपासून हे कार्य सातत्याने करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)