धोनीला अचानक दिलेले कर्णधारपद अन्‌ संघातील बदल यामुळे निवड समिती नाराज 

नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नुकतीच एका एकदिवसीय सामन्यात कर्णधारपदाची धुरा सांभाळली. आशिया चषक स्पर्धेत केवळ औपचारिकता म्हणून खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान या सामन्यात त्याने संघाचे नेतृत्व केले. पण धोनीला अशा पद्धतीने कर्णधार करणे आणि संघात घाऊक बदल करणे हे संघ निवड समितीला अजिबात रुचले नाही. संघ व्यवस्थापनाने या सामन्यासाठी संघात पाच बदल केले होते आणि त्यांच्या या निर्णयावर निवड समितीने नाराजी प्रकट केली आहे.
आशिया चषक स्पर्धेसाठी नियमित कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यात आले होते. मात्र अफगाणिस्तानविरुद्धचा सामना हा स्पर्धेच्या निकालाच्या दृष्टीने महत्वाचा नसल्याने या सामन्यात भारताच्या संघाने काही खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता या लढतीत भारत पराभूत होता होता थोडक्‍यात वाचला होता.
या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन दोघेही संघाबाहेर होते. त्याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार व जस्प्रीत बुमराह या प्रमुख गोलंदाजांनाही विश्रांती देण्यात आली होती. त्यांच्याजागी संघात मनिष पांडे, सिध्दार्थ कौल, दीपक चहर आणि खलील अहमद यांना खेळवण्यात आले होते. विशेष म्हणजे तब्बल 696 दिवसानंतर संघाचे कर्णधारपद धोनीकडे सोपवण्यात आले होते. त्यामुळे इतक्‍या मोठ्या कालावधीनंतर अचानक संघाचे नेतृत्व एखाद्याला देणे, ही बाब निवड समितीला अजिबातच पसंत पडली नाही, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, तो सामना धोनीसाठी कर्णधार म्हणून 200वा सामना होता. हा सामना जिंकून धोनीला विजयाची भेट देणे ही भारतीय खेळाडूंची इच्छा होती. पण हा सामना अफगाणिस्तानच्या झुंजार गोलंदाजीमुळे बरोबरीत सुटला होता. त्याच बरोबर बीसीसीआयच्या सुत्राने सांगितले की, निवड समिती या निर्णयावर नाखूश होती. कर्णधार रोहित आणि उपकर्णधार धवन यांना बसवून धोनीला पुन्हा नेतृत्व करण्यास देणे, याला काहीच अर्थ नव्हता.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)