धावती रेल्वे पकडण्याच्या नादात जवानाने गमावला पाय

नागपूर – धावती रेल्वे पकडण्याच्या नादात एका लष्करातील जवानाला आपला पाय गमवावा लागल्याची घटना नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. धावती रेल्वे पकडण्यासाठी केलेल्या प्रयत्नाने तसेच रेल्वे रूळावरून बेजबाबदार चालण्याने अनेकांना मृत्यू, कायमचे अपंगत्वही येऊ शकते. रेल्वे प्रशासन याबाबत असे न वागण्याचे आवाहन वेळोवेळी करत असते, मात्र तरीही अनेक नागरिक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सर्रास पहावयास मिळते. अशीच एक घटना रविवारी शहर रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेत लष्करातील जवानाला आपला अर्धा पाय गमवावा लागला आहे.

घटनेची अधिक माहिती अशी की, सैन्यदलात कार्यरत असलेल्या एम. चेरियन (रा. तामिळनाडू) यांची अलीकडेच गुवाहटी येथे बदली झाली होती. त्यामुळे सेवेतून सुट्टी घेऊन ते (12296 दिल्ली – चेन्नई तामिळनाडू एक्‍स्प्रेस) रेल्वेने घरी जात होते. एस- डब्यातील 72 क्रमांकाच्या बर्थवरून त्यांचा प्रवास सुरू होता. ही रेल्वे नागपूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म 2 वर येताच जवान एम. चेरियन हे तंबाखू घेण्यासाठी रेल्वेमधून खाली उतरले होते. मात्र, परत गाडीत चढण्याआधीच त्यांची रेल्वे धावण्यास सुरूवात झाली. यावेळी घाईघाईने रेल्वे पकडण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांचा पाय निसटल्याने ते रेल्वेखाली सापडले. या अपघातात त्यांचा पाय गुडघ्यापासून विलग झाला आहे. रविवारी हा अपघात घडल्यानंतर त्यांना आरपीएफ जवानांनी मदत केली. त्यानंतर उपचारार्थ त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)