धावत्या बसमध्ये निर्घृण खुनाचा थरार

राजगुरूनगर- मामेबहिणीचे अश्‍लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याबाबत राजगुरुनगर पोलीस ठाण्यात आतेभावा विरोधात तक्रार दिली होती. याचा राग मनातधरून मामेबहिणीच्या सख्ख्या भावाचा चालत्या एसटी बसमध्ये कोयत्याने सपासप वार करुन खून केला. ही घटना आज (मंगळवारी) दावडी (ता. खेड) येथे सकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एस.टीमध्ये चांगलीच खळबळ उडाली. तसेच प्रवाशांमध्येही घबराट पसरली होती. दरम्यान, कारवाईत कुचराई केल्याने दोन पोलिसांना बडतर्फ करण्यात आले आहे.
दरम्यान, आधी तक्रार देऊनही पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने ही घटना घडल्याने यास सर्वस्वी पोलीसच जबाबदार आहेत. तसेच आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका घेऊन मृत युवकाच्या नातेवाईकांसह जमावाने एसटीबससह मृतदेह खेड पोलीस ठाण्यासमोर ठेवला. तसेच पोलिसांशीही बाचाबाची झाल्याने राजगुरुनगरात सुमारे तीन तास वातावरण तंग झाले होते. परंतु पोलिसांनी आरोपीला अटक करण्याची आणि दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याने तणाव निवळला. श्रीनाथ सुदाम खेसे (वय 18, रा. खेसेवस्ती, दावडी, ता. खेड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अजित भगवान कान्हूरकर (रा. दावडी, ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे. तर शिवाजी धोंडिबा खेसे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रज्ञा सुदाम खेसे व अजित भगवान कान्हूरकर यांचे लग्न लावण्यास नकार दिल्याने गुरुवारी (दि. 7) अजित कान्हूरकरने त्याच्या मामे बहिणीचे अश्‍लील फोटो, मेसेज सोशल मीडियावर टाकून तिची बदनामी केली. याबाबत राजगुरूनगर पोलीस ठाण्यात मुलीने फिर्याद दिली, त्यानुसार राजगुरूनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 8) आयटी कायद्यांतर्गत केवळ गुन्हा दाखल केला मात्र, कोणतीही कारवाई केली नाही. तर आज ही चालत्या बसमध्ये खुनाची घटना घडली. दरम्यान, दावडी ग्रामस्थांनी एसटी बससह श्रीनाथचा मृतदेह राजगुरूनगर पोलीस ठाण्यात आणला. व गुरुवारी फिर्याद दिली असताना पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.सोशल मीडियावर सर्व पुरावे असताना सहाय्यक फौजदार डी. वाय. सावंत, ए. बी. उबाळे यांनी दखल घेतली नाही. श्रीनाथ खेसे यांच्या खुनाला पोलीस जबाबदार असल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. त्यांना बडतर्फ करीत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे म्हणत ग्रामस्थानी पोलिसांना धारेवर धरीत प्रचंड शिवीगाळ केली. तर एसटीमध्ये मृतदेह पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, त्यातच ग्रामस्थ आक्रमक झाल्याने मोठी गर्दी झाली आणि तणावही त्याच प्रमाणात वाढला. दरम्यान अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी ग्रामस्थ नातेवाईकांशी तासभर चर्चा केली. आक्रमक नातेवाईक व ग्रामस्थांना आरोपी पकडण्याचे व दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. दरम्यान, निर्घृण खून केल्याप्रकरणी अजित कान्हूरकर याच्यावर राजगुरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • लवकरच आरोपीला पकडले जाईल. आरोपीला पकडण्यासाठी तीन टीम रवाना करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी (दि. 8) तारखेला सोशल मीडियावर फोटो टाकून बदनामी करण्याचा गंभीर गुन्हा करूनही पोलिसांनी त्यांच्या कामात कसूर केला आहे. त्या डी. वाय. सावंत, ए. बी. उबाळे यांना बडतर्फ केले आहे. याबाबत त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे त्याचा अहवाल पोलीस उपअधीक्षक राम पठारे यांच्याकडून तत्काळ मागविण्यात आला आहे.
    – तेजस्विनी सातपुते, अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक
  • अशी घडली घटना
    गोलेगाव मुक्कामी एसटी बस आज सकाळी साडेसातच्या सुमारास राजगुरूनगरकडे येत असताना खेसे वस्ती (दावडी) येथे श्रीनाथ खेसे व त्याची चुलत बहीण एसटीमध्ये बसले. अजित भगवान कान्हूरकर हा त्या अगोदरच्या थांब्यावर बस बसला होता. दावडी येथे आल्यानंतर अजित कान्हूरकरने त्याच्याजवळ असलेल्या धारदार कोयत्याने श्रीनाथ खेसेवर सपासप वार केले. या प्रकाराने सहप्रवासीही हबकून गेले. गोंधळ झाला म्हणून चालकाने एस.टी. थांबविताच अजित दार उघडून पळून गेला. मात्र, तोपर्यंत श्रीनाथचा मृत्यू झाला होता.
  • ग्रामस्थ-पोलिसांमध्ये शाब्दिक धुमश्‍चक्री
    राजगुरूनगर पोलीस ठाण्यात ग्रामस्थांचा आक्रोश पाहून तत्काळ पुणे व जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातून बंदोबस्त मागवला. चाकण, आळंदी, घोडेगाव, मंचर आणि राज्य राखीव दलाचे जवान आल्याने दावडीकर अजूनच चिडले. जेव्हा कारवाई करण्याची गरज होती, तेव्हा पोलिसांनी अजितला मोकाट सोडले. त्याला अटक केली नाही. त्याच्यावर कारवाई केली असती तर आज एका निष्पाप युवकाचा बळी गेला नसता. पोलिसच याला जबाबदार आहेत असा आरोप करीत काही ग्रामस्थांनी पोलिसांना प्रचंड शिवीगाळ केली. सुमारे तीन ते चार तास राजगुरूनगर पोलीस ठाण्यात मयताचे नातेवाईक, ग्रामस्थ व पोलिसांमध्ये शाब्दिक धुमश्‍चक्री सुरू होती. त्यामुळे मोठा तणाव पसरला होता.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)