“धुळफेक’ करून माती उत्खनन

  • भोरच्या कासुर्डी भागात नियमांची पायमल्ली ः छोट्या टेकड्यांवर रात्री-अपरात्री खोदाई

कापुरहोळ – कापूरहोळ-भोर मार्गावर कासुर्डी गुं. मा. (ता. भोर येथील माळरान आणि छोट्या टेकड्यांवर गौणखनिजांचे उत्खनन बेकायदेशीरपणे सुरू आहे. महसूल विभागाची कारवाई टाळण्याकरिता रात्री-मध्यरात्री उत्खनन केले जात असून पहाटे पर्यंत मोठमोठे डंपर आणि टिपर धडधडत आहेत. मंडल अधिकारी आणि तलाठ्यांच्या डोळ्यात धुळफेक करून माती उपसा सुरू असल्याने आता परिसरातील नागरिकांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाने अन्य गौणखनिजा बरोबरच माती उपशावरही निर्बंध घातले आहेत. परंतु, वाळू, दगड, मुरूम या प्रमाणेच मातीलाही मोठी मागणी असल्याने माफियांकडून मोकळी माळराने, छोटे उंचवटे, टेकड्या टार्गेट केल्या जात असून रॉयल्टी टाळण्याकरिता दिवसा ऐवजी रात्रीच्या वेळी माती उपसा करण्याचा फंडा माफियांनी शोधून काढला आहे. रात्रीस खेळ चाले या प्रमाणे कासुर्डी गाव परिसरात माती उपशाचा अवैध धंदा सध्या जोरात सुरू आहे. गेल्या काही दिवसांत हजारो ब्रास माती उपसा झाल्याचे उघड झाले आहे.
भोर तालुका प्रशासनाकडून गौण खनिजांचे उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असली तरी रात्रीच्या वेळी चालणाऱ्या या अवैध उत्खननाकडे महसुली अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. रात्रीच्या वेळी उत्खनन केल्याने ते जमीन मालकाने विकसनाकरिता केले की, माफियांनी माती उपसा करून नेला. हे कळत नसल्याने कारवाई करण्याकडे महसूलच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परंतु, कासुर्डी परिसरात माती उपसा केल्याची अनेक ठिकाणी उखडी पडल्याने हा चोरटा धंदा उघड झाला आहे. याबाबत संबंधीत गावच्या ग्रामस्थांनीही अधिकाऱ्यांना कळविले आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने माफियांकडून अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक होत आहे की, अधिकारीच डोळे बंद करून गप्प आहेत, असा सवाल आता नागरिकांकडून केला जावू लागला आहे. शेतीला बांध तयार करणे, विटभट्टी, घराची पायाभरणी, बागबगीचा अशा अनेक कारणांकरिता मातीची मागणी असल्याने माफियांनी आपला मोर्चा भोर तालुक्‍यातील आडबाजुला असलेल्या गावांकडे वळविला आहे. संबंधीत अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

  • रस्त्यावर ठिकठिकाणी माती…
    गौणखनिजांना सोन्यापेक्षाही जास्त भाव आला आहे. शासनाने गौणखनिजावरील निर्बंध कडक केल्यामुळे विनापरवाना उत्खनन करणे दंडास पात्र आहे; परंतु, माती व मुरूम उत्खनन माफिया रात्री-अपरात्री करीत असल्याने याबाबतची चर्चा रात्रीच्या काळोतखातच दबून जात आहे. टिपर आणि डंपरचा वापर होताना तालुक्‍यातील रस्त्यांवर सकाळी-सकाळी माती सांडल्याच्या खूना स्पष्ट दिसतात. याबाबतची साधी चौकशीही अधिकाऱ्यांना का करावी वाटत नाही? हे कोडेच आहे.
  • माहिती देण्यास तलाठ्यांकडून टाळाटाळ
    भोरच्या तहसीलदारांनी तालुक्‍यात अवैध गौणखनिज उत्खननावर जरब बसवून शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळवून दिला असला तरी अलीकडच्या काळात ही कारवाई थंड पडली की काय, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. कासुर्डी गुं.मा.गावचे तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन लागतच नाहीत, लागलाच तर उचलला जात नाही. माहीती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचे उघड आहे.

माती व मुरूम अशा गौणखनिज उत्खननासाठी आणि वाहतुकीसाठी नियमानुसार काम करणे आवश्‍यक आहे. जर, कोणी गौणखनिजाची नियमबाह्य वाहतूक अथवा उपसा करून चोरी करीत असेल, तर त्याच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली येईल.
– वर्षा शिंगण-पाटील, तहसीलदार, भोर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)