धुळ्यातील प्रेमी युगलांची आळंदीत आत्महत्या

आळंदी-ज्ञानेश्वरी मंदिरा पाठीमागील गोपाळपूर परिसरात प्रेमी युगलाने विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली.

राहुल साहेबराव पाटील (वय 35) व रीना उर्फ गुडदी विलास गिरीगोसावी (वय 25, दोघेही रा. डागुरने, ता. सिंदखेडा, जि. धुळे) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि. 11) दुपारी तीनच्या सुमारास आळंदीतील गोपाळपूर परिसरात इंद्रायणी नदीवर सुरु असलेल्या पुलाचे बांधकामावरील देखरेख करणारा रखवालदार बाबु आश्रुबा नरनाळे (वय 25, रा. वृंदावन कॉलनी, आळंदी) यांना एक महिला व एक पुरुष एका झाडाखाली स्तब्ध अवस्थेत पडलेले दिसले. त्यांनी याबाबतची खबर आळंदी पोलीस ठाण्यात दिली. सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व पोलीस पथकाने घटनास्थळास भेट दिली. घटनास्थळी एक विषाची बाटली व मोबाईल फोन मिळाला. दोघांनाही आळंदी ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळावर मिळालेल्या मोबाईलवरून मृतांचे नातेवाइकांशी संपर्क साधला. यात तीन दिवसांपूर्वी डागूरने गावातील राहत्या घरातून हे प्रेमी युगल तीन दिवसांपूर्वी घरातून निघून गेले असल्याची माहिती मिळाली आहे. मृतांचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आळंदीकडे निघाले असून, मृतदेह शवविच्छेदनास चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास आळंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)