धोमसह तालुक्‍यातील सर्वच धरणांची सुरक्षा रामभरोसे

धनंजय घोडके

वाई – केवळ वाई तालुक्‍यातीलस नव्हे तरे जिल्ह्याच्या इतर तालुक्‍यांमधीलही जनतेची तहान भागविण्याचे महत कार्य धोम-बलकवडी धरणाद्वारे होत आहे. धरणांच्या सुरक्षेला अनन्य साधारण महत्व असताना पाटबंधारे खात्याकडून मात्र सुरक्षेबाबत कोणत्याही ठोस उपयायोजना करण्यात आलेल्या नाहीत. तालुक्‍यात धोम-बलकवडीसह इतरही छोटी मोठी धरणे आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांची हजारो हेक्‍टरची शेती पाण्याखाली आहे.

-Ads-

मात्र, तालुक्‍यातील कोणत्याही धरणावर सुरक्षेसाठी ना सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे, ना कधी याठिकाणी पोलीस प्रशासनाचे कर्मचारी फिरकले आहेत. त्यामुळे एकंदरीतच तालुक्‍यासह धोम-बलकवडीसह इतरही धरणांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
धोम धरणासह सर्वच धरणांच्या पाण्यावर हजारो लोकांच्या पिण्याचा व लाखो हेक्‍टर शेतीच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. अतिशय महत्वाच्या असणाऱ्या या सर्वच धरणांच्या सुरक्षेकडे धोम पाटबंधारे प्रशासनाचे दुर्लक्ष व्हावे हे तालुक्‍यातील जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

पाटबंधारे खात्याकडून सुरु असलेल्या या गचाळ कारभाराविषयी आता लोकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. वाईच्या दुर्गम भाग म्हणून ओळख असणाऱ्या पश्‍चिम भागाने हजारो हेक्‍टर जमीन धरण उभारणीसाठी दिली आहे, त्या लाभार्थींचे योग्य पुनर्वसनही गेल्या पन्नास वर्षाच्या कालावधीत झाले नाही. अर्ध्यापेक्षा जास्त जिल्ह्याच्या जमिनी या वाई तालुक्‍यातील या तीन धरणांवर अवलंबून असताना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पाटबंधारे विभागाकडून एवढ्या सहजतेने हाताळलाच कसा जातो? असा गंभीर प्रश्‍न उपस्थित होत आहे. शासनाने धरणाच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. धरणामुळे कितीततरी शेतकरी भूमिहीन झाले, त्यांचे संसार पणाला लागले.

या ठिकाणी पर्यटकांसाठी बोटिंग क्‍लब सुरु करण्यात आले आहे. मात्र, गेली अनेक वर्ष एकच ठेकेदार हा बोटिंग क्‍लब चालवत आहेत. पर्यटनासाठी आलेले पर्यटक मनमुरादपणे बोटिंगचा आनंद घेत असतात. परंतु बोटमध्ये बसणाऱ्या पर्यटकांसाठी संबंधित ठेकेदाराकडून कोणती काळजी घेतली जाते का? ठेकेदाराकडे अधिकृत परवाना आहे का? याविषयीही संबंधित प्रशासन अनभिज्ञच असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याशिवाय धरणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. ते कोण्याच्या परवानगीने झाले आहे. यात कोणत्या अधिकाऱ्याने हात ओले केले आहेत अशा एक ना अनेक समस्या याठिकाणी असतानाही ना प्रशासनाकडून ना पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. धरणाच्या भिंतीवरील स्ट्रीट लाईटही चालू नाहीत, लाईट बॉक्‍स उघडे पडलेले आहेत.

पर्यटकांना चुकून शॉक लागल्यास त्याला जबाबदार कोण? धरण परिसरात अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे याला कोण रोखणार? एकाही धरणावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला नाही मग धरणाची सुरक्षा कोण करणार? पोलीस कर्मचारी संख्या कमी असल्याचे कारण पुढे करत या ठिकाणी कर्मचारी देण्यास पोलीस प्रशासन चालढकल करीत आहे. असे एक नव्हे अनेक प्रश्न यानिमिताने उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी जोर धरत आहे.

शहाणपण येणार तरी कधी?
वाईच्या पश्‍चिम भागाचे सर्वसामान्यांसह पर्यटकांना विशेषत: चित्रपट सृष्टीलाही खास आकर्षण आहे. त्यामुळे या भागात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. मात्र, याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसोबत घडत असलेल्या दुर्घटना हा आता चिंतेचा विषय बनू लागला आहे. धरणाच्या पाण्यात बुडून अनेक पर्यटकांना आपला जीव गमाविण्याची वेळ आली आहे. नुकतेच याठिकाणी फिरावयास आलेल्या सख्ख्या बहिण भावाचाही बुडून मृत्यू झाल्याने पर्यटकांची सुरक्षेसाठी संबंधित विभागाकडून काय उपाययोजना होणार आहेत का? आणखी किती बळी गेल्यावर प्रशासनाला शहाणपण येणार? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

सामाजिक संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात
तालुक्‍यातील कोणत्याही धरणाच्या सुरक्षेबाबत पाटबंधारे विभाग, तसेच जिल्हा प्रशासनाकडूनही कोणतीच ठोस उपाय योजना केली गेलेली नाही. या धरणांच्या पाण्यावर आपलं राजकीय हित जोपसाणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही धरणांच्या सुरक्षेच्या प्रश्‍नावर कधी आवाज उठविला नसल्याने आता विविध सामाजिक संघटनाच आक्रमक झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत धरणांच्या सुरक्षेचा प्रश्‍न संबंधित विभागाने सोडविला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचाही इशाराही या संघटनांनी दिला आहे.

धोम धरणाचा झालाय धोबीघाट
धोम धरणाला कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्याने याठिकाणी वास्तव्यास असलेल्या काही स्थानिकांनी धरणाच्या भिंतीवरुन खाली उतरत याठिकाणी असणाऱ्या मोठमोठ्या दगडांवर कपडे धुणे, भांडी धुणे यासह चादरी-गोदड्या धुण्याचा दिनक्रमच चालू केला आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या सर्वांनाच धोम धरणाचा धोबीघाट झाल्याचे विदारक दृष्य पहावयास लागत आहे. कपडे किंवा भोडी धुवत असताना पाय घसरुन पाण्यात पडल्यास जीवही जाऊ शकतो याचाही विसर या स्थानिकांना पडला आहे. दरम्यान, याठिकाणी सुरक्षारक्षक असता तर असे धाडस कुणी केलेच नसते. त्यामुळे सुरक्षारक्षक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)