मधुमेहावरही उपयुक्त गुग्गुळ (भाग दोन)

आयुर्वेदिक दुकानात “म्हशागुग्गुळ’ मिळते ते त्रिफळाचूर्णाच्या काढ्यात शिजवावे म्हणजे शुद्ध होतो. त्रिफळा काढा करताना बेहडा व आवळा प्रत्येकी 50 ग्रॅम घ्यावा, त्यात 1 लिटर पाणी घालावे व त्याचाएक चतुर्थांश काढा उरवावा. मग उतरून गाळून घ्यावा व त्यात पाव किलो गुग्गुळ शिजवावा. काढ्यात हा चांगला वितळल्यावर ढवळावा व सुकला म्हणजे शुद्ध झाला असे समजावे. अशा रीतीने शुद्ध केलेले गुग्गुळ आयुर्वेदीय औषधासाठी वापरतात.

गुग्गुळ हे सर्व रोगावर चालणारे इतके मोठे औषध आहे की, वैद्यलोक त्याला योगराज गुग्गुळ, गोक्षुरादी गुग्गुळ, सिंहनाद गुग्गुळ असे म्हणून रोगानुरूप त्याचा औषधी म्हणून वापर करतात. प्रत्येक वैद्याजवळ गुग्गुळचे औषध हे असतेच असते. ज्यामध्ये गुग्गुळ विशेषकरून आहे अशी काही आयुर्वेदिक औषधे अशी,

-Ads-

चंद्रप्रभा – यात शिलाजीत व गुग्गुळ हे मुख्य घटक असून जोडीला कापूर किंवा कचोरा, वेखंड, नागरमोथे, काडेचिराईत गुळवेल, देवदार, हळद, अतिविष, दारुहळद, पिंपळमूळ, चित्रक, निशोत्तर, दंतीमूळ, तमालपत्र, दालचिनी, वेलदोडे, वंशलोचन, ही 10 ग्रॅम प्रत्येकी धने, त्रिफळा, चवक, वावडिंग, गजपिंपळी, सुवर्णमाक्षिक, सुंठ, मिरे, पिंपळी, जवखार, सैधंव, पादेलोण, बिडलोण ही प्रत्येकी 3 ग्रॅम, लोहभस्म 20 ग्रॅम, खडीसाखर 40 ग्रॅम, शुद्ध शिलाजीत 80 ग्रॅम, शुद्ध गुग्गुळ 80 ग्रॅम. भैषज्य रत्नावलीचा पाठ जास्त प्रमाणात वापरला जातो.

गुग्गुळ व शिलाजित यांचा त्रिफळ्याच्या काढ्यात पाक करून त्यांत इतर चूर्ण मिसळतात. चंद्रप्रभेने आर्तवाची उत्पत्ती व्यवस्थित होते. स्त्रियांना नियमित मासिक पाळी येण्यासाठी उपयुक्‍त. मूत्रवहस्त्रोतसावर चंद्रप्रभेचा विशेष उपयोग होतो. शामक, बल्य, व मूत्रल असे कर्म या औषधाचे आहे.

गर्भाशयास बल देते त्यामुळे गर्भस्त्राव , गर्भपात, अनियमित क्षीण, रजोदर्शन यावरील सर्व तक्रारी दूर होतात. त्याचप्रमाणे स्त्रियांचे अशक्तपणा, शिरःशूल, कटिशूल, अधोदरशूल, रजोप्रवृत्तींचे तक्रारीत चंद्रप्रभा उपयुक्त ठरते.

मधुमेहावर तसेच पांडुता, थकवा, कंड – मधुमेहात हे उपयोगी औषध आहे. वात पित्त कफावर ही कार्य करते. अग्निमांद्य नाहीसे करते. बल्य वृष्य रसायन आहे. त्यामुळे हे वृद्धावस्थेत फार उपयोगी पडते. ह्यातील सुवर्णमाक्षिक व लोहासक्त कण वाढविते. बलदायक, पित्तशामक व स्तभंक आहे. शिलाजीत रसायन शुक्रदोषनाशक धातू परिपोषणक्रय व्यवस्थित करणारे, गुग्गुळ शोथनाशक, बल्य असे रसायन आहे. वात वाहिन्यांवर कार्य करणारे बाकी औषधे शामक पाचक व मूत्रल अशी आहेत. मधुमेहावर कटू रसाचे घन प्रक्रियेने इलाज होतो.

कुटकी, चिराईत, इंद्रजव, मेथी, गुळवेल, सप्तकबी, बेडकीपाला, जांभूळ बी, कडूजिरे, सागरगोटा व बेलफळ मगज यांचे प्रत्येकी 580 ग्रॅम भरड औषधांचा सत्तर लिटर पाण्यात एक अष्टमांश काढा करावा. नंतर काढा गाळून घेऊन त्याचा आटवून घन करावा. त्यात सुवर्णमाक्षिक भस्म व शुद्ध शिलाजीत प्रत्येकी 275ग्रॅम व वंग, नाग, जसद भस्म, गुग्गुळ प्रत्येकी 80ग रॅम मिसळून एकजीव होईपर्यंत खल करावा. त्याच्या 200 मि. ग्रॅमच्या गोळ्या कराव्यात. ह्या सकाळ संध्याकाळ 2-2 घेतल्याने मधुमेहावर तसेच पांडुता, थकवा, कंड ह्या विकारांवर उपयोग होतो. कटू रसामुळे कफपित्ताचे रोग दूर होतात. भस्मामुळे शरीराला स्थौर्य लाभते, रक्त वाढते, रक्ताभिसरण सुधारते. अशाप्रकारे गुग्गुळ हे अत्यंत उपयुक्‍त औषधी आहे.

सुजाता गानू

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)