धोम जलाशयातील 38 वर्षांची बोटसेवा बंद

बोटसेवा पुन्हा सुरु करण्याची दोन्ही बाजुंच्या गावांची मागणी
बोटसवा बंद केल्याने गैरसोयीत वाढ
ग्रामस्थांना सोसावा लागतोय आर्थिक भुर्दंड

भुईंज,
धोम धरणाच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या गावांचा एकमेकांशी संपर्क असावा यासाठी शासनाने 1978 साली बोट सेवा सुरु केली.यामूळे येथील ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर झाली. मात्र, 2016 साली एका जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याने आपले अधिकार वापरत बोटद्वारे होणारी प्रवासी वाहतुक बंद केली. त्यामुळे येथील ग्रामस्थांची पुन्हा मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.प्रशासनाने ही बोट वाहतूक पुन्हा सुरु करावी अशी मागणी येथील ग्रामस्थां मधून होत आहे. दरम्यान, प्रशासनाने ही बोट वाहतूक पुन्हा सुरु न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
वाईच्या पश्‍चिम भागात असलेल्या धोम धरणाच्या दोन्ही बाजूस सुमारे 40 ते 45 गावे आहेत. या गावातील ग्रामस्थांना एकमेकांशी संपर्क ठेवायचा झाल्यास कोणतीही वाहतुक व्यवस्था नसल्याने 1978 साली याठिकाणी दहा लाख रुपये खर्च करुन बोटची व्यवस्था करण्यात आली.त्यामुळे बोटच्या सहाय्याने दोन्ही बाजुंच्या लोकांना धरणाच्या अलिकडे व पलिकडे जाणे शक्‍य होऊ लागले. या बोटीची प्रवास वाहतुकीची क्षमता 40 प्रवाशांची आहे. त्यासाठी मोठ्या माणसांसाठी दहा रुपये तर लहान मुलांसाठी पाच रुपये तिकीट दर आकारण्यात येत होता. तसेच बोटसाठी एक चालक आणि कंडक्‍टर व हेल्पर अशा तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना शासन नियमानुसार वेतनही देण्यात येत होते. ही बोट 20 किलोमीटर लांब रस्त्याचे अंतर जलमार्गाने केवळ पाच किलोमीटरमध्ये तोडत होती. दरम्यान, 2012 साली शासन नियुक्त असलेले बोटीवरील चालक वाहक आणि मदतनीस हे तिनही कर्मचारी निवृत्त झाले. तरीही अत्यावश्‍यक असणारी धोम जलाशयातील प्रवासी वाहतुकीची सेवा अखंड सुरु राहवी या भावनेपोटी जिल्हा परिषदेने पुन्हा नव्याने कंत्राटी पध्दतीने चालक आणि वाहकाची नेमणूक करुन बोट सुरु ठेवली. मात्र 2016 साली धोम जलाशयात असणाऱ्या बोट वाहतुकीवर एका जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याची वक्रदृष्टी पडली आणि ही बोट वाहतूक बंद झाली.
दोन वर्षांपासून ही सेवा बंद असल्याने धरणाच्या दोन्ही बाजूला रहाणाऱ्या ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसाय होऊ लागली.
धरणाच्या दोन्ही बाजुला असणाऱ्या गावातील एकमेकांशी संपर्क करावयाचा झाल्यास एसटीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी त्यांना धरणाला वेढा मारुन जवळपास 25 किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे.या प्रवासासाठी त्यांना ज्यादा पैसे मोजावे लागत आहेत. शिवाय एसटी ठराविक वेळेतच येत असल्याने ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे दोन्ही बाजुच्या गावांनी एकजूट केली असून लवकरात लवकर बोटसेवा पुन्हा सुरु करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
पर्यटकांसाठीही बोट ठरत होती फायद्याची
धोम जलाशय पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. अनेकवेळा पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटक बुडाल्याच्या आजवर अनेक घटना घडल्या आहेत. बोटसेवा सुरु असताना बोटीच्या सहाय्याने या बुडाणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यासाठी मदतच होत होती. या शिवाय पर्यटकांना बोटीमधून धोम जलाशयाचा आनंद घेता येत होता. एकदंरीत बोटसेवा ही फायद्याच होती. मात्र तरीही बोट बदं करण्यात आली आहे. बोटसेवा बंद केल्यामुळे पर्यटकांचीही हिरमोड झाला आहे.
रुग्णांची गैरसोय
पूर्वी बोटसेवा सुरु असल्याने बोटीद्वारे रुग्णांना प्रवास करता येत होता. अनेकदा गरोदर महिलांसाठी दवाखान्यात तात्काळ न्यावयाचे झाल्यास बोटसेवा उपयोगी पडत होती. या भागात वाहतुकीची अन्य साधने नसल्याने या सेवेमुळे ग्रामस्थांची गैरसोय होते. तसेच बोटसेवा बंद झाल्यामुळे इतर रुग्णांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली आहे.
ग्रामसभेच्या ठरावांना केराची टोपली
1978 सालापासून सुरु असलेली बोटसेवा 2916 साली बंद करण्यात आली. ही सेवा पुन्हा सुरु करावी यासाठी धोम धरणाच्या दोन्ही बाजुला असलेल्या गावांमध्ये अनेकदा ग्रामसभा घेऊन ठराव करण्यात आले आहेत. हे ठराव जिल्हा परिषदेला पाठविण्यातही आले. मात्र, तरीही ही बोटसेवा सुरु झालेली नसल्यामुळे ग्रामसभांच्या ठरावाला जिल्हा परिषदेने केराचीच टोपली दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे.
आमदारसाहेब आता तुम्ही लक्ष घाला
आमदार मकरंद पाटील यांनी तालुक्‍याची सूत्र हाती घेतल्यापासून पश्‍चिम भागाला अनेक सुविधा मिळाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने बंद केलेली ही बोट सेवा पुन्हा सुरु करुन ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय थांबावी यासाठी “आबा, आता तुम्हीच लक्ष घाला’ अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)