“धोम’ची सुरक्षा यंत्रणा कुचकामी

धोम ः सुरक्षा रक्षकासाठी बांधण्यात आलेल्या कार्यालयाची अवस्था. दुसर्‍या छायाचित्रात मद्यपींनी कार्यालयात टाकलेल्या दारुच्या बाटल्या.

मद्यपी, प्रेमी युगुलांच्या वावराने परिसरला अवकळा
मेणवली, दि. 9 (प्रतिनिधी) – धोम धरणाच्या सुरक्षेचा ठेका पुण्यातील एका खाजगी कंपनीला दिल्याने धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध होऊनही संबंधित कंपनीकडून धोमच्या सुरक्षेकडे दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे जनतेतूनही संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या मुसळधार पावसामुळे धोम धरण तुडुंब भरलेले आहे. धरणाचे मनमोहक दृष्य पाहण्यासाठी पर्यटक याठिकाणी गर्दी करत आहेत. पर्यटकांसोबतच याठिकाणी हवसे-नवसेही धांगडधिंगाणा करण्यासाठी येत असतात. या प्रकारामुळ पर्यटकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. मात्र, या सर्व प्रकाराकडे खासगी सुरक्षा कंपनीकडून दुर्लक्ष केले जात आहे. धरणाच्या उत्तरेकडील बाजूस कुठलीही सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे धोम धरणाची सुरक्षा रामभरोसे राहिली आहे. नेमलेले खाजगी सुरक्षा रक्षक उत्तरेला न थांबता दक्षिणेत बसून उत्तरेची सुरक्षा करत आहेत.
धोमधरणाच्या भिंतीची लांबी 2700 मीटर आहे. भिंतीची दोन्ही टोक पश्‍चिम भागाच्या जांभळी व जोर रस्त्याला जोडली गेली आहेत. जोर रस्त्यावर बोरीव हद्दीत धरणाचे मुख्य प्रवेशद्वार असून येथूनच धरणातील पाणी नदीला व कालव्यात सोडण्यात येत असल्याने याठिकाणी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी कार्यरत असतात. परंतु उत्तरेकडील धोम गावच्या बाजूस जांभळी रस्त्यावरील दुसऱ्या गेटवर कसलीही सुरक्षा व्यवस्था ठेवलेली नाही. याठिकाणी असलेल्या सुरक्षा कार्यालयात दारूच्या बाटल्या, दगडाच्या चुली यासह इतर कचरा पडलेला आहे. या अडगळीत दिवसाढवळ्या प्रेमी युगुलांचे अश्‍लील चाळेदेखील सुरु असतात.
मद्यपींचा वाढता वावर
धरण परिसरात तसेच धरणाच्या भींतीवर मद्यपींचा वावर वाढला आहे. या मद्यपींकडून धरणाच्या भींतीवर रंगीतसंगीत पार्ट्या होऊ लागल्या आहेत. आणि पार्ट्या झाल्यानंतर दारुच्या बाटल्या फोडण्याचा गैरप्रकारही या मद्यपींकडून सुरु आहे. मद्यपींच्या या त्रासाने स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकही त्रासले आहेत. दरम्यान, या मद्यपींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)