धूमस्टाईल चोरट्यांच्या आवळल्या मुसक्‍या

शिरुर-… ते मोटारीवरून यायचे…गोड बोलायचे अन्‌ नागरिकांना लुटुन पसार व्हायचे. या संपूर्ण जिल्ह्यात धुमाकुळ घालणाऱ्या धुमस्टाईल चोरट्यांच्या पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने मुसक्‍या आवळल्या. याप्रकरणी अक्षय भारत जगताप ऊर्फ कठाळे आणि प्रभू ऊर्फ आकाश बाळू धुमाळ या दोघांना अटक केली आहे. या दोघांनी सुमारे 3 लाख रूपये चोरल्याची कबुली तपासाअंती दिली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हयात वापरलेली युनिकॉर्न आणि बुलेट मोटारसायकल जप्त केली आहे. या आरोपींवर पुणे शहर हद्दीत मार्केटयार्ड, सहकारनगर, लष्कर, भारती विद्यापीठ, भोसरी, चंदननगर या पोलीस स्टेशनला सुमारे 12 गुन्हे अशाच प्रकारचे दाखल आहेत. त्या गुन्हयांमध्ये ते जामिनावर सुटले होते.

पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख दयानंद गावडे यांनी दिलेली माहिती अशी, शिरुर तालुक्‍यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात दुचाकीवरू येऊन पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तसेच गोड बोलून नागरिकांना लुटून पसार होण्याच्या घटना घडत होत्या. शिरुर येथे दि.19 नोव्हेंबर रोजी कपिल ट्रेडर्स दुकानासमोर कपिल सुरेश बोरा (रा.रेव्हेन्यू कॉलनी, शिरूर) यांना एका बुलेट मोटारसायकलवरून दोन अनोळखी व्यक्‍तींनी येऊन त्यांना लॉज कुठे आहे? असे विचारण्याचा बहाणा करून अंगास झटून नकळत फिर्यादीच्या पॅंटच्या खिशातून 40 हजार रक्कम चोरून नेली होती. म्हणून शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंत अशाच प्रकारे पत्ता विचारण्याचा बहाणा करून रक्कम लुटण्याचे आणखी प्रकार घडल्यानंतर शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत माणिकचंद हॉस्पिटलसमोर, रामआळी,पाबळ फाटा, डंबेनाला, इंदिरा गांधी पुतळा चौक, रांजणगाव पोलीस स्टेशनला गजानन हॉस्पिटल समोर आणि भिगवण पोलीस स्टेशनला भिगवन मेन पेठ येथे असे एकूण मिळून 8 चोरीचे गुन्हे पुणे जिल्ह्यात दाखल झाले होते.
शिरुर शहरात भर गर्दीत सलग सहावेळा दिवसाढवळ्या नागरिकांना लुबाडण्याच्या प्रकारामुळे शिरुर पोलिसांना या महाठकांनी एकप्रकारे आव्हान केले होते. त्यामुळे शिरुर पोलिसांना तपास करणे आव्हान होते. याच प्रकरणांचा पुणे ग्रामीण गुन्हे शोध पथक समांतर तपास करत होते.
या पथकातील पोलिसांनी ज्या ठिकाणी अशा पद्धतीने चोऱ्या झाल्या आहेत. अशा ठिकाणी जाऊन तपास सुरु केला होता. माहिती घेत असताना काही सीसीटिव्ही फुटेज प्राप्त केले. त्याचप्रमाणे या प्रकारे चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरुवात केली. हा शोध घेत असताना यापूर्वी पुणे शहर हद्दीत गुन्हे केलेत. परंतु जामिनावर असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना सीसीटिव्ही फुटेजमधील आरोपी हे मिळते जुळते असल्याची खाञी पटली. पोलिसांनी या आरोपींवर पाळत ठेवली असता अक्षय भारत जगताप ऊर्फ कठाळे (वय.24,रा.जयमल्हार कॉलनी,गोपाळपट्टी,मांजरी बुद्रुक, मुळ. धारुर जि.बीड) आणि प्रभू ऊर्फ आकाश बाळू धुमाळ (वय 20 रा.रामोशी आळी, हडपसर, मूळ रा.तळे हिप्परगा, ता.जि.सोलापूर) हे दोघे पुणे सोलापूर रोडवर थेउर फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले असता चौकशीअंती या आरोपींनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एकूण सुमारे 3 लाख हजार रुपये चोरल्याची कबुली दिली. हे दोन्हीही आरोपी पैलवान असून लोकांना लुटणेसाठी ते पत्ता विचारण्याचा बहाणा करुन त्यांच्याशी झटापट करताना कुस्तीच्या डावाचा वापर करत असायचे. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. या आरोपींना शिरुर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या आरोपींना पकडण्याकामी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, दत्ताञय गिरमकर, राजू मोमीन, नितीन गायकवाड, महेश गायकवाड, निलेश कदम, अक्षय जावळे, समाधान नाइकनवरे यांनी मोलाची भूमिका बजावली. शिरुर शहरात सलग सहावेळा चोऱ्या करुन शहरात धुमाकुळ घालणाऱ्या धुमस्टाइल चोरट्यांना अखेर गुन्हे शाखेने जेरबंद केल्याने शिरुर शहरातील नागरिकांनी गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)