धोकादायक आळस (अग्रलेख)

शरीराचे एक शास्त्र असते. धर्म असतो. ते पाळले नाही की त्याचे परिणाम हे भोगावेच लागतात. शरीर हे एक आगार किंवा घर असते. तेथे तुम्ही रोज स्वच्छता ठेवली अथवा चलनवलन ठेवले तर ते साफ आणि नीटनेटके राहते. मात्र जर तसे केले नाही, तर ज्या प्रमाणे घरात कचरा जमा होतो व त्याचा पुढे ढीग लागतो तसे शरीराचे होते व तेथे चरबीचा ढीग तयार होऊ लागतो व विविध आजारांना त्याचे आमंत्रण मिळते. थोडक्‍यात त्याचे अतिलाड करणे टाळायचे असते. 

जागतिक आरोग्य संघटनेने एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जगभरातील 700-750 कोटी लोकसंख्येपैकी 140 कोटी लोक असे आहेत, की ज्यांच्या शारिरिक हालचाली अत्यंत कमी किंवा अजिबातच नाहीत. म्हणजे हे लोक आळशी आहेत. आरोग्य संघटनेचा हा अहवाल व त्यातील धक्कादायक आकडेवारी पाहता आपला प्रवास नेमका उलट्या दिशेने सुरू असल्याचे दिसते आहे. संघटनेने जगभरातील 19 लाख लोकांच्या दिनचर्येचे सर्वेक्षण करून हा अहवाल केल्याचे सांगितले गेले आहे. त्यात भारतातील 77 हजार जणांचा समावेश होता.

भारतातील जवळपास 25 टक्के पुरूष आणि 44 टक्के महिला हालचालीच करत नाहीत किंवा अगदीच थोडासा ताण ते शरीराला देतात. याचा अर्थ भारतातील महिला व पुरूष असे मिळून निष्क्रिय असलेल्यांचे सरासरी प्रमाण 34 टक्के होते. अर्थात ही निष्क्रियता काही केवळ आळसामुळेच आली आहे, अशातला भाग नाही. तर एकुणच भारतीयांचे जे जिवनमान बदलले आहे, त्याचाही यात मोठा वाटा आहे. नोकरी- व्यवसायामुळे आयुष्याला प्रचंड गती आली आहे. त्यात स्वत:कडे बघायला वेळ नाही. सगळीकडे डेडलाईन आहे व ती सांभाळली तरच तुमचे अस्तित्व आहे. कारण त्यातही स्पर्धा आहे व तीही जिवघेणी आहे. प्रत्येकाला पुढे जाण्याची व मोठे होण्याची घाई आहे. या सगळ्याचा परिणाम बऱ्याच गोष्टी जिवनातून स्कीप करण्यात होतो. त्यात व्यायामाचा अर्थातच पहिला क्रमांक आहे. याशिवाय कामाचे बैठे स्वरूप आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाने हातात दिलेली विविध माध्यमे यामुळे पूर्वी ज्याकरता शारीरीक श्रम घ्यावे लागत होते, त्याकरता आता बुडही हलवायची गरज पडत नाही. तंत्रज्ञानामुळे सगळेच संगणकीकृत झाले आहे. त्यामुळे पूर्वी असलेले कागदांचे ढीग हद्दपार झाले असून टेबलावरची स्टेशनरी गायब झाली आहे.

मात्र याचा प्रभाव पडत माणूसच स्टेशनरी झाला आहे व कागदांच्या ढीगाऐवजी त्याच्या शरीरावर चरबीचे ढीग तयार होऊ लागले आहेत. या अशा जिवनक्रमातून मिळणारी साप्ताहिक सुटी किंवा आयटीच्या भाषेतला विकेंड म्हणजे पर्वणीच. त्या दिवशी मनसोक्त झोपणे व एन्जॉय करण्याचा प्रोग्रॅम अगोदरच मेंदुला फिड केला गेला असल्यामुळे त्या दिवशी आवर्जुन व्यायाम करणारे लोक शोधून काढावे लागतील. या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम होत असून अनेक गंभीर आजारांचे संकट पूर्वी कधी नव्हते, इतके आता गडद होत चालले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाच्या म्हणण्यानुसार आळसाचे कारण काहीही असले तरी ह्रदयरोग, कर्करोग, मधुमेह या आजारांना त्यामुळे मोकळे रान मिळत असून रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढच होताना दिसते आहे. भारतात आज महिला प्रत्येक क्षेत्रात मुसंडी मारताहेत. पुरूषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात त्या काम करताहेत व पुढेही जात असल्याचे अभिमानाने सांगितले जाते व ते खरेही आहे. मात्र द लांसेट ग्लोबल हेल्थमध्ये प्रसिध्द झालेल्या या अहवालाचा धोका महिलांनीही वेळीच ओळखणे गरजेचे आहे. त्याचे कारण काहीच हालचाल न करणाऱ्या किंवा आळशी भारतीय पुरूषांच्या तुलनेत आळशी महिलांचे प्रमाण दुप्पट झाले आहे.

जगातल्या तीन महिलांपैकी एक आळशी असते असेच या अहवालाने सूचित केले आहे. उच्च उत्पन्न गटातील लोकांनी व विशेषत: उच्चपदस्थांनी याची गांभीर्याने नोंद घेण्याची वेळ आली आहे. कारण या गटातील आळशी अर्थात शरीराला कोणतेही कष्ट न देणाऱ्यांचे प्रमाण तब्बल 37 टक्के आहे. तेच मध्यम वर्गातील आळशींचे प्रमाण 26 टक्के आहे. त्याला वर म्हटल्याप्रमाणे स्पर्धा आणि रोजची लढाई ही कारणे असू शकतात. मात्र शरीराचे एक शास्त्र असते. धर्म असतो. ते पाळले नाही की त्याचे परिणाम हे भोगावेच लागतात. शरीर हे एक आगार किंवा घर असते. तेथे तुम्ही रोज स्वच्छता ठेवली अथवा चलनवलन ठेवले तर ते साफ आणि नीटनेटके राहते. मात्र जर तसे केले नाही, तर ज्या प्रमाणे घरात कचरा जमा होतो व त्याचा पुढे ढीग लागतो तसे शरीराचे होते व तेथे चरबीचा ढीग तयार होऊ लागतो व विविध आजारांना त्याचे आमंत्रण मिळते. थोडक्‍यात त्याचे अतिलाड करणे टाळायचे असते. अन्यथा काय होते, ते गेल्या काही वर्षांत अवकाळी मृत्यूच्या आकडेवारीत झालेल्या वाढीवरून पुरेसे स्पष्ट झालेले आहे. आरोग्य संघटनेने यापूर्वी 2001 मध्ये असा अहवाल सादर केला होता. त्यावेळेच्या तुलनेत भारतीयांमधील आळशी लोकांचे प्रमाण कमी होण्याऐवजी दोन टक्कयांनी वाढले आहे.

सुखी आणि आरोग्यसंपन्न आयुष्य जगायचे असेल तर आरोग्यकडे विशेष ध्यान देणे क्रमप्राप्त आहे. त्याकरता चांगल्या सुविधा असायला हव्यात व ते देण्याचा प्रयत्न सरकारही करतच असते. मात्र सगळेच सरकारवर सोडून चालत नाही. किमान आपल्या शरीराबाबत तरी आपणच जागरूक असणे आवश्‍यक आहे. हल्ली देवाची पुजा आणि अन्य विधी करण्यासाठी पगारी लोक ठेवले जातात. त्याने आपल्या खात्यात पुण्य जमा होईल असा अजब विश्‍वास संबंधित मंडळींना असतो. मात्र शरीराच्या बाबतीत ती सोयही नाही. तुम्हाला तुमच्या पायावर उभे राहायचे असेल व उपयुक्त जिवन जगायचे असेल तर पगारी नोकर ठेवता येणार नाही. तुमचे काम तुम्हालाच करावे लागेल व हालचाल दाखवावी लागेल. थोडा आळस झटकावाच लागेल. कारण तो धोकादायकच आहे. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)