धोकादायक सेल्फी आणि आपण 

अशोक सुतार 

गेल्या चार वर्षांत सेल्फी काढण्याची लाट आली आहे. सेल्फीमुळे आपण जीवाला मुकतो, हे भयानक आहे, हा विचारच काही जणांच्या मनाला शिवत नाही. लोकांना धोक्‍याची जाणीव नसते असे नाही; परंतु काहीतरी चाळा, स्वतःला काहीतरी शाबित करण्याच्या नादात लोक धोकादायक जागेवर जाऊन सेल्फी काढतात. हे थांबले पाहिजे. 

विद्यार्थी असोत वा प्रौढ नागरिक, अनेकांना मोबाइलवरील सेल्फीने वेड लावले आहे. सेल्फी काढताना आपण धोक्‍याच्या ठिकाणी थांबलो आहोत का, याचा विचार केला केला पाहिजे. काही तरुणांनी रेल्वे ट्रकवर सेल्फी काढताना प्राण गमावले आहेत. सध्या मोबाइलचे मोठे वेड तरुणांना आहे; परंतु मोबाइलचा वापर ते जगातील माहिती समजावून घेण्यासाठी करतात का, मोबाइलचा व्यवहारात काय फायदा होतो, याचेही ज्ञान हवे. नाहीतर फक्‍त मनोरंजन करत जगणे आणि किड्यासारखे मरणे याला काही अर्थ नाही. तुम्ही मोबाइलचा वापर समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी करा, जनसंपर्कासाठी करा, हे तुमच्या फायद्याचे असू शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काहीजण मोबाइलचा वापर बॅंकेतील व्यवहार करणे, ऑर्डर बुकिंग करणे, नवीन काही शिकण्यासाठी करतात; परंतु मोबाइलवर सेल्फी काढणे आणि तेही धोकादायक जागेवर यासारखा मूर्खपणा नाही. लोक त्यांच्या विचित्र व मूर्खपणाच्या वागण्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण करतात. असे का घडत आहे? आपण खूप साहसी आहोत हे मित्रांना दाखवून देण्याकरिता अशा क्‍लृप्त्या हे लोक लढवतात. पण जीवन हे काही एवढे स्वस्त नाही की, ते कधीही संपवावे. एखाद्या सेल्फीसारख्या क्रेझसाठी आपले जीवन मरणाच्या दारात का उभे करावे, हे आजच्या तरुणांना समजेल काय ?
सेल्फी काढण्याच्या नादात वाऱ्याचा झोत आल्याने दरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माथेरान येथे घडली.

सरिता चौहान असे मृत महिलेचे नाव असून महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी दिली येथून सरिता चौहान या आपल्या पती आणि तीन मुलांसह पुण्यात आल्या होत्या. पुण्यातून महाबळेश्‍वर करत त्यांचे कुटुंब 19 जून रोजी माथेरान येथे आले होते. लुईस पॉइंटवर संरक्षक कठडा ओलांडून सेल्फी घेण्यासाठी पतीसोबत त्या गेल्या; मात्र त्याचवेळी जोराचा वारा सुटला. त्यामुळे सरिता यांचा तोल जात त्या 1300 फूट खोल दरीत पडल्या. माथेरानमधील सह्याद्री रेस्क्‍यू टीमने तातडीने पोलिसांसह शोधमोहीम सुरू केली. रात्री चौहान यांचा मृतदेह पोलिसांनी शोधला. सेल्फी घेताना अनेकजणांनी आपले प्राण गमावले आहेत, पण लोक थोडे हळहळतात आणि पुन्हा तेच सुरू होते. लोक काळजी घेत नाहीत, ही वस्तुस्थिती वाईट आहे.

सहा महिन्यांपूर्वी डहाणूच्या समुद्रात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट बुडाली होती. या बोटीतून प्रवास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. डहाणूच्या बाबुभाई ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी डहाणू खाडी येथील फेरी बोटमधून समुद्रात फिरायला गेले होते, त्यावेळी हा प्रकार घडला. याप्रकरणी बोटमालकाला अटक झाली होती. यातील एक बाब समाजाने गांभीर्याने घेतली पाहिजे, ती म्हणजे बोटीत असलेल्या मुली मोबाइलवर सेल्फी काढत होत्या. त्यांना अनेकवेळा बोटमालकाने सेल्फी न काढण्याबद्दल बजावले होते. पण मुली ऐकत नव्हत्या. उत्साहाच्या भरात त्या सेल्फी काढण्यासाठी बोटीच्या छतावर गेल्या आणि काही क्षणांत बोट उलटून बुडाली होती.

तसेच काही दिवसांपूर्वीच कोकणातील विख्यात तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सहल गेली होती, त्यावेळी बोटीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त विद्यार्थी बोटमालकाने घेतले होते. सेल्फी काढताना काही विद्यार्थ्यांचा तोल गेला आणि बोट उलटली होती. त्या घटनेत जीवितहानी झाली होती. एकदा एका गडावर एक गर्भवती महिला सेल्फी काढताना 15 फूट खाली पडली होती. खरेच सार्वजनिक ठिकाणी असा निष्काळजीपणा होत असेल तर सेल्फीबाबत मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. आजकाल कोणत्याही समारंभात मोबाइलवर सेल्फी काढण्याची स्टाईल आली आहे. सेल्फी काढणे वाईट नाही, पण ती केव्हा काढावी याचे तारतम्य संबंधितांनी बाळगणे इष्ट ठरेल. कुणी बिल्डींगच्या टोकावर बसून सेल्फी काढत आहे तर कुणी उंचावर बसून सेल्फी काढत आहे.

अशा दुर्घटनांपासून समाजातील युवा पिढीने धडा घेण्याची गरज आहे. स्वसुरक्षा बाळगणे महत्त्वाचे आहे. धोकादायक स्थितीत जाणीवपूर्वक सार्वजनिक ठिकाणी आपण उत्साहाच्या भरात, आपले स्टेटस वाढावे यासाठी जीव धोक्‍यात घालतो, यासारखे दुर्दैव नाही. प्रत्येकाने स्वसुरक्षेचे नियम बाळगावेत, अति उत्साहावर नियंत्रण ठेवावे, आजूबाजूच्या परिस्थितीचे भान बाळगावे, तरच असे अपघात टाळता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)