सातारा : धोकादायक संरक्षक कठडे देताहेत अपघाताला निमंत्रण

संग्रहित छायाचित्र

सातारा- लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्‍वासनांची खैरात होत आहे. प्रत्यक्षात मात्र कोणतीही काम व्यवस्थित तडीस जात नसल्याचे चित्र गडद होत चालले आहे. सातारा शहरातील परिस्थितीही ही काहीशी अशीच झाली आहे. शहरांमध्ये अनेक ओढे आहेत. त्या ओढ्यांवर वाहतुकीसाठी पुल बांधण्यात आले आहेत.

अरुंद पुल व संरक्षण कठडे नसल्याने दैनदिन जीवनात नागरिकाना व वाहनचालकाना या मार्गावरुन प्रवास करताना सावधानता बाळगावी लागत आहे. अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी करुन त्याची दखल घेतली जात नाही. लालफितीत सुरु असलेला हा कारभार नागरिकांचे जिवावर बेतत आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे सर्वात महत्वाचे आहे. पुलावर संरक्षण भिंत नसल्याने ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. जनहिताचा विचार करुन तातडीने ओढ्यावरील पुलावर संरक्षण भींतीची उंची वाढवावी हीच अपेक्षा.
श्रीरंग काटेकर, सातारा

मात्र, त्या पुलांना आता संरक्षक कठडेच उरले नाहीत. त्यामुळे हे पूल अपघाताला निमंत्रण देत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे केवळ आश्‍वासनांवर भागणार नाही तर आता ठोस कारवाई पाहिजे, अशी म्हणण्याची वेळ सातारकर नागरिकांवर आली आहे, पण पुढाकार कोण घेणार? हा मोठा प्रश्‍न आहे.

शासनाकडून दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. मात्र नागरिकांच्या प्रश्‍नावर सोयीस्कर बगल दिली जात असल्याचेच आजवरचे चित्र आहे. सातारा शहरातील अनेक भागांना जोडणाऱ्या ओढ्यावरील पुलांची रुंदी अंत्यल्प आहे. त्यात या पुलांवर बांधण्यात आलेले संरक्षक कठड्यांचीही मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे. तर काही ठिकाणी संरक्षक कठड्यांऐवजी बांबूचा आधार दिला आहे.

दरम्यान, या पुलांवरुन वाहने चालवित असताना अनेकवेळा अपघताचे प्रसंग घडत आहेत. कठडे नसल्याने पुलाचा अंदाजही येत नाही. त्यामुळे याठिकाणी भविष्यात एखाद्या मोठ्या अपघाताचीही शक्‍यता नाकारता येत नाही.

शहरातील करंजे तर्फे येथील मुख्य महामार्गावरील असाच एक पुल नेहमीच वाहने व नागरिकांच्या वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरील पुलाचे संरक्षण कठडे तुटल्याने व ते कमी उंचीचे असल्याने वाहन चालविताना वाहनचालकाला मोठी कसरत करावी लागते. तिच परिस्थिती बुधवार पेठेतील लकडी पुलाची आहे.

अरुंद पूल व त्यावरील संरक्षण भिंतीची उंची दिवसेंदिवस कमी होत असल्याने नागरिकांचे जीवन धोक्‍यात आले आहे. तीच परिस्थिती आर्याग्ल कॉलेज लगतच्या पुलाचीही आहे. वळणावर असणारा हा पुल हा अनेक वर्षापासून संरक्षण भितीपासून वंचित आहे. छोटे मोठे अपघात घडूनही या पुलाकडे कोणाचे लक्ष नाही. शहरातील ओढ्यांवर असलेले हे पुल संरक्षण भींतीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींकडून त्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचाच अनुभव नागरिकांना येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)