धुळ्यात अटल महाआरोग्य शिबिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

धुळे: सर्वसामान्य नागरिकाला उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सामाजिक संस्थांच्या सहकार्याने एमआरआय आणि स्कॅनिंगची सुविधा येत्या महिनाभरात करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाजवळील मैदानावर आयोजित अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, आमदार स्मिता वाघ, अनिल गोटे, सुरेश भोळे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, डॉ. कुलदीप कोहली, डॉ. रागिणी पारेख, डॉ. रामराजे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, शासकीय आरोग्यसेवेच्या माध्यमातून रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात येतात. मात्र सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी श्री. महाजन यांनी शासकीय व खासगी डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिबिरांची परंपरा सुरू केली आहे. शिबिराच्या माध्यमातून आरोग्यसेवा रुग्णांच्या घराघरापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. गरीब व गरजू रुग्णांवर पूर्णपणे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून करण्यात येतात. आतापर्यंत 25 लाख रुग्णांना आरोग्य शिबिराचा लाभ झाला आहे. केरळमध्ये पूर आला असताना वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. महाजन यांच्या नेतृत्वाखाली तेथे सर्वांत मोठे आरोग्य शिबिर घेत आरोग्य सेवा पोहोचविली. सर्वात मोठे आरोग्य शिबिर महाराष्ट्राचे होते, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या महिन्यापासून ‘आयुष्यमान भारत’ योजना कार्यान्वित करण्यात येईल. या योजनेंतर्गत देशातील सुमारे 50 कोटी जनतेला पाच लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाच्या आरोग्य सेवा पुरविण्यात येतील. या योजनेत ज्यांचा समावेश होणार नाही, त्यांच्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवित प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवेच्या कक्षेत आणण्यात येईल.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन म्हणाले, देशाचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीनिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरजू, गरीब रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यात येत आहे. शिबिरात रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावरील औषधोपचार आणि आवश्कता भासल्यास शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्रपणे पाठपुरावा केला जातो. शिबिरात देशातील नामवंत शल्यचिकित्सक, शल्यविशारद सहभागी झाले आहेत. त्यामुळे रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सेवा मिळू शकणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)