धोकादायक चेंबर्समुळे रस्त्यांवर मृत्यूचे सापळे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरील चेंबर रस्त्याला समांतर नसल्याने चेंबर आणि रस्ता यामध्ये अंतर पडून खड्डे तयार झालेले आहेत. या खड्‌डयात वाहने आदळून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. यामुळे, शहरातील अनेक रस्ते नव्याने बांधताना चेंबरची झाकणे रस्त्याच्या समान पातळीत असणे गरजेचे आहे. मात्र, महापालिकेच्या स्थापत्य विभागाला धोकादायक चेंबरचे गांभीर्य नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

पुणे-मुंबई शहरांच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त आहेत. मात्र, असमानपातळी, खड्डे, चुकीच्या पध्दतीने उभारलेले स्पीड ब्रेकर यामुळे रस्ते प्रशस्त असतानाही अपघातांची संख्या दिवसें-दिवस वाढतच चालली आहे. महापालिकेने रस्ता आणि पदपथाच्या खाली सांडपाणी वाहिनीचे पाणी वाहून नेण्यासाठी नाल्यांची व्यवस्था केली आहे. परंतु, त्यावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सतत केले जाते. अशा वेळी चेंबरच्या आजूबाजूचा भाग उचलून न घेतल्याने त्या ठिकाणी खड्‌डा तयार होत आहे. खोदाईनंतर हा खड्‌डा योग्य पध्दतीने बुजवला जात नाही. परिणामी, चेंबर भोवती खड्‌डे पडून वाहतुकीमुळे हा खड्ड्याचा आकार वाढत जातो. यामुळे, मुख्य रस्त्यावरील वाहन चालकांना अचानक चेंबरचा खड्डा आल्याने अंदाज येत नाही. यामुळे, वाहनांचे अपघात होण्याचा घटना सतत घडत आहेत. या खड्ड्यामुळे रात्रीच्या सुमारास अचानक ब्रेक दाबल्याने वाहने घसरत आहेत. तसेच, काही चेंबरवरील लोखंडी जाळ्यामधील खिळे व पट्‌टया वरती आल्याने वाहनांच्या टायरला देखील धोका निर्माण होत आहे. पावसाळ्यामुळे रस्ते चिखलमय व निसरडे झाले आहेत. त्यातच चेंबरच्या खड्ड्यांची भर पडल्याने वाहन चालक जीव मुठीत धरुन वाहने हाकत आहेत.

पावसाळ्यापूर्वी नादुरुस्त चेंबरचे सर्व्हेक्षण करुन महापालिकेने ते दुरुस्त करणे आवश्‍यक होते. परंतु, महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे चेंबरच्या समस्या निर्माण होऊन कित्येक नागरिकांचा जीव जात आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने लोखंडी जाळ्या काढून रस्त्याला समांतर सिमेंटच्या पक्‍क्‍या बांधकामात चेंबरची झाकणे बसविण्याचे काम सुरु होते. परंतु, नंतर ते थांबविण्यात आले. युवा सेनेच्या वतीने मागील आठवड्यात चिखलीमध्ये चेंबरमध्ये वृक्षारोपण करत या समस्येकडे लक्ष वेधले होते. मात्र, त्यानंतरही महापालिका प्रशासन जागे झाले नसल्याचे चित्र आहे. चेंबरवरील लोखंडी जाळ्या धोकादायक असल्याने चेंबरला सिमेंटची झाकणे बसविणे आवश्‍यक आहे. याकडे, प्रशासनाने तत्काळ लक्ष देवून नागरी समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पदपथ आणि रस्त्यावरील जाळ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तसेच, चेंबरच्या ठिकाणी खड्‌डा पडल्याने सतत अपघात होतात. नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिकेला स्वत:चे पैसे द्यावे लागत नाहीत तर नागरिकांच्या करातून कामे करायची असतात. तरीही महापालिका दिरंगाई करत आहे. त्यामुळे शहरवासियांचा जीव धोक्‍यात आला आहे. यामुळे, चेंबरची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेने तत्काळ उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.
– संजय डोईफोडे, वाहन चालक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)