धुळे व अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर 

– 9 डिसेंबरला मतदान; 10 डिसेंबर रोजी मतमोजणी 

– आचारसंहिता लागू 

मुंबई: धुळे व अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज जाहीर केला. या दोन्ही महानगरपालिकेसाठी 9 डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी 10 डिसेंबर रोजी होणार आहे. या महानगरपालिकांक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा सहारिया यांनी केली.

धुळे महानगरपालिकेची मुदत 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 4 लाख 46 हजार 94 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 29 हजार 569 आहे. एकूण 19 प्रभागातील 74 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 37 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव आहेत.

अहमदनगर महानगरपालिकेची मुदतदेखील 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 असून मतदारांची संख्या सुमारे 2 लाख 56 हजार 719 आहे. एकूण 17 प्रभागातील 68 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 34 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत, अशी माहिती सहारिया यांनी दिली.

दोन्ही महानगरपालिकांसाठी 13 नोव्हेंबर पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही सहारिया यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रम 

– नामनिर्देशनपत्रे दाखल करणे : 13 ते 20 नोव्हेंबर 2018

– नामनिर्देशनपत्रांची छाननी : 22 नोव्हेंबर 2018

– उमेदवारी मागे घेणे : 26 नोव्हेंबर 2018 पर्यंत

– निवडणूक चिन्ह वाटप : 27 नोव्हेंबर 2018

नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी 9 डिसेंबरला मतदान 

नेर- नबाबपूर (जि. यवतमाळ), लोहा (नांदेड), मौदा (नागपूर), रिसोड (वाशीम), ब्रम्हपुरी (चंद्रपूर) आणि शेंदुर्णी (जळगाव) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान; तर 10 डिसेंबर 2018 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)